16 लोकसभा निवडणुकीच्या अंतिम अर्थात नवव्या टप्प्यात आज (सोमवार) 41 जागांवर मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाली असून यात वाराणसीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपचे नरेंद्र मोदी, 'आप'चे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय यांच्यांत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वाराणसीत विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे.
नवव्या टप्प्यात बिहारमध्ये 6 जागांसाठी 90 उमेदवार, उत्तर प्रदेशात 18 जागांसाठी 328 उमेदवार रिंगणात आहेत. जगदंबिका पाल, केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, माफिया डॉन मुख्तार अन्सारी, कलराज मिश्र, योगी आदित्यनाथ, रविकिशन, नीरज शेखर आदी दिग्गजांचे भाग्य मतदार इव्हीएममध्ये बंद करणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये 17 जागांसाठी 188 उमेदवार रिंगणात आहेत. यात केंद्रीय मंत्री अधीररंजन चौधरी, तपन सिकदर, सुदीप बंडोपाध्याय, सौगत रॉय, दिनेश त्रिवेदी, तापस पाल, दीपक अधिकारी (देव), अभिषेक बॅनर्जी, सुभाषिनी अली, जादूगर पीसी सरकार ज्यु आदींचा समावेश आहे.
रघुवंश प्रसाद सिंह, चित्रपट दिग्दर्शक-निर्माते प्रकाश झा हे नशीब आजमावरत आहेत. एकूण नऊ कोटींपेक्षा अधिक मतदार 606 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करतील. यासोबतच 7 एप्रिलपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रिया 9 टप्प्यांत संपणार आहे. मतमोजणी 16 मे रोजी होईल. आठव्या टप्प्यात 402 जागांवर विक्रमी सरासरी 66 टक्के मतदान झाले आहे.