Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आम्रवृक्ष

डॉ. उषा गडकरी

आम्रवृक्ष
ND
आमच्या समोरच्या घरी असलेल्या चार डेरेदार आम्रवृक्षांकडे पाहण्याचा मला नकळतच छंद लागला आहे. ऋतुमानाप्रमाणे शिशिरात पानगळ सुरू होऊन गेल्यानंतर त्यांना नवीन, कोवळी, लालसर, नाजुक पाने फुटतात, तेव्हा ती झाडे सर्व बाजूंनी बहरायला लागली आहेत,याचीच सूचना मिळते. डिसेंबर-जानेवरीतच मोहरांचे झुबके डहाळी-डहाळीवर डोलू लागले म्हणजे या आम्रवृक्षांनी आपल्या अंगावर सुंदर मोत्यांची लेणी चढविण्यास सुरुवात केली आहे, याचेच संकेत मिळतात.

फेब्रुवारीत एखाद्या घोट्याशा धूळ-वादळाने जेव्हा लवकरच या आम्रवृक्षांच्या फांद्या फलभाराने वाकणार आहेत याची पताकाच फडकवली जाते. एप्रिल-मे च्या कडक उन्हाउळ्यात, दुपारच्या वेळी कुणी कामकरी जेव्हा कपाळावरचा घाम ‍िनपटतो आणि आपली शिदोरी सोडून कुठे निवांत बसावे या विचारात असतो तेव्हा, याच आम्रवृक्षांची गर्द छाया त्याला नकळत अगत्याचे निमंत्रण देते. आपल्या अफाट धन-राशितील काही रत्ने खाली टाकून तो कामगाराच्या न्याहारीची चव वाढविण्यसही मदत करतो. माणसांवरच केवळ नव्हे तर गाई, म्हशी, बकर्‍या, कुत्री या सारख्या जनावरांवरही हे वृक्ष जेव्हा आपल्या प्रेमळ छत्राची सावली धरतात तेव्हा कुणी धनवंत उदार होऊन जाणार्‍या-येणार्‍या अतिथींवर कृपावर्षाव करीत आहे असे वाटते.

webdunia
ND
कुणाच्या घरी सत्यनारायण असेल, शुभकार्य असेल, किंवा दसरा, गुढीपाडव्यासारखा सण असेल, तर याच आंब्यांचे टाळ घरोघरी नेले जातात आणि दारादारावर आपल्या पावित्र्याची मुद्रा उमटवून जातात. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला म्हणजे याच डेरेदार वृक्षाच्या एखाद्या फांदीच्या खोबणीत कुणी पक्षी घरटे बांधण्याचा खटाटोप करतांना दिसतो. कधी-कधी या झाडांच्या बुंध्याकडे निरखून पाहिले तर असंख्य मुंग्या खालन वर आणि वरून खाली लगबग करताना दिसतात.

webdunia
ND
किडामुंगी, पशुपक्ष्यांपासून माणसांपर्यंत सर्वांना हरतर्‍हेने मदतीचा हात देणारे हे वृक्ष तत्पर सेवकाप्रमाणे हात जोडून उभे आहेत असे वाटते. एखाद्या निष्काम कर्मयोग्याचीच भूमिका हे वृक्ष वठवीत आहेत असे वाटते. प्रचंड कर्म करूनही कर्म करण्याच्या अहंकाराचा थोडाही स्पर्श त्यांना झालेला नाही याचाच प्रत्यय त्यांच्याकडे पाहून येतो. सूर्य ज्याप्रमाणे सर्वांवर आपल्या संजीवक किरणांचा वर्षाव करतो, किंवा नदी ज्याप्रमाणे दुथडी भरून वाहताना दोन्ही काठचा भूभाग सुपीक करती जाते, त्याप्रमाणे हे आम्रवृक्षही नकळतच जीवनचक्रात आपली भूमिका चोख बजावीत उभे आहेत असे वाटते.

सर्व करूनही काहीच न केल्याचा जो सहजभाव त्यांच्या रोमरोमात भिनलेला दिसतो तो मानवांना फार मोठा धडा शिकवून जातो. कुणी पाणी घातले काय किंवा कुणी दगड मारला काय, या वृक्षांच्या छायदानात कोणताच फरक पडत नाही. असा अत्यंत निर्वेर, तटस्थभाव, एखाद्या ध्यानस्थ योग्याचीच आठवण करून देतो. या वृक्षांच्या या मौनातूनच ते असंख्य तर्‍हांनी आपल्याशी बोलताहेत असे जाणवते. हे वृक्ष अप्रतिहतपणे आपणास काही सांगत आहेत, शिकवत आहेत. प्रश्न फक्त माणसाने अवधान देण्याचा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi