Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा
ज्येष्ठ महिना. नावाप्रमाणेच सर्व ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा हा महिना. ऋतूचक्रातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो. हा महिना तसा गंभीर, शांत आणि संथही. ग्रीष्माची चाहूल लागलेली, आभाळ भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला, मध्येच पावसाची हलकी सर येणार्‍या पावसाळ्याची आठवण करून देते. उन आणि पावसाळ्याचं 'फ्यूजन' म्हणजे हा महिना. निरोप घेणारा उन्हाळा नि सुरू होणारा पावसाळा यांची गळाभेट या महिन्यात पाहता येते. अशा या स्वप्नील वातावरणाला धार्मिक अधिष्ठानही लाभले आहे.

webdunia
ND  
ज्येष्ठात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. या पौर्णिमेला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्यामागचे वैज्ञानिक महत्त्वही समजून घेणे अगत्याचे आहे. वास्तविक शास्रकारांनी अनेक सण, उत्सवांची रचना त्यातील वैज्ञानिक संदर्भ लक्षात घेऊन केली असावी, असे वाटण्याइतपत या सणांमागे विज्ञान आहे. दुर्देवाने ते जाणून न घेता, केवळ परंपरा म्हणून ते करण्याचा अट्टाहास धरला तर मग शास्रार्थ जाऊन त्याला कर्मकांडाचे स्वरूप येते.

webdunia
WD  
वटपौर्णिमेचेही तसेच आहे. सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या महिन्यात सर्व सवाष्णी सौभाग्यरक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. (मग तो कितीही दुर्गुणी का असेना.)

या व्रतामागचा शास्त्रार्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. वड ही उपयुक्त वनस्पती आहे. डेरेदार अशा या वटवृक्षाच्या आजूबाजूला एक दुनिया वावरत असते. वडामुळे उन, पावसापासून आपले संरक्षण होते. तापल्या उन्हातून जाणारा पांथस्थ वडाखाली थांबतो तेव्हा त्याचा सारा शीण नाहीसा होतो. वडाच्या ढोल्यांमधून कावळे, घार, गिधाड (पर्यावरणाची स्वच्छता करणारे पक्षी) यांच्यासह चिमण्या, पारवे, पोपट आदी पक्षीही राहतात.

webdunia
WD  
वडाची बारीक बारीक फळे हे त्या पक्ष्यांचे अन्न आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व या झाडावरच अवलंबून आहे. त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडणार्‍या बियांमुळे परागीभवनाचे 'ज्येष्ठ' काम होते. झाडांच्या बिया अन्य ठिकाणी रूजून पर्यावरण संवर्धनास पक्ष्यांची मदत होते. परिसरात वडाच्या झाडाचे अस्तित्व असणे हे त्या परिसराचा पर्यावरण समतोल असल्याचे द्योतक आहे.

वडाच्या पारंब्या जमिनीत रूजून नवीन झाड तयार होते. त्यामुळे दाट झाडी तयार होऊन त्याखाली लहान वनस्पती वाढू शकतात. कमी उन मिळणार्‍या भागात या प्रकारच्या वनस्पती वाढतात. वेलींना आधार मिळतो. खाली पडलेल्या, कुजलेल्या पालापाचोळ्यापासून नैसर्गिक, जैविक खत मिळते. वडाची मुळे खूप खोलवर पसरलेली असतात. त्यांची माती धरून ठेवण्याची क्षमताही चांगली असते. त्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते.

वडाचे झाड जंगलात असणे हे त्या जंगलाच्या संपन्नतेचे लक्षण आहे. त्यामुळेच आपल्याकडच्या कितीतरी देवरायांमध्ये वडाच्या झाडाचे प्रमाण लक्षणीय आहे. वडाचे बरेच औषधी उपयोगही आहेत. वडाच्या मुळांपासून (पारंब्यांपासून) निघणारे तेल केशवर्धक तर आहेच पण वीर्यवर्धक म्हणूनही त्याचा उपयोग होतो. पुरूषांच्या पुष्कळशा व्याधींवर आयुर्वेदात या मुळ्यांचा उपयोग केलेला आढळतो. ह्रदयरोगावर वडाच्या मुळांचा खूप उपयोग होतो. त्यामुळे या वृक्षाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी त्याला पूजेचा मान देऊन त्याचा गौरव केला आहे.

म्हणूनच की काय 'मला मुलं व्हावीत असा आशीर्वाद देतोस, आणि माझ्या नवर्‍याला घेऊन जातोस' असे प्रत्यक्ष यमदेवाला म्हणणार्‍या सावित्रीने नवर्‍याच्या आयुष्यवर्धनासाठी वडाचीच निवड केली असावी. आधुनिक सावित्रींनीही हा शास्त्रार्थ लक्षात घ्यायला हवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सावित्री आणि वटपौर्णिमा