लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश म्हणजे देशातील सर्वात लहान मतदारसंघ आहे. येथे लोकसभेची एकच जागा आहे. सर्वसाधारणपणे आपल्या देशातील एक खासदार हा सरासरी 15.5 लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करत असतो; मात्र लक्षद्वीपमधून निवडून येणारा खासदार हा केवळ 47972 मतदारांचे प्रतिनिधित्व करतो. 1967 मध्ये लक्षद्वीपमध्ये सर्वप्रथम निवडणुका झाल्या. त्यावेळी येथून अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या पीएम सईद यांनी विजय मिळवला.
परंतु नंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि 2004 पर्यंत येथून प्रतिनिधित्व करत राहिले. 2004 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दलाचे उमेदवार डॉ. पी. पुकुनहिकोया येथून निवडून आले. सुरुवातीला ही जागा लक्कादिव, मिनीकॉय, अमीनदीवी द्विप म्हणून ओळखली जात असे. 35 द्वीपांपासून बनलेला हा प्रदेश अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव आहे.