Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुढी पाडवा

गुढी पाडवा
ND
आपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपला पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खावी. नंतर पूजा-अर्चा करून गुढी उभारावी, असे सांगितले आहे. तसेच वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करावे. गुरूं, वडीलधार्‍यांना वंदन करावे, असेही सांगितले आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे, अशी धर्माज्ञा आहे. संवत्सर फल म्हणजे काय ? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असले त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे मंगळवारी सुरु होत असल्यामुळे मंगळ हा या वर्षाचा अधिपती असे समजले पाहिजे. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने काही विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते.

जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. अशी विविध प्रकारांनी संवत्सरांची विभागणी आणि मांडणी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही आहे.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

साभार : महान्यूज

Share this Story:

Follow Webdunia marathi