Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कधी आहे देव दिवाळी? यंदा 3 शुभ योगात करा प्रकाशाचा उत्सव

dev diwali
दिवाळी झाल्यानंतर वेध लागतात ते देव दीपावली किंवा देव दिवाळीचे. दिवाळी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. तर देव दिवाळी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला असते. देव दिवाळी का साजरी केली जाते आणि त्या मागील कारण काय? यंदाची देव दिवाळी अतिशय शुभ असून या दिवशी 3 शुभ योग असणार आहे.
 
आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे देव सुद्धा दिवाळी साजरी करतात. दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण आहे आणि देव दिवाळीला देखील तितकेच महत्त्व आहे.
 
दिवाळी कार्तिक महिन्याचे कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते तर देव दिवाळी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणजेच दिवाळीच्या पंधरा दिवसांनी देव दिवाळी साजरी केली जाते.
 
आता, देव दिवाळी का साजरी केली जाते आणि ती साजरी करण्यामागील कारण काय? याबरोबरच, देव दिवाळी कधी आहे, तारीख कोणती आहे, शुभ मुहूर्त काय असेल आणि महत्त्व? चला जाणून घेऊया.
 
देव दिवाळीचे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे एकूण पाच दिवस ही दिवाळी साजरी केली जाते. देव दिवाळी हा दिवस भारतात विविध प्रकारे साजरा केला जातो.
 
शिवाय, पवित्र अशा गंगा नदी स्नान करणे, नदीत दीपदान करणे, शिवाय कुलदेवतेची पूजा करणे ही अशी पुण्यकार्य या दिवशी केले जातात.
 
देव दिवाळीचा शुभ मुहूर्त
कार्तिक पौर्णिमा 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 03:52 पासून सुरू होत असून 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:45 वाजता संपत आहे. यावेळी 26 नोव्हेंबरला देव दिवाळी साजरी होणार आहे. देव दिवाळी साजरी करण्याचा शुभ मुहूर्त रविवार 26 नोव्हेंबर 2023 च्या संध्याकाळी 5:08 मिनिटांपासून 7:47 मिनिटांपर्यंत, म्हणजेच प्रदोष काळात आहे.
 
देव दिवाळीच्या दिवशी देवी-देवतांची विधिवत पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, असे म्हणतात. या दिवशी नदीत स्नान करण्याला आणि दिवेदान करण्यालाही विशेष महत्त्व आहे.
 
देव दिवाळी करायचे उपाय
 
स्नान करून भगवान शिव, भगवान श्रीहरी विष्णू आणि देवतांची पूजा आणि प्रार्थना करावी. नंतर संध्याकाळी नदीच्या काठावर जाऊन दिवा लावावा. जर तेथे शक्य झाले नाही तर मंदिरात जाऊन दिवादान करावा. याशिवाय, आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणीही दिवे लावावेत. भगवान श्री गणेश, भगवान महादेव आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची विधीवत पूजा करावी. भगवान शिव शंकरांना फुले, तूप, नैवेद्य आणि बेलाची पाने अर्पण करावी.
याचबरोबर, आपणही या दिवशी संध्याकाळी पिठाचे 11, 21, 51 किंवा 108 दिवे तयार करावेत. त्यात तेल टाकून नदीच्या काठावर देवी लावावेत. ते शक्य नसल्यास, तलाव किंवा विहिरीजवळ किंवा घरच्या घरी एका ठिकाणी पाण्याने भरलेल्या भांड्याजवळ हे दिवे प्रज्वलित करावेत. या दिवशी दीपदान करणं पुण्याचं काम मानले जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी केलंलं पुण्यकार्य आणि दान वर्षभर गंगाजल सेवन करणं इतका फलदायी मानले गेले आहे. म्हणून देव दीपावलीच्या दिवशी अशी पुण्य कार्य केल्याने घरात वर्षभर सुख-समृद्धी नांदते.
या दिवशी 11 कवळ्या हळद लावून घरात ठेवाव्या. देवी लक्ष्मीला स्थायी वसती देण्याचा हा उपाय आपल्या घरात धनाची कमी भासू देत नाही. शिवाय, या दिवशी घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानाचा तोरण लावावं. याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. याचबरोबर, घरात सुख-समृद्धीचा वास कायम असतो कारण देवी लक्ष्मीला तोरण अत्यंत प्रिय आहे.
शिवाय, देव दीपावलीच्या दिवशी शनि देवाची पूजा करावी. या दिवशी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने आपले जीवनातील अनेक समस्यांवर आपण मात करू शकतो. शिवाय, या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते.
शिवाय, या दिवशी गरिबांना उडीद डाळ आणि तांदूळ दान करा. यामुळे घरात धान्याचा साठा कमी पडत नाही.
आधी सांगितल्याप्रमाणे, हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा सर्वात शुभ दिवस मानला गेला आहे. या दिवशी स्नान, दान, व्रत आणि दीपदान यांचा विशेष महत्त्व आहे. यासोबतच, सुख-समृद्धीसाठी कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मीपूजनही केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रविवार व्रत कथा Ravivar Vrat Katha