Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vatsavitri pooja : सावित्री आणि वटपौर्णिमा

Vatsavitri pooja : सावित्री आणि वटपौर्णिमा
आपल्या पतीच्या  दीर्घायुष्यासाठी महिला वटपौर्णिमेचा सण साजरा करतात. महिलांच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणार्‍या आजच्या वटपौर्णिमा   सणानिमित्त..वटवृक्षाला संस्कृतमध्ये ‘अक्षयवृक्ष’ असे म्हटले जाते. ‘अ’ म्हणजे नाही आणि ‘क्षय’ म्हणजे विनाश! ज्याचा कधीही विनाश होत नाही अर्थात जो पुन्हा जिवंत होतो, वाढत जातो तो अक्षय वृक्ष म्हणजेच वटवृक्ष! वटवृक्षाचं खोड रुंद असते. त्याच्या फांद्या खूप विस्तारित असतात, त्याला फुटणार्‍या   पारंब्या जमिनीच्या खोल भागात जातात आणि त्याला मुळे फुटून पुन्हा वटवृक्ष तयार होतो. या वृक्षाच्या रुंद विस्तारात शेकडो पक्षी आपली घरटी बनवून वास्तव्य करतात. अनेक जनावरं ऊन-पावसात सावलीचा आश्रय घेतात. फार पूर्वी आणि आजही खेडय़ातून बैलगाडीने किंवा पायी प्रवास करणारे शेकडो पांथस्थ या वटवृक्षाखाली निद्राधीन होऊन विश्रंती घेतात. अशा या परोपकारी वटवृक्षाचे महत्त्व आमच्या संस्कृतीसंरक्षक पूर्वजांनी ‘वटपौर्णिमा’ या दिनाच्या निमित्ताने समाजापुढे आणून प्रस्थापित केले आहे. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेलाच या ज्ञानी लोकांनी ‘वटपौर्णिमा’ हे नामाभिधान दिले आहे. भारतीय स्त्रिया ह्या दिवसाच्या एक दिवस आधी आणि एक दिवस नंतर असे मिळून तीन दिवस वटपौर्णिमेचे व्रत करतात. पौर्णिमेच्यादिवशी स्त्रिया नववस्त्र व अलंकार परिधान करून वृक्षाची पूजा मनोभावे करतात. हळदी-कुंकू, फुलं आणि ह्या ऋतूतील फळांचा नैवेद्य दाखवतात आणि ‘अक्षय सौभाग्या’साठी प्रार्थना करतात. स्त्रिया परस्परांना सौभाग्यवाण म्हणून खण, नारळ, फळं, बांगडय़ा असे दान करतात आणि संपूर्ण दिवस उपवास करतात. सत्यवान-सावित्रीची कथा वाचतात. दुसर्‍या दिवशी उपवासाचे पारणे म्हणून गरीब, ब्राह्मणाला भोजन देतात व गरजूंना धनदान करतात.

या वटपौर्णिमेशी निगडित मूळ महाभारतातील एक कथा जनमनात आजही प्रचलित आहे. भद्रदेशाचा आदर्श राजा अश्वपती ह्याला सावित्री नावाची एक सुंदर, सुविद्य कन्या होती. ती उपवर होताच राजाने तिला आपला पती स्वत:च निवडण्याविषयी सांगितले. महाभारतकालीन हे भारतीय स्त्री-स्वातंत्र्य नाही का? सावित्रीने द्युमत्सेनाचा पुत्र सत्यवान ह्याची निवड केली. कारण तो पितृभक्त, बुद्धिमान आणि गुणरूपसंपन्न होता, परंतु त्याचा पिता राजा द्युमत्सेन शत्रूकडून पराजित होऊन त्यावेळी राज्य गमावून जंगलात राहात होता.

शिवाय ती पती-पत्नी दोघेही आंधळी होती, इतकेच नव्हे तर नारदमुनींच्या सांगण्यानुसार सत्यवान अल्पायुषी होता. तरीदेखील सावित्रीने एकदा मनाने त्यालाच वरलं असल्यामुळे हा विवाह झाला. त्यानंतर सावित्रीने वनात साध्या वेषात राहून आपल्या ह्या तीन व्यक्तींची मनोभावे सेवाशुश्रूषा सुरू केली. एकेदिवशी सत्यवानासह जंगलात लाकडं तोडायला गेली असता यमधर्माने त्याचे प्राण हरण केले. त्यावेळी सावित्रीने धीटपणाने सतत तीन दिवस त्याच्याशी युक्तीवाद आणि शास्त्रचर्चा केली. तेव्हा त्या यशस्विनीला यमाने ‘तीन वर’मागण्यास सांगितले, मात्र सत्यवानाचे प्राण वगळता! तेव्हा सावित्रीने आपल्या सासुसासर्‍यांनी गमावलेली दृष्टी, त्यांचे राज्य आणि स्वत:साठी एक पुत्र मागितला आणि अनावधानाने यमदेवांनी ‘तथास्तु’ म्हटले. अर्थात त्यामुळे सत्यवानाचे प्राण परत आले. पुढे सत्यवान-सावित्री ह्या पुण्यलोक दांपत्याने सदाचाराने ऐश्वर्यवान बनून प्रदीर्घ काल लोककल्याणकारी राज्य केले. म्हणून सावित्री म्हणजे पातिव्रत्याचे प्रतीक ठरले.

वटवृक्ष हा एक औषधी वृक्ष आहे. त्याच्या सालींपासून अनेक रोगांवर गुणकारी औषधं बनवली जातात. पावसाळ्याच्या सुरुवातीला वटवृक्षाच्या पानांमधून थॉरिअस नावाचा एक द्रव पाझरतो. त्यामुळे स्त्रियांचे विविध प्रकारचे गर्भाशयासंबंधीचे विकार दूर होतात. बहुधा त्यामुळे हे व्रत ज्येष्ठ महिन्यात करण्याचे वैज्ञानिक पूर्वषींनी ठरवले असावे. वटवृक्ष हा 24 तास प्राणवायू सोडणारा वृक्ष आहे, हे विज्ञानशास्त्रानेही मान्य केले आहे. बहुधा त्याचाही समावेश सत्यवानाचे प्राण परत येण्यात असणे शक्य आहे.

‘नास्ति मूलं अन्नौषिधम’ = कोणतीही वनस्पती ही अनौषधी नसते. अर्थात प्रत्येक वनस्पतीत काही ना काही औषधी गुण असतोच, हे आमच्या पूर्वजांनी संशोधन करून जाणले होते. म्हणूनच वटवृक्षासारख्या महान गुणकारी वृक्षाचा गौरव करण्यासाठी ह्या व्रताची वटवृक्षाशी सांगड घातली असावी. सामान्यजनांच्या समजुतीसाठी ह्या पौराणिक कथेचा आधार घेऊन त्याचे एका व्रतात रुपांतर करण्यात आले, परंतु त्या अनुषंगाने महाभारतकालीन भारतीय स्त्रीचे व्यक्तिमत्त्वही प्रतीत होते एवढे निश्चित!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vat Purnima Vrat 2017 : महिमा वटवृक्षाचा