भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. वाराणसीत अंतिम टप्प्यातील मतदानदरम्यान, व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केल्याने मोदी वादाच्या भोवर्यात सापडले आहे. मोदींनी व्हिडिओमध्ये गंगा-यमुनेचा मुद्दा उपस्थित करून आपल्या मतदानाच्या माध्यमातून एकतेचे दर्शन घडविण्याचे आवाहनही केले. मात्र, कॉंग्रेसने हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करीत मोदींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
व्हिडिओत मोदी म्हणाले, "मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे. तुमचे मतदान हे उत्साह वाढविणारे आहे. सर्वांनी देशातील युवक व नागरिकांच्या भविष्यासाठी विचार करून, भारत मातेला प्राधान्य द्यावे. बाहेर पडा व भारताच्या भविष्यासाठी मतदान करा. आपण सर्व जण भारत मातेचे सेवक आहोत. आपण सर्व जण एकत्र येऊ व भविष्य बदलू, अशी माझी विनंती आहे''
कथित व्हिडिओ जवळपास सात मिनिटांचा आहे. मोदींनी काळ्या रंगाचा कुर्ता व लाल रंगाची सलवार परिधान केली आहे.