कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी विश्रांतीसाठी दोन दिवस परदेशात गेल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस अजय माकन यांनी दिली आहे. त्यावर शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधी हे परदेशी पाहुणे असून केवळ भारतात सुटी घालवण्यासाठी येतात. नंतर पुन्हा परदेशी जातात, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निरोप समारंभासाठी बुधवारी आयोजित केलेल्या स्नेहभोजन समारंभास राहुल गांधी यांनी दांडी मारली होती. स्नेहभोजन सोहळ्यात राहुल दिसत नसल्याने पक्षातंर्गत तर्कविर्तक लढवले जात होते. एवढ मोठ्या समारंभासाठी राहुल गांधी यांची अनुपस्थिती चमत्कारिकच असल्याची प्रतिक्रीया भाजपचे नेते अभिमन्यु सिंग यांनी दिली आहे.
दरम्यान, अजय माकन यांनी राहुल गांधींची पाठराखण करत, ते विश्रांतीसाठी दोन दिवस परदेशात गेले असल्याचे सांगितले आहे.