Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुढी पाडवा, आनंद वाढवा

गुढी पाडवा, आनंद वाढवा

वेबदुनिया

ND
चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.

तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो.

webdunia
ND
चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली (सोन्यामाणकांसारख्या वैभवसंपन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णने वाचायला मिळतात.)

त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.

वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे तर ही प्रथा सांगत नसेल?कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्‍या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे.

मुलांनाही इळवणी घालतात. म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या पाण्याने मुलांना अंघोळी घालतात याचाच अर्थ लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचाच मार्ग या परंपरेत आहे.

संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात (पुन्हा धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे) व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात (होळी पासूनच हार-कडे देवाणघेवाण सुरू होते)

या सर्व परंपरांतून लहानपणापासूनच आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यास शिकतो. पूर्वी आपले जीवनमान निसर्गाच्या लहरींवर त्याच्या उष्ण, शीत बदलांवर अवलंबून होते (आता कूलर मुळे हवा तेव्हा गारवा निर्माण होतो) त्यामुळे आपल्या प्रत्येक सणांतले बदल हे निसर्गाच्या बदलानुसार होतात जसे,

संक्रांतीला थंडी म्हणून गूळ-पोळी शीतल-शिमग्याला तान्हा मुलांना मुलींना पातळ पाढर्‍या रंगाची झबली केशराच्या रंगाच्या (किंवा कुंकवाच्या पाण्यांचे शिंतोडे) शिंतोंड्यांनी भिजवून देतात हार-कडे देतात मुलांनी द्राक्षाचे दागिने घालतात (तसे संक्रांतीला हलव्याचे करतात) कारण याच काळात द्राक्षे येण्यास सुरवात होते.

webdunia
ND
चैत्रात कैरीचे पन्हे (कैर्‍या तेव्हाच होतात) श्रावणात फुलांची आरासींनी मंगळागौर सजवतात. या अन् अशा अनेक सणात मोसमी फळे, फुले येतातच. दिवाळीत झेंडूच्या फुलांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते तर गुढीपाडव्याला आंब्याला कोवळी पालवी फुटते, त्यामुळे घरादारावर आंब्याच्या पोपटी पानांचे तोरण खुलते.चैत्रातही झेंडू फुलतो. त्याचाही उपयोग घराच्या सुशोभनासाठी केला जातो.

आपण जसे 15 ऑगस्टला आपला स्वांतत्र्यादिवस उत्साहात साजरा करतो तसाच हा नववर्षाचा पहिला दिवस गुढीरूपी झेंडा आकाशात दिमाखाने फडकवत प्रत्येक घर साजरा करते.

1 जानेवारी आळसात उजाडतो (31 डिसेंबरचा अमल असतो ना !) नवीन वर्षाचे अत्रुप असतं. पण हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा! प्रत्येक घरातील लहानथोरांनी नटूनथटून अलंकाराने सुशो‍भित होऊन गुढ्या उभारायचा दिवस, गोडधोडाचा दिवस, पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस, नवीन खरेदीचा दिवस, अन् सजलेल्या सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंतआगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण ही दिमाखात साजरा करूया.

आकाशात गुढ्यांची, विजयपताकांची रांगच रांग दिसू द्या. दूर दूर नजर जाईतो आपल्या अस्मितेच्या, स्वाभिमानाच्या अन् शिवरायांच्या भगव्या झेंड्याच्या पताकांनी निळं आकाश भगवं होऊ द्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi