Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चातुर्मास महत्तव आणि नियम

चातुर्मास महत्तव आणि नियम
, शनिवार, 24 जुलै 2021 (16:51 IST)
चतुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ. याला चातुर्मास असेही म्हणतात. चतुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. 
 
आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चतुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस 'प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला चतुर्मास नसतो. चतुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी धारणा आहे.
 
ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो. चातुर्मासात हिंदूंचे विवाहमुहूर्त नसतात. शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात, आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात, आश्विनात पिकांची तोडणी होते, कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे.
 
व्रत उपासना
या काळात हिंदू धर्मांत अनेक व्रत-उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार (मुंज), विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे. भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हंटले जाते. संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायु, विष्णु अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो.
 
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चतुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत, असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’
 
देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते –
 
वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः ।
व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।
 
अर्थ: प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते.
या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते.
पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला.
मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.
परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.
चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात.
चातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते.
 
नियम 
‘सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (न मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’
 
‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.’
 
वर्ज्य
१.‘प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ़
२. मंचकावर शयन
३. ऋतुकालावाचून स्त्रीगमन
४. परान्न
५. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य
६. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे, असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथांत सांगितले आहे.
 
अवर्ज्य
चातुर्मास्यात हविष्यान्न (यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न) सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत. (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गजानन महाराज आरती, जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया ।