Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तरसोदचा जागृत गणपती

- संदीप पारोळेकर

तरसोदचा जागृत गणपती
PR
जळगाव- भुसावळ महामार्गावर जळगावपासून आठ किमी अंतरावर तरसोद फाटा आहे. या फाट्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर शिवकालीन गणरायाचे जागृत देवस्थान आहे. संपूर्ण जळगाव जिल्हयातील भाविक संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी, अंगारिका चतुर्थी तसेच गणेशोत्सवात या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. गणपती मंदिराचे द्वार अगदी लहान आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यासाठी वाकून जाऊन दर्शन घ्यावे लागते. श्रीगणेशाची मूर्ती 5 ते 6 फूटाची असून तेजस्वी आहे.

जिल्ह्यातील नवदाम्पत्य आवर्जून या गणपतीचे दर्शन झेतात व त्यांच्या संसाराला लागतात. जळगावच्या निवडणुकीच्या प्रचाराचे नारळही तरसोदच्या जागृत गणपतीलाच आधी फोडले जातात. गावाच्या बाहेर शेती शिवारात असलेल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अक्षरश: रिघ लागते. नशिराबाद येथील परम सिद्द झिपरू अण्णा महाराज हे देखील येथे येत असत.

नशिराबाद येथील भाविक पूर्वी संकष्टी चतुर्थीला पद्‍मालय येथे दर्शनासाठी नित्य नेमाने जात असत. त्यावेळी तेथे सिध्द पुरूष वास्तव करीत होते. त्यांनी पांडवकालीन पद्मालय येथील गणपती मंदिराचा जीर्णोध्दार केला होता. एके दिवशी नशिराबाद येथील भाविकांना या सिध्दपुरूषांने सांगितले की पद्मालय येथील देवालयाचे पूर्ण स्वरूप नशिराबाद जवळ असलेल्या तरसोद या गावी आहे.

त्यानंतर नशिराबादचे भाविक तरसोद येथे दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला येऊन जागृत गणपतीचे पूजन करू लागले. काही दिवसांनी स्वत: पुज्य श्री गोविंद महाराज यांनी तरसोदच्या गणपतीची महापूजा केली. मराठ्याच्या फौजा उत्तरेकडे मुलूखगिरी करण्यासाठी जात, तेव्हा या परिसरात विश्रांतीसाठी थांबत असत. त्याकाळी तरसोद- नशिराबाद या मार्गावर छोटेसे गणेश मंदिर होते. मन्यारखेडे, भादली बु।।, खेडी व नशिराबाद परिसरातील भाविक देवदर्शनाला यायचे. त्यावेळी हा भाग नाईक निंबाळकर या पंचकुळी मराठा सरदाराच्या ताब्यात होता. शिवरायांची पहिली पत्‍नी येसूबाई नाईक निंबाळकर घराण्यातीलच होत्या. असा ऐतिहासिक वारसा देखील या जागृत गणरायाला आहे.

तरसोद गणपतीच्या विश्वस्थ मंडळाच्या वतीने येथे मंदिराच्या मागील बाजूस धर्मशाळा तसेच मोठे दोन सभामंडप बांधण्यात आले आहे. आता तर विश्वस्थ मंडळाच्या वतीने मंदिरावर सामुहिक विवाहाची सोय करण्यात आली आहे. लग्नसराईत दररोज एका वेळी चार ते पाच विवाह लागतील अशी सुविधा करण्यात आली आहे. मुक्ताईनगरला मुक्ताबाईच्या छोट्या वारीला जाणारे वारकरी तसेच शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणारी पायी वारी येथे दर्शनासाठी येथे थांबतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi