Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजूरचा गणपती

राजूरचा गणपती
MH News
MHNEWS
मराठवाडा ही संतांची भूमी समजली जाते. या भूमीत अनेक संत-महंतांनी भक्तीचा मळा फुलवला. अनेक श्रध्दास्थाने असणार्‍या मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील राजूरचा गणपती हेही असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान आहे.

जालना जिल्हयातील राजूर हे गणपतीचे पूर्ण पीठ मानले जाते. महाराष्ट्रात मोरगांव, चिंचवड व राजूर ही श्रीगणेशाची तीन पूर्ण पिठे तर पद्मालय हे अर्ध पीठ मानले जाते. अशा प्रकारची नोंद गणेशपुराणात आढळते. राजूर या गावाची नोंद स्थान पोथीतही आहे. स्थानपोथीतील वर्णनाप्रमाणे राजौरी (सध्याचे राजूर) या गावाच्या पश्चिमेतील एका देवळात चक्रधर स्वामी थांबत असत.

जालना -भोकरदन राज्यमार्गावर राजूर हे गाव आहे. गणेश मंदिराची रचना गर्भगृह, त्यापुढील अंतराळ व सभागृह अशी पूर्वी असावी. हे मंदिर यादवकालिन असल्याचे मानले जाते. सध्या यादवकालिन गाभारा कायम असून पुढील सभागृह नव्याने बांधण्यात आलेले आहे. यादवकाळात उंच टेकडीवर असलेल्या या जागेत श्रीगणेशाशिवाय शिव व अन्य देवतांच्या मंदिरांचा समुह त्याकाळी असावा.

सध्या येथील गणेश मंदिर हे प्रमुख मानले जाते. या मंदिराचे महत्व पेशवेकाळापासून वाढत गेले असावे असे मानले जाते. या मंदिराच्या परिसरात असलेली दीपमाळ ही लक्ष वेधून घेणारी आहे. श्री गणेश मंदिराच्या गाभा-यात अखंड दीप प्रज्वलित असतात. दर चतुर्थीच्या दिवशी या मंदिराच्या परिसरात भाविकांची मोठया प्रमाणावर गर्दी होते. गेल्या कांही वर्षापासून मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने या मंदिराचे भव्य आणि अत्याधुनिक स्वरुपात जीर्णोव्दार करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.

जालना, बुलडाणा, जळगांव, परभणी, औरंगाबाद इत्यादी अनेक जिल्हयांमधून त्याचप्रमाणे राज्याच्या अन्य भागांमधून आणि राज्याबाहेरुनही भाविक प्रचंड संख्येने राजूर येथील श्री गणेशाच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात.या मंदिराचा जीर्णोव्दार करतांना मूळ गाभारा कायम ठेवून तयार करण्यात आलेला आराखडा अतिशय लक्ष वेधक अशा स्वरुपाचा आहे. भाविकांची दरवर्षी वाढणारी गर्दी पाहून हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्या आणि दानशूर मंडळीचे सहकार्य घेऊन या मंदिराचा जीर्णोध्दार करण्याचे काम सुरु आहे.

राज्याच्या विविध भागातून येथे मोठ्या प्रमाणात येणार्‍या भाविकांमुळे राजूरच्या विकासालाही गती मिळाली आहे. प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. वाहतूक आणि अन्य साधनांमध्ये वाढ होत असल्याने राजूर येथील बाजारपेठ आणि अन्य व्यापार भरभराटीला आला आहे.
(साभार- महान्यूज)

Share this Story:

Follow Webdunia marathi