अमेठीतील मतदान केंद्रात प्रवेश करणे तसेच हिमाचल प्रदेशात केलेले वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या अंगाशी आले आहे. हिमाचल प्रदेशातील सभेत चिथावथीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने समन्स बजावले आहे. राहुल यांनी आदर्श आचारसंहिता भंग केला असल्याचा ठपका यात ठेवण्यात आला असून सोमवारी 12 मे रोजी चौकशीला हजर राहाण्याचे आदेश दिले आहे. राहुल चौकशीला हजर राहिले नाही तर कारवाई करू असाही इशारा देण्यात आला आहे.
अमेठीत मतदानाच्या दिवशी (7 मे) राहुल गांधी यांनी थेट मतदान कक्षापर्यंत पोहोचले होते. या पार्श्वाभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त संपत यांनी राहुल यांनी मतदान केंद्रात घुसखोरी केल्याची वस्तुस्थिती मान्य केली आहे. परंतु त्यानंतरही त्यांच्यावरील कारवाईस विलंब झाल्याचा आरोप भाजपसह विरोधी पक्षांनी केला. या पार्श्वभूमीवर संपत यांनी पत्रकार परिषदेत राहुल यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले होते.
दरम्यान, हिमाचल प्रदेशात सोलन येथे राहुल गांधी यांनी जाहीर सभेत 'भाजप सत्तेवर आल्यास 22 हजार लोक प्राणाला मुकतील, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.