यंदा चातुर्मास व्रत 2023 (Chaturmas 2023) 29 जून गुरुवार ते 23 नोव्हेंबर गुरुवार पर्यंत आहे. नावाप्रमाणेच चातुर्मास व्रत चार महिने चालते. चातुर्मास आषाढ महिन्यात देव शयनी आषाढी एकादशीला सुरू होतं आणि कार्तिक एकादशीला संपतो. चतुर्मास म्हणजे चार महिने अर्थातच आषाढाचे 20 दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते. तसेच सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. आणि चातुर्मास संपतो.
यावेळी 5 महिन्यांचा चातुर्मास
चातुर्मास दरवर्षी साधारणपणे 4 महिन्यांचा असतो परंतु ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो. अशात पंचांगानुसार या वर्षी श्रावण महिन्याला अधिक मास येत असल्याने चातुर्मासात अधिकचा एक महिना वाढून 5 महिन्यांचा चातुर्मास होईल. त्यामुळे यावेळी भगवान विष्णू 5 महिने योग निद्रामध्ये राहतील.
चातुर्मासात हिंदूंचे विवाहमुहूर्त नसतात
यंदा आषाढ महिना 19 जूनपासून सुरू होत असून या महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपासून चातुर्मास सुरु होत आहे. देवशयनी आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू श्रीरसागरात 5 महिन्यांसाठी योगनिद्रेत असतील. नंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशीला देव जागे होतील. अशात या 5 महिन्यांच्या कालावधीत विवाह, मुंडन इत्यादी कोणतीही शुभ कार्ये केली जाणार नाहीत.
चातुर्मास व्रत
सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. जसे पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (न मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्र भोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजन नियम केले जातात.
काही महिला चातुर्मासात धरणे-पारणे नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार मास केलं जातं. कित्येक लोक चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात तर काही एकभुक्त रहातात.
चातुर्मास अवर्ज्य
चातुर्मास्यात हविष्यान्न म्हणजे यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न सेवन करावे, असे म्हटले जाते. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत.
चातुर्मासात येणारे प्रमुख सण
चातुर्मासात अनेक प्रमुख सण येतात. या काळात श्रावण सोमवार, रक्षाबंधन, नागपंचमी, गणेशोत्सव, पितृ पक्ष, नवरात्रीचा यांचा समावेश होतो.