गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या ओबीसी असण्यावरच आता बहुजन समाज पक्षापाठोपाठ आता काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून मोदींनी त्यांच्या जातीचा समावेश 'ओबीसी'मध्ये करून घेतला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
16 वी लोकसभा निवडणुकीचा प्रचार विकासाच्या मुद्यावर सुरू झाला आणि आता ह प्रचार जातीच्या मुद्द्यावर संपतो की काय, असे वर्तवले जात आहे. कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधींनी खालच्या पातळीच्या राजकारणाचा आरोप नरेंद्र मोदींवर केला होता. मात्र, मोदींनी उत्तरप्रदेश आणि बिहारला डोळ्यासमोर ठेवून प्रियांकांच्या टीकेचा चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला.
मोदींनी खालच्या पातळीच्या राजकारणाला खालच्या जातीचा रंग दिला आणि काँग्रेसची चांगलीच अडचण झाली होती. मात्र, आता मोदींच्या ओबीसी असण्यावरून तर्कवितर्क मांडले जात आहे. त्यावर बसपपाठोपाठ काँग्रेसने हरकत घेतली आहे. मोदी हे वरच्या जातीचे असून त्यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना आपल्या जातीचा ओबीसीत समावेश केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.