Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींच्या महामार्गावरील स्पीड ब्रेकर्स

मोदींच्या महामार्गावरील स्पीड ब्रेकर्स
, गुरूवार, 15 मे 2014 (16:19 IST)
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमत मिळेल, असा अंदाज विविध जनमत चाचण्यांमधून व्यक्त झाला आहे. कोणी काहीही म्हटले तरी मतदारांमध्ये ‘बदल हवा’ ही भावना आढळून येते आहे. देशभर काँग्रेसच्या विरोधात माहोल तयार करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले आहे. त्यांनी खिचडी शिजवत आणली आहे. मात्र प्रवीण तोगडिया, गिरिराजसिंह यासारख्या संघ परिवारातील आणि भाजपमधील काही मंडळींनी मोदींनी केलेल्या प्रयत्नांना अपशकून करण्याचे काम चालू केले आहे.

प्रवीण तोगडिया, गिरिराज सिंह, नरेंद्र मोदी यांनी देशभर प्रचाराचे रान उठवून काँग्रेस आणि मनमोहनसिंग सरकारच्या विरोधात जनमत तयार केले आहे. हे जनमतच त्यांना पंतप्रधानपदापर्यंत नेऊन पोहोचवेल, असे अनुमान अनेक संस्थांनी घेतलेल्या जनमत चाचण्यांमधून व्यक्त झाले आहे. हा अंदाज आणि तर्क कितपत बरोबर ठरतो याचे उत्तर 16 मे रोजी मिळणार आहे. मात्र मोदी यांनी देशभर मतदारांमध्ये ‘बदल हवा’ अशी भावना निर्माण केली, हे नाकारता येणार नाही. काँग्रेस आणि काँग्रेसचे राष्ट्रवादीसारखे मित्र पक्ष मोदी यांच्या प्रचाराला प्रतिसाद मिळतो आहे, हे मान्य करण्यास तयार नाहीत. मात्र काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देशभरात मोदींची हवा आहे हे खुलेपणाने मान्य केले आहे. ही हवा मतांमध्ये परावर्तित होते की नाही हे पाहावे लागेल. मोदींच्या सुसाट सुटलेल्या वारुला रोखण्याचे सामर्थ्य केंद्रातील सत्ताधारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाही. मोदींना रोखण्याची जबाबदारी त्यांच्याच पक्षातील आणि संघ परिवारातील काही संघटनांनी स्वत:हून खांद्यावर घेतल्याचे सध्या दिसत आहे. निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात पक्षातील आणि परिवारातील अशा वाचाळवीरांमुळे मोदी हैराण होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. या वाचाळवीरांनी मोदींच्या मार्गातले. आपण स्पीड ब्रेकर्स आहोत हे आपल्या वक्तव्यांनी दाखवून दिले आहे. यापैकी पहिले वीर आहेत, विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया. तोगडिया आणि नरेंद्र मोदी यांचे पूर्वी घनिष्ठ संबंध होते.

अलीकडच्या काळात विशेषत: रस्तारुंदीच्या कारणावरुन गुजरातमधील अनेक शहरांमध्ये मंदिरे पाडण्याचे काम हाती घेतले गेल्यानंतर तोगडिया यांनी मोदींच्या विरोधात शड्डू ठोकला. विश्व हिंदू परिषदेचे अनेक कार्यकर्ते तोगडियांच्या नेतृत्वाखाली मोदींच्या विरोधात मैदानात उतरले. 2007 च्या निवडणुकीत तोगडियांच्या अनेक चेल्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचार केला होता. मोदींनी तोगडियांच्या या मोहिमेला भीक न घालता रस्ता रुंदीच्या आड येणारी धार्मिक स्थळे पाडून टाकण्याची मोहीम चालूच ठेवली. तोगडिया हे जहाल भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. 15-20 वर्षापूर्वी तोगडियांच्या जहाल भाषेतील भाषणांचा भारतीय जनता पक्षाने फायदा उठविला होता. मात्र गेल्या काही वर्षात सर्वसामान्य मतदारांना हिंदुत्वाच्या नावाखाली होणारी जहाल भाषणे नको आहेत, असे दिसून येत आहे. युवा मतदारांना धार्मिक मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्यावर चर्चा हवी आहे. मोदी यांनी मतदारांमधील हा कल ओळखत 2007 पासून गुजरातमधील आपल्या प्रचाराचा रोख विकास या एकमेव मुद्यावर ठेवला आहे. तोगडियांसारख्या बेभान मंडळींना मोदींचे हे वर्तन पसंत नाही. संघ परिवाराने मोदींचा विकासाचा अजेंडा मान्य करत त्यांच्या मागे देशभर आपली ताकद उभी केली आहे.

दिल्लीचे तख्त काबीज करायचे असेल तर हिंदुत्वाचा चेहरा काही काळ बाजूला ठेवावा लागेल आणि विकास, सुशासन यासारख्या द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील ज्येष्ठ मंडळींच्या लक्षात आले आहे. हिंदुत्व, राम मंदिर, समान नागरी कायदा यासारखे जुने मुद्दे उगाळत बसलो तर दिल्लीचे तख्त मिळणे अवघड आहे हे संघ परिवारातील अध्वर्युच्या ध्यानात आले आहे. मात्र मुस्लीम विरोध हा एकमेव कार्यक्रम असलेल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या तोगडियांसारख्या नेत्यांना संघ परिवाराने बदललेला मार्ग पसंत नाही. त्यांची ही मळमळ आता व्यक्त होऊ लागली आहे. हिंदू वस्तीमधील मुस्लीम व्यावसायिकाने खरेदी केलेले घर त्याने सोडावे यासाठी तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकत्र्यांना हाताशी धरत आंदोलन चालू केले आहे. ऐन निवडणुकीच्या मध्यात तोगडियांच्या हालचाली प्रकाशझोतात आल्याने मोदी यांना बचावात्मक पविर्त्यात जाणे भाग पडले आहे. वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत मोदी हे आपली मुस्लीमविरोधी प्रतिमा जाणीवपूर्वक बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना अपशकून करण्याचे काम तोगडियांनी इमाने-इतबारे केले आहे.

मोदींच्या भारतीय जनता पक्षातील बिहारमधील नेते गिरीराजसिंह यांनी मोदींना विरोध करणार्‍यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, असले बेजबाबदार विधान करुन मोदींची गोची केली आहे. मोदी यांनी तोगडिया आणि गिरीराजसिंह यांच्या विधानाबाबत नापसंती व्यक्त करत, अशी विधाने यापुढे करु नका अशी समजही संबंधितांना दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते राम माधव यांनीही तोगडियांच्या विधानाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मात्र तोगडियांसारखे नेते संघ परिवाराच्या पाठिंब्यामुळेच बेफाम बनले आहेत हे विसरता कामा नये. तोगडियांनी यापूर्वीही मुस्लीम समाजाविरोधात अनेकदा आगखाऊ भाषणे केली आहेत. त्यावेळी तोगडियांना आवरावे किंवा त्यांच्या भाषणाबाबत नापसंती व्यक्त करावी, असे संघ परिवारातील नेत्यांना कधी वाटले नव्हते. मोदी यांनी अलीकडच्या काळात तोगडिया आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यापासून स्वत:ला काहीसे दूर ठेवले आहे. एकेकाळी तोगडिया हे मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जात होते. अलीकडे मात्र मोदींनी तोगडियांपासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे. याचा वचपा तोगडिया यांनी काढला असावा. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आपण जे काही करतो आहोत त्याचा परिणाम काय होणार आहे, हे ठावूक नसण्याएवढे तोगडिया दूधखुळे नाहीत. मोदींना अडचणीत आणणे हाच त्यांचा उद्देश होता. पण मोदी किंवा संघ परिवार तोगडियांपुढे सध्याच्या स्थितीत काहीही करु शकत नाही. मोदींनी स्वत:बद्दल केवळ मुस्लीमच नव्हे तर ख्रिश्चन आणि दलितांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम चालू केले आहे. तोगडियांसारख्या मंडळींच्या हालचालीमुळे मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याबद्दल अल्पसंख्याकांच्या मनात अविश्वासाचीच भावना राहणार यात काही शंका नाही. मोदींच्या हवेमुळे बेभान झालेले गिरीराजसिंह यांनी मोदी विरोधकांची जागा पाकिस्तानातच आहे, असे सांगत आपली असहिष्णूता किती टोकाची आहे हे दाखवून दिले आहे. या भाषेबद्दल गिरीराजसिंह यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचार करण्यास बंदी घातली गेली आहे. मोदी यांनी जमवत आणलेला खेळ तोगडिया गिरीराजसिंह यासारख्या मंडळींमुळे बिघडण्याची शक्यता आहे.

तोगडिया गिरिराजसिंह यांच्यासारख्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे विकासाच्या मुद्यावर मोदींना पाठिंबा देण्याची मानसिक तयारी केलेल्या मतदारांमधील मोठय़ा वर्गाला धक्का बसला आहे. बहुसंख्य हिंदू मतदारांपैकी इतिहासातील मढी उकरुन काढणे पसंत नाही. देशाचा विकास करुन देशाला महासत्ता कशी बनविता येईल, याचा विचार तरुण मतदारांची पिढी करते आहे. ही पिढी भाजप किंवा संघ परिवाराशी संबंधित नाही तरीही ती मोदींच्या मागे उभी राहताना दिसते आहे. तोगडिया आणि गिरिराजसिंह यांच्यासारखी मंडळी तरुण मतदारांच्या या पिढीला मोदींपासून तोडत आहेत. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना मिळालेला पाठिंबा मतदारांच्या या पिढीचाच होता. या पिढीला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हवे आहे, अमेरिकेसारख्या महासत्तेच्या मुजोरीला आळा घालण्याइतके सामर्थ्य भारताकडे यावे, असे या पिढीला वाटते आहे. मोदींनी या पिढीची ही भावना ओळखूनच आपला संपूर्ण प्रचार विकास आणि सुशासन या मुद्यांवर केंद्रित केलेला आहे. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष मात्र मोदींना धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरुन झोडपून काढण्यात मग्न आहेत. सत्ता मिळाल्यास आगामी पाच वर्षात आम्ही काय करु, हे राहुल गांधी किंवा काँग्रेसचा एकही नेता बोलत नाही. शरद पवारांसारखा नेता ही फक्त मोदींना लक्ष्य करण्यात धन्यता मानतो आहे. यामुळे मोदींची लोकप्रियता वाढते आहे.

महागाई, बेरोजगारी, दारिद्रय़ अशा समस्यांमुळे पिचल्या गेलेल्या मतदारांना मोदींकडून आपल्या समस्यांची, प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा वाटू लागली आहे. कारण मोदी हे आपल्या प्रचाराच्या भाषणांमध्ये याच मुद्यावर बोलत आहेत. त्यांनी आपल्या स्वप्नातील भारताची कल्पना भाषणे, मुलाखतींमधून मांडली आहे. काँग्रेसविरोधी माहोल तयार होण्यात मोदींनी पद्धतशीरपणे राबविलेल्या प्रचारमोहिमेचाही मोठा वाटा आहे. मोठय़ा परिश्रमाने मोदींनी यशाची खिचडी शिजवत आणली आहे. तोगडियांसारखी मंडळी मोदींची चूलच उधळून टाकण्याच्या बेतात आहेत. मतदानाच्या उर्वरीत तीन टप्प्यात तोगडियांसारख्या स्वयंभू मंडळींना आवर घालण्यात मोदी आणि संघ परिवार यशस्वी ठरतो का यावर बरेच अवलंबून आहे.


अभिमन्यू सरनाईक

Share this Story:

Follow Webdunia marathi