गजानन महाराजांना बंकटलाल फार मान देत असे. एके दिवशी महाराजांना घरी नेऊन बंकटलालने त्यांची पूजा करून नैवेद्य अर्पण केला. महाराजांना कशाची आसक्ती नव्हती. महाराज ''गण गण गणात बोते'' असे भजन टिचक्यांच्या तालावर तासंतास म्हणत असे.
एकदा जानराव देशमुख नावाचे गृहस्थ फार आजारी पडले. पुष्कळ डॉक्टर, मोठमोठले वैद्य झाले. कोणाच्या औषधाने गुण येईना. त्यांचा नातेवाईकांच्या मनात विचार आला की गजानन महाराजांचे तीर्थ आणावे. तेव्हा त्याच्या जवळची मंडळी बंकटलाल यांच्याकडे जाऊन महाराजांचे तीर्थ मागू लागली. तेव्हा बंकटलाल यांनी म्हटले की हे काम माझे वडील करु शकता.
तेव्हा बंकटलालच्या वडिलांनी एका भांड्यात पाणी घेतले आणि गजानन महाराजांच्या पायाला लावले. ''हे तीर्थ म्हणून देऊ का ?' 'असे महाराजांना विचारले. महाराजांनी मानेनेच होकार दिला. ते तीर्थ घेऊन त्यांचे नातेवाईक तेथून निघाले.
घरी गेल्यावर जानराव देशमुखांना त्याने ते तीर्थ थोडे-थोडे पाजण्यास सुरुवात केली आणि सर्व औषधे बंद केली. तीर्थ चालू ठेवले. आश्चर्य म्हणजे थोड्याच दिवसात जानराव देशमुखांची तब्बेत सुधारली. ते गजानन महाराजांच्या पाय पडले. त्यांनी सर्व लोकांना स्वतःच्या खर्चाने जेवण घातले.