श्री गुरूपौर्णिमा - व्यास महर्षि पौर्णिमा - त्यांचे स्मरण पूजन, विश्वगुरू, विश्वज्ञानगुरु, सर्व शास्त्राच्या ज्ञानाचे सर्वश्रेष्ठ गुरू व्यासराय. त्यांच्या ज्ञानाच्या ख्यातीबद्दल माऊलींनी ज्ञानेश्वरीत 'व्यास्तेच्छिषृ जगमय' असा उल्लेख केला आहे.
श्री गुरू महालय संस्कार मानवी जीवनावर व्हावा म्हणूनच गुरुपूजन. गुरू हा शब्द माऊलीनी सद्गुरु अशा अर्थानी वापरलेला आहे. सद्गुरू - सत् जाणणारा व अनुभवसारा, त्याची प्रचिती शिष्याला, साधकाला देणारा होय. गुरुकृपेचे स्मरण, कृतज्ञतेचा भाव जपणे. त्यांच्या कायमस्वरूपी ऋणात राहणे. यातच शिष्याचे, साधकाचे अंतिम कल्याण आहे.
आपली प्राचीन संस्कृती गुरू-शिष्याच्या परंपरेने हजारो वर्षापासून जीवंत राहिलेली आहे. प्रेरणा देणारी ठरलेली आहे. इतकेच नव्हे, संस्कृतीचा प्राण म्हणजे श्रीगुरु-शिष्य परंपराच होय. वेदकालापासून आपणास ही पवित्र परंपरा ज्ञात आहे. या परंपरेचा स्त्रोत विशेष प्रकर्षाने समाजापुढे आदर्शपणे, वारकरी संप्रदायाने जपून ठेवून तो समाजाच्या तळागाळा पर्यंत नेला आहे. आज महाराष्ट्रात 'विठ्ठलभक्ती' प्राधान्याने केली जाते. त्याचा प्रभावी प्रवाह संतकाळापासून दिसून येतो. अनेक शतकापासून ही विठ्ठल भक्ती फोफावलेली आहे. श्रीगुरु परंपरेमुळेच ती समाजात नेऊन रुजवली, फुलविली.
मागील 300 वर्षांपूर्वी देगलूर जिल्हा नांदेड, येथे साक्षात्कारी विठ्ठलभक्त संत सद्गुरु श्री गुंडामहाराज देगलूरकर (मराठवाड्यात) होऊन गेले. त्यांच्याच वंशामध्ये पू. गुरूवर्य धुंडामहाराज देगलूरकर होऊन गेले. त्यांना कालवश होऊन 15 वर्षे होऊन गेली. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहिण्यासाठी लेखणी व लेखक सामर्थ्याने फारच तोकडे पडतात.
'नेणो केसा प्रेमभावे। गांजोचि लागे। या प्रेमाच्या भावनेने संतगुरुबद्दल लिहावे. तेही औचित्य गुरुपौर्णिमेचे आहे म्हणूनच. देगलूरकर घराण्यामध्ये वंशपरंपरेने गुरुमंत्र दीक्षा देण्याची प्रथा आहे. आजतागायत ती चालू आहे. अशा परंपरेत सद्गुरु धुंडामहाराज देगलूरकर वारकरी सांप्रदायातील अध्वर्यू होत. त्यांचे पंडित प्राण प्रज्ञाकांत वै. भगवान शास्त्री धारूरकर (पंढरपूर) यांच्याकडे वेदान्तशास्त्र, मीमांसा ग्रंथ, साहित्यशास्त्र, धर्मशास्त्र, गीता, भागवत इत्यादी अध्ययन झालेले होते. त्यांच्या वयाच्या 18 व्या वर्षी पासून महाराजांनी प्रवचन, कीर्तन करण्यास सुरू केली होती.
मराठवाड्याचा भाग व मोगलाई भाग, त्यांनी प्रवचन, कीर्तनांनी पिंजून काढला. प्रवासाची साधने अपुरी होती. विशेष बैलगाडीतून, घोड्याकरून, कधी चालत खेड्यापाड्यात जात असत कार्यक्रम करीत. परंपरेने चालत आलेली त्यांनी गुरुमंत्र दीक्षा तळमळीच्या साधकाला, भक्ताला व जिज्ञासूला देत असत.
पू. सद्गुरु धुंडामहाराजांनी वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत ज्ञानेश्वरीवर प्रवचने व संताच्या अभंगावर कीर्तन निरूपण केले. अनेक विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली. अनेक शहरात व्याख्यानमालाही झाल्या. त्यांची वाणी गोड व रसाळ होती. शब्दातील उच्चार स्पष्ट होता. त्यांच्या घराण्याच्या परंपरेप्रमाणे 4 महिने पंढरपुरी राहणे. त्यालाच पंढरपूरचा चातुर्मास म्हणतात. यामध्ये नित्य ज्ञानेश्वरी प्रवचन कसे दर एकादशीला कीर्तन करणे. शिवाय वारकरी कीर्तनकरांना व अभ्यासकांना शास्त्र ग्रंथाचे (वेदान्तग्रंथाचे) पाठ देणे. सुक्ष्मपणे विवरण करणे. उपनिषद, गीता, विचारसागर, चांगदेव पासष्टी यावर चर्चा, निरूपण करीत. ऐकणारे मंत्रमुग्ध होत असत. ज्ञानतृप्ती व श्रवणतृप्तीने समाधानी होत असत. त्यांची वाणी ऐकताना हे माझ्यासाठीच आहे. असा भाव तयार होत असे.
मागील 40/50 वर्षापूर्वी ज्यांनी ज्यांनी महाराजाचे मार्गदर्शन घेतलेले आहे, ते तसेच त्यांचे कीर्तन प्रवचन सतत ऐकणारे कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या कीर्तन व प्रवचन सेवेतून श्रद्धेने, प्रेमभावपूर्ण तसेच कृतज्ञताभावपूर्ण पू. धुंडामहाराज देगलूरकर त्यांचा उल्लेख करतात. यानीच त्यांनाही धन्यता वाटते. श्रवण करणारे श्रोते जुने नवे असो ते त्यास आनंदाने प्रतिसाद देतात. महाराष्ट्रात जिकडे तिकडे वारकरी कीर्तनकार भ्रमंती करतात. कार्यक्रम करतात. महाराजांचा उल्लेख करतातच.
पू. धुंडामहाराज हे सद्गुरु आहेत. संतही आहेत. उत्तम प्रवचनकार, विद्वान व्याख्याता, मधुरवाणीचा कीर्तनकार. आदर्श गृहस्थाश्रमी पुरुष. व्यवहारचतुर व्यक्तिमत्व, नम्रतेनेच महाराजापुढे वाकावे इतकी नम्रता त्यांच्याजवळ होती. त्यांना भेटण्यास अनेक शहरातून साधक, भक्त, माणसे, मित्र ओळखीचे येत असत. भेटीस आलेल्या समोरच्या भक्ताला, विद्वानाला, महाधिपतीना, फडकरीना, साध्या वारकर्याला संसारिकाला, शिष्याला, नातेवाईकांना, प्रतिष्ठितांना त्यांच्या त्यांच्या परिचित व परिभाषेत त्यांच्या अनुभवाला स्पर्श करणारी भाषा वापरित व बोलत असत. ऐकणार्याच्या मनात माझ्यावर महाराजांचे किती प्रेम आहे. महाराज माझेच आहते असा भाव निर्माण होत असे, यामुळे महाराजाशी अतूट नाते तयार होऊन स्नेहबंधनाने माणूस बांधला जात असे. महाराजाना भेटल्यानंतर त्या व्यक्तीला महाराज आपणावर खूप प्रेम करतात. जिव्हाळा दाखवितात याचा अनुभव त्यांना मिळाला आहे.
पू. धुंडामहाराजानी सतत 70 वर्षे ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांनी हरिपाठ नाथाचा, हरिपाठ माऊलीचा, नारदभक्ती सूत्र, ज्ञानेश्वरांचे पसायदान, संकीर्तनमाला, अध्यात्मिक विचारधारा इ. ग्रंथाचे लेखन केले. प्रत्येक ग्रंथातील विषयाला स्पर्श करताना गीता, भागवत, उपनिषद, संतगाथा, श्रीरामायण व श्री महाभारत तसेच वेद, इत्याची शास्त्रीय ग्रंथाचे प्रमाणे दाखले देऊन विषय स्पष्ट केला आहे. अभ्यासकाला, कीर्तन प्रवचनकराला अनेक ग्रंथ पाहणे नकोच. आयते ज्ञानविचार तयार. काही कीर्तनकारांच्यामते व प्रवचनकारमते महाराजांच्या ग्रंथाप्रमाणे चिंतन कीर्तनातून मांडले तर श्रोते खूष आम्ही ही खूष. आम्हा कीर्तनकाराचे मोल वाढले. अशी एकमेकांना कबुली देतात.
महाराष्ट्रातील त्यांच्यावर अनेक विद्वान पंडित प्रेम करीत असत. त्यांनी लिहिलेल्या संत विचार ग्रंथाला प्रस्तावना, अभिप्राय, आशीर्वादप्रचार शब्द लिहून देत असत. महाराजांच्या शब्दांनी त्या मूळ ग्रंथास मोल येत असे. ते ग्रंथ प्रसिद्ध पावन असत. त्यांची भाषा सामाजिक विद्वत्तेचा स्तर, सामाजिक मनाची ज्ञानाची पातळी पाहूनच विवेचन करीत असत. सामाजिक मनाला स्पर्श करणारी, कुरवाळवारी सहजपणे ज्ञान शिरणारी भाषा वापरित असत.
विद्वानांनी, प्राध्यापकांनी, साहित्यिकांनी, विचारवतांनी प्रशंसा केलेले त्यांचा ग्रंथ- ज्ञानेश्वरांचे पसायदान. त्यांच्या या श्रीज्ञानेश्वरी उपासनेबद्दल व प्रकटनाबद्दल पुणे विद्यापीठाने पू. धुंडामहाराजाचा डि.लिट. ही पदवी देवून गौरव केला होता. सत्कार केला होता. त्या सत्काराला नम्रपणे त्यांनी उत्तर दिले ते असे - श्री ज्ञानेश्वरी मला कळाली म्हणून मी लोकांना सांगितली नाही. तर मला ती कळली म्हणून मी ज्ञानेश्वरी सांगितली. वाचकांनी यातील भाव जाणून घ्यावा.
सारांश, पू. धुंडामहाराजांच्या बद्दल किती बोलणे किती लिहावे, किती त्यांचे अनुभव सांगावे, किती म्हणून त्यांचे संतक्षण, ज्ञानक्षण, सद्गुरुक्षण, ज्ञानकण, सहवासक्षण, त्यानी दिलेले आनंदक्षण, भक्तीक्रम तसेच आशीर्वादक्षण, प्रसंगक्षण नित्य स्मरणासाठी, मनात नित्त चिंतनासाठी मनाच्या आनंदासाठी, पू. सद्गुरु धुंडामहाराजांच्या जीवनाला जवळून पाहण्यासाठी त्यांच्या आयुष्यात डोकावण्यासाठी प्रेम-प्रवास-प्रबोधन ह्या तीन गोष्टीतून पहावे.
प्रेम-संपूर्ण महाराष्ट्राला प्रेम भरभरून दिले आहे. त्याचे साक्षीदार आज विद्यमान आहेत. संत मंडळीना, वारकरीमंडळीना, मठाधिपतींना भरभरून प्रेम मिळाले आहे. त्यांच्या कुटुंबालासुद्धा महाराष्ट्राइतके प्रेम मिळाले नसावे असे वाटते.
प्रवास - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी प्रवास केला. ऊन, वारा, पाऊस, बैलगाड्या उलटल्या. तहान, भूक यांचा त्रास सहन केला. पण वारी पूर्ण केली. प्रबोधन केले. महाराष्ट्रात खेड्यापाड्यात त्यांनी संत वाङ्मयांचा प्रचार-प्रसार केला. व्यसनमुक्ती करण्यासाठी त्यांनी प्रसार केला. समाजाचे प्रबोधन केले. पूज्य सद्गुरु धुंडामहाराज देगलूरकर म्हणजे ज्ञानाची भक्ती माऊली.
ज्ञानेश्वरीशी एकरूप झालेले, धुंडामहाराज. मस्तकात ज्ञानेश्वरीचे ज्ञान, हृदयात ज्ञानेश्वरीची भक्ती, उदयात उपासकाबद्दल अपारप्रेम. ज्ञानेश्वरी म्हणजे त्यांचा प्राण, त्यांचा श्वास, ज्ञानेश्वरी म्हणजे त्यांचा जीवन विश्वास होता. गुरूवर्य धुंडामहाराज यांच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त फुले अर्पण करतो. त्या फुलातील गुरुभक्तीगंध मला नित्य मिळावा ही प्रार्थना श्री सद्गुरु चरणी-
मज हृदया सद्गुरु । तेणेची तारिलो हा संसारपुरू।
म्हणोनी विशेषें अत्यादरू। विवेकावरी।। ज्ञानेश्वरी ।।