गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यातल्या 89 जागांसाठी 1 डिसेंबरला पार पडलं होतं. तर, आज दुसऱ्या टप्प्यातल्या 93 जागांसाठी मतदान पार पडलं.
आता दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात झाली आहे.
'न्यूज एक्स'च्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला 117 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 34-51 जागा मिळू शकतात. या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीला 6-13 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
'टीव्ही 9 गुजराती'च्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला 125 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 40 ते 50 आणि तिकडे 'आप'ला 3 ते 5 जागांवर समाधान मानावं लागू शकतं.
'रिपब्लिक टीव्ही' आणि 'पी-मार्क' यांच्या अंदाजानुसार, भाजपला 128 ते 148, काँग्रेसला 30 ते 42, आम आदमी पार्टीला 2 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत भाजपला 48.2 टक्के, काँग्रेसला 32.6 टक्के, आप 15.4 टक्के आणि इतरांना 3.8 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
गुजरातच शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडल्यावर गुजराती सहित देशभरातील अनेक माध्यमांनी घेतलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष समोर आले आहेत. या निवडणुकीत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पार्टी सोबतच एआयएमआयएमनेही उडी घेतली होती. या नव्या राजकीय समिकरणांमुळे उमेदवारांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होऊ शकतो.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाा यांच्या गृहराज्यात होत असलेली ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
गुजरातच्या निकालाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटू शकतात असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जातंय.
गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी 1 डिसेंबरला पार पडलं होतं. यात 63.31 टक्के मतदान झालं. मागच्या निवडणुकीतील सरासरी पाहता मतदानाचा हा टक्का खूपच कमी आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत 71 राजकीय पक्ष आणि अपक्षांसह एकूण 1,621 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
इंडिया न्यूज सीएनएक्सच्या 2017 च्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 100-120 जागा, काँग्रेसला 65-75 आणि इतरांना 02-04 जागा मिळण्याचा अंदाज होता.
टाईम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 108, काँग्रेसला 74 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
न्यूज 18-सीवॉटरच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 108 जागा आणि काँग्रेसला 74 जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता.
इंडिया टुडे-माय अॅक्सिसने भाजपला 99 ते 113, काँग्रेसला 68 ते 82 आणि इतरांना एक ते चार जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता.
टुडेज चाणक्य आणि न्यूज-24 च्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 135 जागांवर विजय मिळेल असं म्हटलं होतं.
शेवटी निकाल आले आणि भाजपने गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं. भाजपला या निवडणुकीत केवळ 99 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. भाजपने 2012 च्या निवडणुकीपेक्षा खराब कामगिरी केली होती.
हिमाचलच्या निवडणुकीत 'काँटे की टक्कर'
दुसरीकडे, हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत कांटे की टक्कर होण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात ही लढत असणार आहे. पण एक्झिट पोलचे हे अंदाज फक्त अंदाजच आहेत. निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबरला हाती येणार आहेत.
आजतक-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये, भाजपला 24-34 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर काँग्रेस 30 ते 40 जागा घेऊनिबहुमताचा आकडा पार करेल असंही या एक्झिट पोलमध्ये म्हटलंय.
इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 35-40 जागा मिळण्याचा अंदाज दिलाय, तर काँग्रेसला 26-31 जागांवर समाधान मानावं लागेल.
दुसरीकडे, न्यूज एक्स-जन की बातच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 32 ते 40 तर काँग्रेसला 27 ते 34 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
रिपब्लिक पीएमएआरक्यूच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 34 ते 39 आणि काँग्रेसला 28 ते 33 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याचवेळी, या एकमेव एक्झिट पोलमध्ये हिमाचलमध्येआम आदमी पक्षाला शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवलीय.
तर टाइम्स नाऊ आणि ईटीजीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 34 ते 42 आणि काँग्रेसला 24 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Published By -Smita Joshi