स्वातंत्र्पूर्व काळात एका खेडय़ात घडलेली ही सत्य घटना. गौरी-गणपतीचे उत्साहाचे दिवस होते. गणपती आले होते आणि घरोघरी ग्रामीण स्त्रियांची गौरी आणण्याची लगबग सुरू होती. जानकीकाकूही उत्साहाने कामाला लागल्या. त्यांनी महालक्ष्मी (गौरी) साठी लाडू, करंज्या, अनारसे, चकली इत्यादी पदार्थ हौसेने बनवले होते. त्यांचे सोवळे-ओवळे ही फारच कडक होते. महालक्ष्मीसाठी केलेल्या फराळाचे पदार्थ महालक्ष्मी सण पार पडल्याशिवाय कोणीही खायचे नाही, असा त्यांचा दंडकच होता. विशेष म्हणजे तंच आज्ञाबाहेर जाण्याची घरात कुणाची प्राज्ञा नव्हती.
झाले! जानकीकाकूंनी गौरी आणल्या. त्याकाळात खेडय़ातील पद्धतीप्रमाणे कणगीमध्ये सगळेच लाडू-करंज्या इत्यादी पदार्थ भरून टाकले आणि त्या कणगीवर गौरीही बसवल्या. गौरींना सुंदर साडय़ा घालून दागिने घातले. सारे काही मनासारखे झालच्याचे समाधानाने त्यांनी सुस्कारा सोडला. त्याकाळी जानकीकाकूंना चांगली सहा-सात मुले-मुली होती. ती सर्व ‘लाडू खायला दे’ असा सारखा हट्ट करत होती. पण या बाईचे मन काही द्रवले नाही. शिवाय गौरीने खाण्याच्या (?) आधी मुलांनी लाडू खाल्ले तर ती रागावेल, आणि घरात काहीतरी वाईट होईल ही अज्ञानमूलक भीती होतीच.