Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दयाभाव

दयाभाव
, सोमवार, 1 जून 2015 (12:54 IST)
परमहंस श्रीरामकृष्ण परिवारात श्रीदुर्गाचरण नाग यांचेच नाव नागमहाराज म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्यात अद्भुत असा सेवाभाव होता. एकदा एक गरीब माणूस आपल्या झोपडीत जमिनीवरच झोपलेला त्यांनी पाहिला. आपल्या घरी जाऊन त्यांनी अंथरूणच आणले व त्यावर त्यास  झोपविले.
 
एका कडाक्याच्या थंडीत एक गरीब माणूस कुडकुडत पूर्ण आखडून गेलेला त्यांना दिसला. त्यांनी आपली लोकरीची शाल त्यास पांघरली व रात्रभर त्याच्या सेवेत ते राहिले.
 
कोलकाता येथे प्लेगची साथ प्रबळतेने पसरलेली होती. त्या लोकांची सेवा करणारे केवळ नागमहाराज एकटेच होते. तो संसर्गजन्य रोग भयानक समजून कुणी त्या रोग्याकडे फिरकत नसत. 
 
एक असाच रोगी केवळ गंगातीरावर कुणी पोचवावे अशी आशा ठेवून धडपडत होता. शेवटी नागमहाराज यांनी त्यास खांद्यावर घेऊन गंगातीरावर नेले. तो मरणोन्मुख रोगी तेथे समाधानाने प्राणत्याग करेपर्यंत ते जवळ बसून राहिले. त्याची आत्मजेत विझताच तचे संस्कार करून ते घरी आले. आपल्या प्राणाचा मोह नागमहाराज यांना या कर्तव्यात बाधा आणू शकला नाही. एकदिवस एक अतिथी त्यांच्या घरी आला. घरातील चार खोल्यांपैकी तीन पूर्ण गळणार्‍या होत्या. जोराची वर्षा होत होती. केवळ एक खोली मात्र कोरडी राहात होती. तिथे त्यांनी अतिथीची व्यवस्था केली. त्या रात्री पत्नीस म्हटले की आज सद्भाग्याचा दिवस आहे. आपण रात्रभर भजन करीत राहू. आणि त्या प्रमाणे ती रात्र त्या दांपत्याने केवळ भजनात घालवली. नागमहाशांच्या गावात त्या दिवशी घराचे छत घालण्याचे काम चाललेले होते. घरावरील छत ग्रीष्म ऋतूत त्या भयानक उष्णतेत कामगार घालीत आहेत, हे पाहून त्यांचे मन द्रवले. लगेच ते घरातील छत्री घेऊन वर गेले. आणि ती छत्री उघडून ते कामगारावर सावली करून उभे राहिले. मजूरदार आक्षेप घेत असले तरी त्यांनी ते मानले नाही. कारण तेथे येणारी दयेची भावना प्रबळ होती.
 
डॉ. भीमाशंकर देशपांडे 

Share this Story:

Follow Webdunia marathi