नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागत असलेले बिहारचे कट्टर राजकीय वैरी समजले जाणारे नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र आले आहे. बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शुक्रवारी होणार्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत सडकून मार खाल्यानंतर नितीशकुमार यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. जदयूला फक्त दोन जागांवर विजय मिळाला होता. नंतर जदयूच्या आमदारांच्या बैठकीत जितनराम मांझी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु आता बिहारमधील सत्ताधारी जदयू सरकारला सत्ता स्थापनेसाठी शुक्रवारी (23 मे) विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. यावेळी लालुप्रसाद यादव जदयूला आपला पाठिंबा देणार आहे. कॉंग्रेसने यापूर्वी जदयूला पाठिंबा दिला आहे.
लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने बिहार सरकारला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क मांडले जात आहेत.