Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेठजींच्या राज्यातील मराठी

शेठजींच्या राज्यातील मराठी
महाराष्ट्रात मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. पण महाराष्ट्राबाहेर रहाणाऱ्या तिथल्या 'परप्रांतीय' मराठी मंडळींनी मात्र अनेक वर्षांपासून आपली भाषा आणि संस्कृती टिकवली आहे. बडोदा हे तर मराठी भाषकांचे एक मोठे केंद्र. येथे मराठी भाषा आणि संस्कृतीची काय स्थिती आहे, ते जाणून घेऊया बडोदेकर मराठी भाषकाच्या शब्दांत...... 
 
मी बडोद्याची. गायकवाड राजघराणे इथे राज्य करत होते, त्यामुळे बडोद्यावर मराठी संस्कृतीचा मोठा ठसा आहे. त्यामुळे मराठी लोकांची संख्याही इथे खूप मोठी आहे. अदमासे चाळीस टक्के तरी मराठी लोक इथे रहातात. मराठी मंडळींच्या संस्थाही पुष्कळ आहेत. अगदी त्या जातनिहायही आहेत. उदा. क्षत्रिय मराठा मंडळ, कोकणस्थ मराठा मंडळ आदी. 
 
गुजराती ही राज्याची भाषा असल्यामुळे सहाजिकच तिची येथे चलती आहे. पण तरीही मराठी कुटुंबांनी मराठी टिकवून ठेवली आहे. घरात जुनी पिढी मराठी बोलते. नवी पिढी मोठ्यांबरोबर बोलताना मराठी बोलते, पण आपसात मात्र गुजरातीत संवाद साधते. याचे कारण शिक्षण गुजराती माध्यमात असल्याने शाळेत सर्वत्र गुजराती बोलले जाते. सहाजिकच मराठी बोलण्याचा सराव तुटतो आणि गुजरातीचा संग धरावा लागतो.

पण माझ्या पिढीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही मराठी लोक कुणी भेटल्यास मराठीतच बोलतो. एखाद्या गल्लीत चार-पाच मराठी घरे असतील तर त्यांच्यात मराठी बोलली जाते. त्यातच मराठी तुलनेने समजायला सोपी आहे. फारशी कठीण नाही. त्यामुळे आजूबाजूच्या गुजराती शेजारच्यांनाही मराठी येते, असेही घडते.
मराठी लोकांच्या बर्‍याच संघटना येथे आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्या जातनिहायही आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या संस्थांना सामाजिक जाणीवेचा स्पर्शही आहे. त्यामुळेच मराठी समाजातील गरीब कुटुंबांना, हुशार पण गरीब मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली जाते.

webdunia
  PR
 बडोद्यात मराठी लोकांची संख्या जास्त असल्याने त्यांचा शहरावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे स्थानिक बाबींमध्येही मराठी माणसाचा विचार होतो. शिवाय इथला समाज आपले मराठीपण कायम ठेवून तो या समाजात मिसळला आहे, हे विशेष. त्यामुळेच की काय आपण मराठी असल्याचा इथे कधी त्रास होत नाही.

गुजरातमध्ये राहूनही आम्ही आमची मराठी संस्कृती टिकविण्याचा प्रयत्न करतो. मराठी सण, समारंभ साजरे करतो. पूर्वी खंडोबाचा उत्सव फार दणक्यात साजरा व्हायचा. पण आता ते प्रमाण थोडे कमी झाले आहे. याव्यतिरिक्त आम्ही शक्य तितके मराठी बोलतो. मराठी चित्रपट आले की आवर्जून पहातो. मराठी चित्रपट आल्यानंतर बरेच दिवस चालतात, यावरूनही हे लक्षात यावे. फक्त खंत एकच आहे, आमच्या मुलाबाळांना आम्ही मराठीत शिक्षण देऊ शकत नाही. गुजराती भाषक राज्य असल्याने सहाजिकच गुजरातीला प्राधान्य आहे. पण मराठी शिकण्याची अशी फारशी सोय नाही. मुख्यतः मराठी पुस्तके उपलब्ध होत नाहीत.

webdunia
   
मराठी संस्कृती टिकवण्यासाठी भाषाही टिकवायला हवी असे वाटते. दुसर्‍या राज्यात रहात असताना मराठी विषय म्हणून शिकवायची त्याची व्यवस्था व्हायला हवी. अन्यथा आपण मराठी आहोत, आपली मातृभाषा मराठी आहे, हेच तो विसरून जाईल.
 
मुंबईत मराठी टिकविण्यासाठी होणारी आंदोलने पाहून मन व्यथित होते. लोक नोकरीसाठी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असतात. त्यामुळे मुंबईत होणार्‍या आंदोलनांचा महाराष्ट्राबाहेर रहाणार्‍या मराठी लोकांवर काय परिणाम होईल, याचाही विचार केला पाहिजे. आम्हाला उद्या गुजरातमधून बाहेर काढले तर महाराष्ट्रात स्थान मिळेल काय? महाराष्ट्रानंतर गुजरात असे राज्य आहे, जेथे मराठी लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाषा टिकविणे हे आपल्या हाती आहे, दुसर्‍यांना मारझोड करून, हाकलून काढत भाषा नाही टिकवता येत.
 
- सौ. कल्याणी देशमुख

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिंदू नव वर्षाचे भविष्यफल तुमच्या राशीनुसार