घाणा भरणे -
हा समारंभ वधू आणि वराचा घरी हळदीच्या दिवशी केला जातो. धान्य काढण्याच्या विधीला घाणा भरणे असे म्हणतात. या विधी साठी हळदीत बुडवलेला स्वच्छ कापड त्यात हळकुंड, सुपारी आणि पैसा बांधून मुसळ ला आणि जात्याला बांधतात. वधू आणि वराला आई वडिलांसह गव्हाचे चौक काढून त्यावर बसवतात. त्यांचे औक्षण करतात . पाच सवाष्णी वर आणि वधूचे आई वडील टोपलीत गहू, हळकुंड, सुपारी घालून कुटतात आणि जात्यात गहू घालून दळतात. अशा प्रकारे वर आणि वधूच्या सांसारिक जीवनाची इथून सुरुवात केली जाते. नंतर घाणा भरणाऱ्या सवाष्णींना हळद कुंकू लावून ओटी भरतात. नंतर मुलीचे आई वडील व मुलाच्या आई वडिलांना पाटावर बसवून सुवासिक तेल लावून उटणे लावतात.
हळदीचा विधी -
नंतर हळदीच्या विधीला सुरुवात केली जाते.हा विधी कार्यालयात केला जातो. हा कार्यक्रम आधी वधू पक्षाकडे केला जातो. सकाळी वधूच्या आई वडिलांना तेल उटणे लावून त्यांना पाण्यात भिजवून पेस्ट केलेली हळद विडाच्या पानाने पायापासून डोक्यापर्यंत लावली जाते. या प्रसंगी गाणे देखील म्हणतात. नंतर त्यांना स्नान घालतात.
नंतर ही उष्टी हळद घेऊन सवाष्णी गाजत वाजत वर पक्षाकडे जातात आणि तिथे वराला आणि त्याचा आई वडिलांना अशाच प्रकारे हळद लावण्याचा कार्यक्रम केला जातो. तसेच इतर नातेवाईकांना हळद लावली जाते. नंतर वर पक्षाकडून कडून वधू पक्षाच्या हळद घेऊन आलेल्या सवाष्णींनीची ओटी भरली जाते. वर पक्ष कडून वधू साठी हळदीची साडी दिली जाते. अशा प्रकारे हळदीचा आणि घाणा भरण्याचा समारंभ केला जातो.