Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय ३

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय ३
, मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (13:52 IST)
॥ श्रीगणेशाय नमः ॥
 
जय जय सच्चिदानंदा श्रीहरी । कृपा करावी लौकरी ।
तुम्ही पदनताच्या वरी । कधीं न कठोर झालांत ॥१॥
 
तूं करुणेचा सागर । तूं दीन जनाचें माहेर ।
तूं भक्तासी साचार । कल्पतरु वा चिंतामणी ॥२॥
 
ऐसा तुझा अगाध महिमा । संत गाती राघवा रामा ।
दासगणूसी पुरुषोत्तमा । पावा वेळ करुं नका ॥३॥
 
असो बंकटलाला घरीं । राहाते झाले साक्षात्कारी ।
दीन दुबळ्यांचे कैवारी । श्रीगजानन महाराज ॥४॥
 
लांबलांबोनी भक्त येती । समर्थांतें वंदिती ।
मधु तेथें माशा जमती । न लगे करणें आमंत्रण ॥५॥
 
एके दिनी काय झालें । तें आतां सांगतों वहिलें ।
महाराज होते बसलेले । निजासनीं आनंदांत ॥६॥
 
ती प्रभातीची होती वेळा । प्राची प्रांत ताम्र झाला ।
पक्षी किलकिलाटाला । करुं लागले वृक्षावर ॥७॥
 
कुक्कुटाचे होती स्वप्न । मंदशीत वाहे पवन ।
वृद्ध करिती नामस्मरण । शय्येवरी बैसोनिया ॥८॥
 
उदयाचलीं नारायण । येऊं पाहे हर्षें करुन ।
तेणें तम पलायन । करुं लागला कंदरीसी ॥९॥
 
परम भाविक सुवासिनी । रत सडासंमार्जनीं ।
वत्स धेनूस पाहोनी । तोडूं लागलीं चर्‍हाटें ॥१०॥
 
ऐशा त्या रम्य वेळेस । एक साधु शेगांवास ।
येतां झाला दर्शनास । श्रीगजानन साधूच्या ॥११॥
 
तो भिकार गोसावी । मानमान्यता त्याची राहावी ।
कोठोनिया सांगा बरवी । श्रीमंताच्या मंडळींत ? ॥१२॥
 
भगवी चिंधी डोक्यास । झोळी वाम बगलेस ।
होती एक नेसण्यास । फाटकीसी लंगोटी ॥१३॥
 
मृगाजिनाचा गुंडाळा । पाठीवरी होता भला ।
ऐसा गोसावी बैसला । कोपर्‍यांत एकीकडे ॥१४॥
 
दर्शनासी भीड फार । होवो लागली साचार ।
अशा स्थितींत मिळणार । सवड कशी त्या गोसाव्यास ? ॥१५॥
 
तों ठायींच बैसोन । करुं लागला चिंतन ।
म्हणे समर्थाचे चरण । दृष्टि पडणें कठीण मला ॥१६॥
 
समर्थांचा लौकिक भला । मी काशींत ऐकला ।
आवडीनें नवस केला । भांग स्वामीस अर्पिण्याचा ॥१७॥
 
तो मम हेतु मनांत । जिरुन जाया पाहे येथ ।
या श्रीमान मंडळींत । माझ्या नवसास कोण पुसे ? ॥१८॥
 
गांजाचें नांव काढितां । लोक मजला देतील लाथा ।
मी तो आलों फेडण्याकरितां । नवस गांजाचा शेगांवीं ॥१९॥
 
माझ्या नवसाची ती मात । सांगू तरी कवणाप्रत ? ।
येथें एकही ना दिसत । प्रेमी या शांभवीचा ॥२०॥
 
जी वस्तु ज्या आवडे खरी । तिचाच तो नवस करी ।
आणि मानी सर्वतोपरी । हीच वस्तु उत्तम ॥२१॥
 
ऐसे नाना विचार । गोसावी करी साचार ।
झाला होता परम आतुर । दर्शन घ्याया समर्थांचें ॥२२॥
 
तें त्याचें मनोगत । जाणते झाले समर्थ ।
बोलते झाले इतरांप्रत । आणा काशीचा गोसावी ॥२३॥
 
तो पहा त्या कोपर्‍याला । आहे बिचारा दडून बसला ।
हें ऐकतां आनंद झाला । गोसाव्यास परमावधी ॥२४॥
 
आणि बोलला मनांत । त्रिकालज्ञ हे खरेच संत ।
मी जें बोललों मनांत । तें सर्व यांनीं जाणलें ॥२५॥
 
ज्ञानेश्वरींत षष्ठाध्यायीं । जी गोष्ट कथिली पाही ।
कीं स्वर्गलोकीच्या कथा त्याही । समजतात योगीवरा ॥२६॥
 
त्याचें आलें प्रत्यंतर । मला येथें साचार ।
धन्य धन्य हा साधुवर । त्रिकालज्ञ महात्मा ॥२७॥
 
न बोलतां माझा नवस । जाणतील हे पुण्य पुरुष ।
त्याचें प्रत्यंतर यावयास । अवधी उरला थोडका ॥२८॥
 
मंडळींनीं गोसाव्याला । पुढें आणोन उभा केला ।
तों महाराज वदले तयाला । काढ झोळीची पोटळी ॥२९॥
 
जी तीन महिनेपर्यंत । रक्षण केलीस झोळींत ।
त्या पोटळीचें आज येथ । होवो दे गा पारणें ॥३०॥
 
गोसावी पदीं लागला । गहिंवर त्यासी दाटला ।
गडबडा लोळूं लागला । बालकापरी स्वामीपुढें ॥३१॥
 
महाराज म्हणती गोसाव्यास । पुरे आतां उठोन बैस ।
पोटोळीच्या बुटीस । काढ बाहेर झोळीच्या ॥३२॥
 
नवस केलास ते वेळीं । नाहीं लाज वाटली ।
आणि आतां कां ही लाविली । चाळवाचाळवी निरर्थक ॥३३॥
 
गोसावी होता महा धूर्त । तो बोलला भीत भीत ।
जोडुनीया दोन्ही हात । ऐसें नम्र वाणीनें ॥३४॥
 
मी बुटी काढितों । नवस आपुला फेडितों ।
परि मागणें मागतों । एक तें द्या दीनाला ॥३५॥
 
आठवण माझ्या बुटीची । नित्य राहावी आपणा साची ।
हीच इच्छा मानसींची । आहे ती पूर्ण करा ॥३६॥
 
तुम्हां बुटीचें प्रयोजन । नाहीं हें मी जाणतों पूर्ण ।
परी बालकाची आठवण । राहाया बुटी स्वीकारा ॥३७॥
 
भक्त जी जी इच्छा करीत । ती ती ज्ञाता पुरवीत ।
अंजनीचा वृत्तान्त । आणा मनीं आपुल्या ॥३८॥
 
अंजनी होती वानरी । तिनें प्रार्थिला त्रिपुरारी ।
कीं तुम्हीं यावें माझ्या उदरीं । वानर होऊन शंकरा ! ॥३९॥
 
तें हरानें मानिलें । महारुद्र पोटीं आले ।
अंजनीचे पुरविले । मनोरथ चंद्रमौळींनीं ॥४०॥
 
तेथें शंकराकारण । आड ना आलें वानरपण ।
तेवीं माझ्या बुटीची आठवण । राहाया तीतें स्वीकारा ॥४१॥
 
त्यांतून तुम्ही कर्पूरगौर । साक्षात् आहां शंकर ।
म्हणून बुटीचा अव्हेर । करुं नको दयाळा ! ॥४२॥
 
ज्ञानवल्ली शंकरानें । म्हटलें आहे इजकारणें ।
ही इतरा आणील उणें । परि भूषण तुम्हांला ॥४३॥
 
महाराज किंचित्‌ घोटाळले । परि अखेर होय म्हणाले ।
माय पुरवी बालक-लळे । वेडेवांकुडे असले जरी ॥४४॥
 
गोसाव्यानें बुटी काढिली । हातावरी घेवोन धुतली ।
चिलमींत घालून पाजिली । पुण्यपुरुष गजानना ॥४५॥
 
ऐसा बुटीचा वृत्तान्त । काथलीसे कारणासहित ।
तो आणून ध्यानांत । विचार करणें प्रत्येकीं ॥४६॥
 
कांहीं दिवस राहोन । गेला गोसावी निघोन ।
आपणां धन्य मानोन । रामेश्वराकारणें ॥४७॥
 
ऐसी गांजाची पडली प्रथा । ते ठायीं तत्त्वतां ।
परी व्यसनाधीनता । नच आली समर्थांतें ॥४८॥
 
पद्मपत्राचियेपरी । ते अलिप्त होते निर्धारी ।
नये कोणास त्याची सरी । खरेंच अती थोर ते ॥४९॥
 
वेदऋचा अस्खलित । उदात्त-अनुदात्त स्वरांसहित ।
कधीं म्हणाव्या मुखीं सत्य । कधीं त्यांचें नांव नसे ॥५०॥
 
वेदाक्षरें पडतां श्रवणीं । साशंक व्हावें वैदिकांनीं ।
याच एका अनुमानीं । गजानन होते ब्राह्मण ॥५१॥
 
कधीं गवयासमान । अन्य अन्य रागांतून ।
एकच पदातें गाऊन । दाखवावें निजलीलें ॥५२॥
 
चंदन चावल बेलकी पतीया । प्रेम भारी या पदा ठाया ।
ते आनंदांत येवोनिया । वरच्यावरी म्हणावें ॥५३॥
 
कधीं गणगणाचें भजन । कधीं धरावें नुसतें मौन ।
कधीं राहावें पडून । शय्येवरी निचेष्टित ॥५४॥
 
कधीं वागावें पिशापरी । कधीं भटकावें कांतारीं ।
कधीं शिरावें जाऊन घरीं । एखाद्याच्या अवचीत ॥५५॥
 
असो त्या शेगांवांत । जानराव देशमुख विख्यात ।
होता त्याचा प्राणान्त । व्हावयाचा समय आला ॥५६॥
 
व्याधी शरीरीं वळावली । शक्ति पार निघून गेली ।
प्रयत्‍नांची कमाल केली । वैद्यांनीं ती आपुल्या ॥५७॥
 
नाडी पाहोन अखेर । आप्ता कळविला समाचार ।
प्रसंग आहे कठीण फार । नसे आशा वांचण्याची ॥५८॥
 
आम्हीं प्रयत्‍न केले अती । परी यश ना आलें तिळरती ।
यांना आतां घोंगडयावरती । काढोन ठेवा हेंच बरें ॥५९॥
 
तें ऐकतां अवघे आप्त । दुःख करती अत्यंत ।
जानरावा आम्हां प्रत । सोडून तूं जाऊं नको ॥६०॥
 
तुझ्याप्रीत्यर्थ नवस केले । नाना दैवतांलागीं भले ।
परी न कोणी पावले । हाय हाय रे दुर्दैवा ॥६१॥
 
वैद्यानें टेकिले हात । प्रयत्‍न झाले कुंठित ।
आतां अखेरच्या यत्‍नाप्रत । करोन पाहूं एक वेळा ॥६२॥
 
बंकटलालाचिये घरीं । आहेत एक साक्षात्कारी ।
यांच्या योगें शेगांव नगरी । झाली प्रती पंढरपूर ॥६३॥
 
साधूनें आणिल्या मनांत । काय एक नाहीं होत ।
सच्चिदानंदबाबाप्रत । ज्ञानेश्वरानें उठविलें ॥६४॥
 
त्याचें पाहूं प्रत्यंतर । जा जा कोणी जोडा कर ।
नका करुं रे उगा उशीर । वेळ अंतसमायाची ॥६५॥
 
तें ऐकोनी एक आप्त । आला बंकटसदनाप्रत ।
जानरावाची हकीकत । बंकटलाला कथन केली ॥६६॥
 
जानराव देशमुखाचा । समय अंतकाळाचा ।
आला आहे जवळी साचा । म्हणून आलों तुम्हांकडे ॥६७॥
 
महाराजांचें चरणतीर्थ । द्या कृपा करोनी मजप्रत ।
तें तीर्थ नोहे अमृत । होईल वाटे जानरावा ॥६८॥
 
बंकटलाल म्हणे त्यावरी । ही गोष्ट न माझ्या करीं ।
तुम्ही करावी अत्यादरीं । विनवणी आमुच्या वडिलाला ॥६९॥
 
जसें त्यानें सुचविलें । तैसें आप्तें तात्काळ केलें ।
भवानीरामा विनविलें । द्याया तीर्थ समर्थांचें ॥७०॥
 
भवानीराम सज्जन । होता मनाचा दयाळु पूर्ण ।
दुसर्‍याचें दुःख ऐकून । सज्जन तेच विव्हळ होती ॥७१॥
 
प्याल्यामध्यें भरुन पाणी । समर्थांच्या लाविलें चरणीं ।
आणि केली विनवणी । तीर्थ देतो जानरावा ॥७२॥
 
समर्थें तुकाविली मान । तीर्थ पाजिलें नेऊन ।
जानरावाकारण । घरघर घशाची बंद झाली ॥७३॥
 
हात हालवूं लागला । किंचित् डोळा उघडीला ।
उतार पडूं लागला । तीर्थप्रभावें देशमुखासी ॥७४॥
 
तो पाहतां प्रकार । आनंदले नारीनर ।
सत्पुरुषाचा अधिकार । आला कळून सर्वांसी ॥७५॥
 
मग औषधी बंद केली । तीर्थीं भिस्त ठेविली ।
ज्या-योगीं लाभती झाली । आरोग्यता जानरावा ॥७६॥
 
आठ दिवसांमाझारीं । जानराव झाला पहिल्यापरी ।
भवानीरामाचीये घरीं । आला दर्शना समर्थांच्या ॥७७॥
 
पहा संतांचें चरणतीर्थ । साधनांत झालें अमृत ।
संत न ते साक्षात्‌ । देव कलीयुगीचे ॥७८॥
 
येथें एक ऐसी शंका । उत्थान पावे सहज देखा ।
श्रीगजाननासारिखा संत होता शेगांवीं ॥७९॥
 
मग तो तेथें असतांना । गेलें न पाहिजे कोणी जाणा ।
यमाजी पंताचीया सदना । परि हाच आहे कुतर्क ॥८०॥
 
संत मृत्यु ना टाळिती । निसर्गाप्रमाणें वागती ।
परि संकटांतें वारिती । अगांतुक असल्यास ते ॥८१॥
 
सच्चिदानंदबाबासी । ज्ञानेशें उठविलें नेवाशासी ।
परि ते अखेर आळंदीसी । देह ठेविते झाले हो ॥८२॥
 
याचें रहस्य इतुकेंचि आहे । हें गंडांतर टाळिती पाहे ।
तें टाळणें कांहींच नोव्हे । अशक्य संत पुरुषाला ॥८३॥
 
मृत्यूचे तीन प्रकार । आहेत जगीं साचार ।
त्यांचीं नांवें क्रमवार । देतों तुम्हांकारणें ॥८४॥
 
आध्यात्मिक आधिभौतिक । आणि तिसरा तो आधिदैविक ।
त्या तिघांमाजीं बलिष्ठ देख । आध्यात्मिक मृत्यु असे ॥८५॥
 
आधिभौतिकाची तयारी । कुपथ्यानें होते खरी ।
नाना प्रकारच्या शरीरीं । व्याधि निर्माण होतात ॥८६॥
 
त्यांचा जोर झाल्यावर । मृत्यु येतो अखेर ।
त्या मृत्यूचा परिहार । करितां येतो औषधीनें ॥८७॥
 
मात्र औषधी देणारा । शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा ।
औषधीचा पसारा । आहे अवगत जयासी ॥८८॥
 
एसा वैद्य भेटल्यास । आधिभौतिकाचा होय नाश ।
तैसे आधिदैविकास । नवस सायास घालविती ॥८९॥
 
हें गंडांतर रुपाचें । मृत्यु दोन प्रकारचे ।
भौतिक आणि दैविक साचे । हे आहेत ख्यात जगीं ॥९०॥
 
मृत्यु जो कां आध्यात्मिक । तो कवणाच्यानें न टळे देख।
पाहा अर्जुनाचा बालक । कृष्णासमक्ष पडला रणीं ॥९१॥
 
तैसा जानरावाचा । मृत्यु गंडांतर स्वरुपाचा ।
होता तो टाळिला साचा । समर्थतीर्थ देवोनिया ॥९२॥
 
म्हणजे गंडांतरा कारण । निवारिती साधुचरण ।
तेंच आलें घडोन । शेगांवामाझारीं ॥९३॥
 
कांहीं मृत्यु नवसांनीं । टाळिता येती या जनीं ।
परी तो नवस श्रद्धेनीं । केला पाहिजे विबुध हो ! ॥९४॥
 
श्रद्धा पूर्ण असल्यावरी । तीच मृत्यु टाळी खरी ।
श्रद्धाच अवघ्या माझारीं । सर्व बाजूंनीं श्रेष्ठ असे ॥९५॥
 
चरणतीर्थ साधूचें । तेंही टाळी मृत्यु साचे ।
वरील दोन प्रकारचे । परी तो साधु पाहिजे ॥९६॥
 
साधू असल्या वेषधारी । ऐसी न होय गोष्ट खरी ।
माती न होय कस्तूरी । हें ध्यानीं असूं द्या ॥९७॥
 
षड्‌विकार धुतल्याविना । अंगीं साधुत्व येईना ।
आणि साधूविण होईना । अघटित कृत्य केव्हांही ॥९८॥
 
म्हणून बहुरुप्याकारण । जपणें आहे अवश्य जाण ।
उगीच पाहून पिवळेपण । सोनें पितळेस मानूं नका ॥९९॥
 
गजानन नव्हते वेषधारी । ते पूर्ण साक्षात्कारी ।
म्हणून तीर्थानें झाली बरी । व्याधि जानरावाची ॥१००॥
 
देशमुख बरा झाल्यावर । भंडारा घातिला थोर ।
साधुप्रीत्यर्थ साचार । बंकटलालाचिये घरीं ॥१॥
 
तीर्थें देशमुख बरा झाला । परी स्वामीशीं पेंच पडला ।
त्यांनीं मनासी विचार केला । तो ऐका येणेंरितीं ॥२॥
 
कडकपणा धरल्याविना । ही उपाधी टळेना ।
स्वार्थसाधु प्रापंचिकांना । साधुत्वाची चाड नसे ॥३॥
 
त्या दिवसापासून । आणूं लागलें अवसान ।
स्वामी महाराज दयाघन । वरपांगी कडक झाले ॥४॥
 
हा त्यांचा कडकपणा । असह्य झाला इतरांना ।
परी त्यांच्या भक्तांना । कांहीं न त्याचें वाटलें ॥५॥
 
जेवीं नरसिंह अवतार । इतरांसी वाटला क्रूर ।
परी कयाधूचा कुमार । मुळीं न भ्याला त्या रुपा ॥६॥
 
वाघीण इतरा भयंकर । परी तिचें जें का असेल पोर ।
तें तिच्याच अंगावर । निर्भयपणें क्रीडा करी ॥७॥
 
असो आतां गोष्ट दुसरी । सांगतों मी तुम्हां खरी ।
कस्तुरीच्या शेजारीं । बसल्या माती मोल पावे ॥८॥
 
चंदनाचा शेजार । असला थोडा बहुत हिवर ।
वासित होतो साचार । हा न्याय निसर्गाचा ॥९॥
 
वासित हिवर झालेला । चंदन मानील आपणाला ।
तरी त्याच्या फजितीला । पारावार न राही पुढें ॥११०॥
 
जेथें ऊंस निपजतो । तेथेंच निवडुंग उगवतो ।
जेथें मोगरा वाढतो । तेथेंच येतो पिंगूळ ॥११॥
 
जेथें साधु सज्जन । तेथेंच मैंद निर्माण ।
हिरे गारा एकवटून । खाणीमाजी राहाती ॥१२॥
 
स्थान एक म्हणून । किंमत नाहीं समान ।
तेज हिर्‍याचें हिर्‍यालागून । भूषवी न गारेला ॥१३॥
 
गार ती गारची राही । पायाखालीं तुडविली जाई ।
ऐसी स्थिति कधीं न येई । अमोलिक हिर्‍याला ॥१४॥
 
श्रीगजाननाचे सन्निध । ऐसाच होता एक मैंद ।
संतसेवा हाच मद । अंगीं ज्याच्या भरला असे ॥१५॥
 
तो सेवा करी वरी वरी । भाव निराळा अंतरीं ।
मिठाई पेढे सावरी । समर्थांच्या नांवावर ॥१६॥
 
भक्तगणांस ऐसे म्हणे । मी समर्थकृपेचें पोसणें ।
प्रत्येक काम माझ्याविणें । होत नाहीं ये ठायां ॥१७॥
 
मी कल्याण समर्थांचा । अत्यंत आहे आवडीचा ।
कधीं न खालीं जावयाचा । शब्द माझा त्यांच्यापुढें ॥१८॥
 
चिलीम त्यांची मीच भरी । खाण्यापिण्याची तयारी ।
निजांगें मीच करी । अत्यंत मी आवडीचा ॥१९॥
 
ऐसें लोकांस सांगतसे । आपला सवरात करीतसे ।
त्या अधमाचें नांव असें । माळी विठोबा घाटोळ ॥१२०॥
 
महाराज स्वयमेव शंकर । हा बनला नंदिकेश्वर ।
हमेशा करी गुरगुर । आल्या गेल्या भक्तांवरी ॥२१॥
 
तें अंतर्ज्ञानांनीं । जाणिलें सर्व समर्थांनीं ।
कौतुक केलें एके दिनीं । तें ऐका विबुध हो ॥२२॥
 
परस्थ कांहीं मंडळी । शेगांवीं दर्शना आली ।
तों मूर्ति होती निजलेली । समर्थांची शय्येवर ॥२३॥
 
हिय्या कुणाचा होईना । जागे करण्या समर्थांना ।
मंडळीस होती जाणा । त्वरा पुढें जाण्याची ॥२४॥
 
ते कुजबुज करुं लागले । विठोबाला विनविते झाले ।
विठोबा आम्हां पाहिजे गेलें । येथून आतांच परगांवा ॥२५॥
 
काम निकडीचें आहे फार । कैसा करावा विचार ।
महाराज तों शय्येवर । असती निद्रिस्त जाहले ॥२६॥
 
त्यांचें दर्शन घेतल्याविना । आमचा पाय निघेना ।
हें अवघड काम होईना । तुझ्यावांचून ये ठायीं ॥२७॥
 
तूं समर्थांच्या शिष्यांत । मुख्य धोरणी महा धूर्त ।
तुला आम्ही जोडितों हात । एवढें काम करावें ॥२८॥
 
ऐशा त्या स्तुतींनीं । विठोबा फुगून गेला मनीं ।
त्यानें जाऊन तत्‌क्षणीं । महाराजांस उठविलें ॥२९॥
 
मंळळींचें काम झालें । परी संकट ओढवलें ।
घाटोळ विठोबावरी भले । कर्म जैसें तैसें फल ॥१३०॥
 
समर्थांच्या हातीं काठी । एक होती भली मोठी ।
तीच त्यांनीं घातली पाठीं । त्या विठोबा माळ्याच्या ॥३१॥
 
म्हणती बेटा माजून गेला । आपुली स्थिति विसरला ।
या लुच्च्यानें आरंभीला । उघड उघड व्यापार कीं ॥३२॥
 
मला लावितो उपाधी । घंटे आणून बांधितो मठीं ।
घुमारे घाली कधीं कधीं । ऐसा अती नीच हा ॥३३॥
 
त्या घुमर्‍याचें बक्षीस । घे मी देतों तुला खास ।
तुजवरी केल्या कृपेस । होईन प्रभूचा अपराधी ॥३४॥
 
सोमला साखर मानूं नये । विषा जवळ करुं नये ।
तस्करासी लेखूं नये । निजकंठींचा ताईत ॥३५॥
 
ऐशा रीतीं ठोकला । छडयाखालीं घाटोळाला ।
विठोबा तो पळाला । पुनः न आला मागुती ॥३६॥
 
खरे जे कां असती संत । ते ते ऐसेंच करितात ।
ढोंगी मात्र जातात । अशाचिया करांमध्यें ॥३७॥
 
म्हणजे अधिकारावांचून । ढोंगी बैसती होऊन ।
संत नादीं लावण्या जन । ऐसे प्रकार किती तरी ॥३८॥
 
मतलबी त्यांना साथ देती । उदो उदो त्यांचा करिती ।
भलभलते सांगताती । साक्षात्कार ढोंग्यांचे ॥३९॥
 
तेणें दोघांचें काम होई । अपार पैसा मिळविला जाई ।
परी ही प्रथा बरी नाहीं । समाज जाईल रसातळा ॥१४०॥
 
खरे जे कां असती संत । ईश्वराचे निःसीम भक्त ।
त्यांना न मुळीं आवडत । सान्निध्य त्या षंढाचें ॥४१॥
 
पतिव्रतेसी शेजार । कसबिणीचा कां पटणार ? ।
सोन्याप्रती अलंकार । काय शोभती कथलाचे ? ॥४२॥
 
संत शठातें राखिती । परी न त्याला महत्त्व देती ।
ती जगांतील एक व्यक्ति । कृतकर्म भोगण्या आली असे ॥४३॥
 
ऐसें मानसीं समजून । त्याविषयीं धरिती मौन ।
जेवीं निवडुंगालागून । स्थान भूमी देते हो ॥४४॥
 
मोगरा निवडुंग आणि शेर । हीं जमीनीचीं लेंकरं ।
परि किंमतीचा प्रकार । निरनिराळा तो तिघांचा ॥४५॥
 
मोगर्‍याचें संरक्षण । करिती निवडुंगाचें दहन ।
चिलटांसाठीं बांधून । शेर ठेविती दारावरी ॥४६॥
 
तेवीं संत भूमिपरी । रक्षण अवघ्यांचें करिती जरी ।
किंमतीमाजीं ठेविती परी । गुणांप्रमाणें भेद पाहा ॥४७॥
 
नशीब विठोबा घाटोळाचें । अति खडतर होतें साचें ।
पाय लाभून साधूचें । दैवें दूर झालें कीं ॥४८॥
 
जरी तो ना ढोंग करिता । तरी योग्यतेप्रती चढता ।
संतांची ती योग्यता । त्यानें मुळीं ना जाणिली ॥४९॥
 
कल्पवृक्षाच्या तळवटीं । बसून इच्छिली गारगोटी ।
वा मागितली करवंती । कामधेनूपासून ॥१५०॥
 
ऐसें न कोणी करावें । संतापासीं राहून बरवें ।
तेथें विचारा ठेवावें । अहर्निशीं जागृत ॥५१॥
 
हा दासगणूविरचित । श्रीगजाननविजय ग्रंथ ।
तारक होवो भवाब्धींत । अवघ्या भाविकांकारणें ॥१५२॥
 
श्रीहरिहरापर्णमस्तु ॥ शुभं भवतु ॥
 
॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजाननविजयग्रंथअध्याय४

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २