भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे तीन लाख किलोमीटरचा प्रचारप्रवास केला आहे. पक्षाच्या अधिकृत सुत्रांनी रविवारी ही माहिती दिली. यादरम्यान मोदींनी पारंपरिक प्रचारासह थ्रीडी होलोग्राम सभेसारख्या अभिनव मार्गांचा वापर केला. निवडणुकीच्या इतिहासात हे सर्वात मोठी प्रचार अभियान असल्याचे भाजपने म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी हरियाणातील रेवाडी येथे माजी सैनिकांच्या सभेपासून मोदींची प्रचार मोहीम सुरू झाली. शनिवार, 10 मे रोजी यूपीच्या बलिया येथील सभेनंतर प्रचार मोहीम थांबली.
निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच वातावरण निर्मितीसाठी मोदी यांनी 21 राज्यांत 38 सभा घेतल्या. आचारसंहिता लागल्यानंतर उधमपूर येथे 26 मार्चला ‘भारत विजय’ रॅलीद्वारे त्यांनी प्रचार मोहिमेची सुरुवात केली. या काळात मोदींनी 25 राज्यांत 196 अशा सभा घेतल्या. या दरम्यान त्यांनी 2 लाख कि.मी. प्रवास केला.