देशात लोकसभा निवडणूक एकूण नऊ टप्प्यात पार पडली. एकूण ५४३ जागांसाठी देशात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले. मतदानाच्यावेळी तरुणाईचा जोश प्रचंड पाहायला मिळाला. त्यामुळे सर्वच टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाल्याने प्रमुख राष्ट्रीय पक्षांत बाजी कोण मारणार, याकडे सर्वांच्या नजरा असून, यासंबंधीचे चित्र शुक्रवारी १६ मे रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी अत्यंत आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबवून जास्तीत जास्त जागा कशा मिळविता येईल, यासाठी कसोसीने प्रयत्न केले. तथापि, भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी सर्वच राज्यांत प्रचार यंत्रणा राबवून अनुकूल वातावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच एक्झिट पोलचे अंदाज भाजपच्या बाजूने दाखविले जात असून, मोदीच पंतप्रधान होणार, असे चित्र निर्माण केले जात आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपलाच बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने भाजप नेत्यांनी आता सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तथापि, त्यांनाही निकालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक नेते, कार्यकत्र्याचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. यातूनच उत्सुकता शिगेला पोहोचली असून, यात बाजी कोण मारणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत. सध्या तरी एकूण ५४३ पैकी पावणे तीनशेच्या आसपास तरी भाजप प्रणित रालोआ आघाडीला जागा मिळतील, असा कयास लावला जात आहे.