देशभरात सुरु असलेल्या 16 लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानाच्या पूर्व संध्येला भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी व सुरेश सोनींसह संघ नेत्यांशी बंद दाराआड चर्चा केली. शनिवारी (10मे) प्रचार संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. पाठोपाठ राजनाथ यांनीही भेटीगाठी घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
राजनाथसिंह यांनी सरकार्यवाह भैय्याजी जोशी व भाजपमधील संघाचे प्रतिनिधी सुरेश सोनी, सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, कृष्ण गोपाल यांच्याशी दोन तास चर्चा केली. भाजपचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच नवी जबाबदारी काळजीपूर्वक निभावण्याचा सबुरीचा सल्ला संघ नेत्यांनी दिला. संघ भाजपच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. भाजपच्या जोरदार प्रचाराबद्दलही संघ नेत्यांनी मोदी व राजनाथसिंह यांच्याकडे समाधान व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.