Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकचा ढोल्या गणपती

सुखदा राजपाठक, नाशिक

नाशिकचा ढोल्या गणपती
PRPR
गणपती तुझे नाव चांगले
आवडे बहुचित्त रंगले ।
प्रार्थना तुझी गौरी नंदना
हे दयानिधी श्री गजानना ॥

मंदिराचे शहर व धार्मिक महत्त्व असलेल्या नाशिकमध्ये काही प्रसिध्द गणपती मंदिरे आहेत. त्यापैकी एक आहे ढोल्या गणपती. शहरातील सर्वांत भव्य गणपती असल्याने त्याच्या भव्यतेमुळेच त्याला 'ढोल्या गणपती' म्हणून संबोधले जाते. लंबोदर, विशालकाय अशी विशेषणे शोभतील अशी ही भव्य मूर्ती आहे. नाशिकमधील अशोकस्तंभाजवळ हे मंदिर आहे. पूर्वीच्या काळी गावाबाहेर, हद्दीवर मारुती, गणपती, भैरवनाथाची मंदिरे स्थापन करण्याची परंपरा आहे. ही सर्व संकटमोचन व विघ्नहर्ते असल्याने त्यांची मंदिरे गावाबाहेर स्थापन होत. या परंपरेनुसार ढोल्या गणपतीचे मंदिर गावाबाहेर स्थापण्यात आले. पूर्वी नाशिक शहराची हद्द अशोकस्तंभापर्यंतच होती; परंतु आता शहराच्या वाढत्या विस्तारीकरणाने हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आले आहे.

या मंदिराची स्थापना सुमारे तीनशे वर्षांपूर्वी करण्यात आली. मंदिरातील ढोल्या गणपतीची मूर्ती अतिशय प्राचीन व प्रभावी आहे. तिची उंची ७ फूट उंच व ४ फूट रुंद आहे. ही मूर्ती काळ्या दगडाची असून, तिला नित्याने शेंदूर लावल्याने मूर्ती शेंदरी रंगाची झाली आहे. या मंदिराचा गाभारा मोदकासारखा आहे. १० ते १५ वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोध्दार केला गेला.

ढोल्या गणपती अत्यंत मानाचा, नवसाला पावणारा व प्रचंड श्रध्दा असलेला असल्याने संकष्टचतुर्थीच्या दिवशी असंख्य भाविक गजाननाचे दर्शन घेण्यास येतात. या दिवशी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम केले जातात. तसेच या मंदिरात गणेश उत्सवही मोठा प्रमाणात साजरा केला जातो. यावेळेस मंदिरात उत्सवाचे वातावरण असते. या मंदिराची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. या मंदिराचे पिढीजात पुजारी म्हणून श्री. नारायणराव श्रीपतराव गायकवाड व त्यांचे कुटुंबिय मंदिराची देखभाल करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi