बोडण संपूर्ण माहिती
बोडण हा विधी चित्पावन ब्राह्मण यांच्या कुळात केला जाणारा एक कुलधर्म किंवा कुलाचार आहे. मांगलिक कार्य जसे लग्न, मुंज किंवा शुभवृद्धी झाल्यावर बोडण भरण्याची प्रथा असते. कोकणस्थ ब्राह्मण आपल्या कुळातील चालीप्रमाणे बोडण भरतात.
कुळाच्या परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक किंवा घरात शुभ कार्य झाल्यावर बोडण भरण्याची परंपरा असते. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास, पौष किंवा चैत्र महिना सोडून धार्मिक विधी करता येते.
बोडण विधी
या धार्मिक विधीसाठी चार सवाष्णी ( घरातील एक व बाहेरच्या तीन सवाष्णी) व एक कुमारिका असते. बोडण दुपारी 12 वाजेपूर्वी भरावयाचे असते. सुवासिनी व कुमारिका यांना तेल शिकेकाई देऊन सुस्नान होऊन सोवळ्याने अर्थातच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेऊन येण्यास सांगितले जाते. त्यांचे स्वागत तुळशीपाशी पायावर दूध पाणी घालून, औक्षण करुन, ओटी भरुन केले जाते. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात.
बोडणाची जागा स्वच्छ करुन सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक चौरंग ठेवून त्यावर ठरावीक पद्धतीचीच रांगोळी काढातात. चौरंगावर अक्षदा ठेवून त्यावर बोडण भरण्यास लाकडी काथवट किंवा पितळ्याची किंवा तांब्याची परात वापरली जाते. विधीच्या सुरुवातीस सुपारीचा गणपती मांडून त्याची षोडशोपचारे पूजा केली जाते. नंतर घरातील देवीला ताम्हणात घेऊन देवीची तद्वत पूजा केली जाते. कणकेत हळद घालून दुधात भिजवून त्याचा चौरंग तयार करुन त्यावर आपल्या देवघरातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती बोडणासाठी परातीत ठेवली जाते. मूर्तीमागे हारा-डेरा ठेवून दुधाने भराला जातो. देवीसाठी मणी-मंगळसूत्र, वेढी-विरोल्या, बांगड्या, गळेसर, वेणी हे सर्व कणकेचे अलंकार तयार केले जातात. याशिवाय त्याच कणकेचे पाच भंडारे, पाच दिवे व दोन मुटके केले जातात. भंडारे प्रत्येकी एकेक या स्वरूपात वाहायचे असतात.
परातीत छोटे पाच नैवेद्य वाढून देवीला दाखवलं जातात. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी देवीची आरती केली जाते. नंतर ते पाच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवले जातात. एक नैवद्य परातीबाहेर दाखवितात. हे नैवेद्य कुमरिकेस किंवा बोडणासाठी बसलेल्या घरच्या सुवासिनीस व घरच्यांना भोजनास प्रसाद म्हणून देतात.
आरती झाल्यावर घरातील दुसरी बाई चांदीच्या संध्येच्या पळीस साखळी गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी पाच पळ्या दूध व दही घालते जाते. नंतर घराची मालकीण सर्वांना बोडणाच्या परातीला हात लावण्यास सांगते. याला बोडण कळवणे म्हणतात. नंतर इतरांकडून बोडण कालवावयास सुरुवात केली जाते. बोडण कालवत असतात देवी तृप्त झालीस का ? किंवा पंचामृतातील कोणता पदार्थ पाहिजे ? असे कुमारिकेस विचारले जाते, कुमारिकेचे समाधान होईपर्यंत पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) घालत रहावयचे असतात. नंतर आधी कुमारिका देवी, पैसा व सुपारी त्या बोडणातून काढते नंतर देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवते. बोडणातले पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात थांबवते. परातीतील बोडण चमचाभर काढून सर्वांना अंगारा म्हणून लावला जातो. बोडण झाल्यानंतर देवी धुवून, स्नान घालून परत घरातील देवघरांत पूजा करून ठेवली जाते. त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसादाचे भोजन करावयाचे असतात.
कालवलेले बोडण गाईस खायला घालावयाचे असतात अथवा नदीत सोडून द्यावे असतात.
बोडणाचे नियम
बोडणास बसताना घरच्या सुवासिनीचे तोंड पूर्व दिशेला असते.
कुमारिका तिच्या उजव्या बाजूस बसते.
घरातील मंडळींनी बोडण चालू असताना येऊन नमस्कार करायचा असतो.
बोडण हा विधी दुपारी 12 च्या आत पूर्ण करवायचा असतो.
बोडण भरताना कुळात कुठीही गरोदर नसावं.
बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात.
बोडणाची आरती
जय देवी जयदेवी जय अंबामाते।.
तुमचा मी आज खेळ मांडीते ।।धृ।।
सुवासिनी कुमारी ह्या आल्या सदना।
पाय धुवूनी करिते आऔक्षणा।।
कुंकुम श्रीफल देवुनि ओट्या ही भरिते।
लीन होऊनी वंदन करिते ।।१।। जय देवी।।
आवड तुम्हा मोठी पंचामृताची।
तशीच आहे पुरणा वरणाची।।
दूध, दही, तूप, मध, शर्करा नच कमिते ते।
तृप्त होऊनि चेले तू माते ।।२।। जय देवी।।
सुवासिनी कुमारी बसती प्रेमे भोजना।
त्यासी आर्पिते वीडा दक्षणा।।
भक्ति भावे केला खेळ मानुनि घेई।
सौभाग्य समृद्धी सकला देई ।।३।। जय देवी।।