Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंगलमय दीपपूजन की लाजिरवाणी गटारी?

मंगलमय दीपपूजन की लाजिरवाणी गटारी?
2 ऑगस्टला आषाढातील अमावस्या आहे. हल्ली या दिवसाला आपल्याला खरेतर लाज वाटावी इतकी कुप्रसिद्धी, “गटारी” म्हणून मिळत आहे.जेव्हा आमच्या आजूबाजूची अमराठी माणसे”गटारी”चा अर्थ विचारतात तेव्हा आमचेच काही मित्र “त्या दिवशी इतकी प्यायची की गटारात पडून गटारे फुल झाली पाहिजेत”,अशी फुशारकी मारतात.आपल्या समाजातील चांगल्या प्रथा एकमेकांना दाखविण्याच्या स्पर्धेच्या या दिवसात आम्ही मात्र अशा फुशारक्या मारतो.अमराठी लोकांना वाटते की काय यांचे हे गटारात पडायचे सण? शीs!
वास्तविक पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. कारण-
१) या कुंद पावसाळी वातावरणात मांसाहार पचत नाही.
२) हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो.याच काळात प्राण्यांची हत्या केली तर  साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो.त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३) बाहेरच्या वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आणि शरीरावर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते.शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
त्यामुळे एकदा याला धार्मिक जोड दिली की अपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.
अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. शाकाहारामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.
पुढे ४ महिने साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांसाठी, पूजांसाठी तयारी म्हणून पूर्वींच्या मोठमोठ्या घरातून विविध दिवे शोधून ते साफसूफ करून या दिवशी अत्यंत भक्तिभावाने पूजले जात असत. आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दीपपूजन करून,अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण नैवेद्य दाखवतात. खूप आनंददायी आणि मंगल अशी ही दीप-अमावास्या आपण सर्वांनी उत्साहात साजरी करूया.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिव्याची अमावस्या कि गटारी अमावस्या!