भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आनंदीबेन पटेल या आज (गुरुवार) दुपारी 12 वाजता गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची व गोपनियतेची शपथ घेतली. नरेंद्र मोदींनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदी आनंदीबेन पटेल यांच्या रुपात पहिली महिला मुख्यमंत्री विराजमान होणार आहे .
राज्यपाल कमला बेनीवाल यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्रीपदासह आमदारकीचा राजीनामा सादर केला. त्यानंतर गुजरात सरकारच्या विधीमंडळाच्या नेतेपद निवडीसाठी मोदींच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात आनंदीबेन यांचे नाव जाहीर करण्यात आले. आनंदीबेन यांचे नाव विधीमंडळ बैठकीत पुढे येताच अमित शहा यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा शेतकरी महिलेला बहुमान मिळत आहे. आनंदीबेन या गुजरातच्या 15 व्या मुख्यमंत्री असतील. तसेच दुपारी 12 नंतर त्यांनी शपथविधीचा मुहूर्त काढला आहे.
दरम्यान, गुजरातचे तब्बल 13 वर्षे 7 महिने सलग मुख्यमंत्रीपद उपभोगल्यानंतर मोदींनी आज राजीनामा दिला. मोदी येत्या 26 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे.
आनंदीबेन जेठाभाई पटेल या अमेहसाना जिल्ह्यातल्या विजापूर तालुक्यातल्या खारोड गावातील रहिवासी आहेत. 1987 पासून भाजपच्या सदस्य असलेल्या आनंदीबेन 1994 मध्ये गुजरातमधून राज्यसभेच्या खासदार झाल्या होत्या.
1998 पासून गुजरातमध्ये त्या सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. अहमदाबादमधल्या मंडल विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून त्या कार्यरत आहेत. मोदींच्या सरकारमधल्या महत्त्वाच्या मंत्री म्हणून कार्यरत आहेत. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळात त्या एकमेव महिला मंत्री आहेत. मोदींच्या जवळच्या मानल्या जाणा-या आनंदीबेन यांच्याकडे सध्या रस्ते आणि इमारत, नगरविकास, गृहनिर्माण, आपत्ती व्यवस्थापन ही खाती आहेत.