गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पक्षाच्या खासदार मनेका गांधी यांनी घरचा आहेर दिला आहे. मनेका गांधी यांनी मोदींच्या नदीजोड प्रकल्पाला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. नदीजोड प्रकल्प धोकादायक आहे. त्यामुळे आपणच हा प्रकल्प पुढे जाऊ दिला नसल्याचा दावा मनेका यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी दुष्काळ व महापूर रोखण्यासाठी ही योजना पुढे नेण्याची घोषणा प्रचारसभांमध्ये केली होती. वाजपेयी सरकारच्या काळात या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. त्यावर मनेका यांनी ही प्रतिक्रिया दिली. गोमती नदी शारदा नदीशी जोडण्याच्या मुद्दय़ावर मेनका म्हणाल्या, या भंपक गोष्टीपासून मीच अटलजींना रोखले होते. अशा प्रकारचे प्रकल्प फोल आहेत. नद्या जोडल्या गेल्या तर सगळेच संपून जाईल, अशी भीती त्यांनी वर्तवली.