काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रातील दारूण पराभव पाहता नैतिकतेची थोडी तरी चाड असेल तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणुकांना सामोरे जावे असे आव्हान महायुतीने दिले आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना भाजप नेते विनोद तावडे आणि आरपीआयचे रामदास आठवले यांनी म्हटले की तातडीने विधानसभेच्या निवडणुका घेण्यात याव्यात. रामदास आठवले म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा महायुतीच्या उमेदवारांचा विजय 80 टक्के मतदारसंघात निश्चित आहे. विनोद तावडे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक मान्य करत नव्हते. पण जाहीर झालेले निकाल हेच दर्शवत आहेत की देशभर मोदींची जबरदस्त लाट होती आणि महाराष्ट्रात त्याच्या जोडीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कुशासन, भ्रष्टाचार, शेतकर्यांवर झालेले अन्याय या सार्याची जोड मिळाली आणि देशभरातील लाट महाराष्ट्रात त्सुनामीङ्कध्ये परिवर्तीत झाली. मो दींनी विकासाचे राजकारण सुरू केलेले आहे. त्यादृष्टीने शिवसेना-भाजप महायुतीच्यावतीने आम्ही पुढच्या काही दिवसातच महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू पिंट्र तयार करू आणि त्या आधारे विधानसभा निवडणुकीत मते मागू. लोकसभेच्या या प्रचंड विजयामुळे आम्ही हुरळून जाणार नाही आणि विधानसभेसाठी त्याच जिद्दीने जनतेत जाऊन काम करू. तावडे म्हणाले की, 77 लाही असाच मोठा विजय काँग्रेसच्या विरोधात मिळाला होता पण या वेळेचा मोठा विजय आहे.
भाजप नेते राम नाईक म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्ताधीश हे अत्यंत असंवेदनशून्य झाले होते आणि त्यात ते अहंकाराने वागत होते आणि त्यामुळेच त्यांचा दारूण पराभव झाला आहे.