Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री गोरक्षनाथांची जन्मकथा

श्री गोरक्षनाथांची जन्मकथा
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (09:59 IST)
श्री सदगुरु मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगालात चंद्रगिरी गावास गेले. तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता. त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठगोत्री गौडब्राह्मण रहात असेल. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अति रूपवती असून सद्गुणी असे; पण पुत्रसंतती नसल्याकारणाने नेहमी दिलगीर असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेले. त्यांनी अंगणात उभे राहून 'अलख' शब्द केला आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्यास आसनावर बसविले आणि भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीगत सांगून संतति नसल्याने दिलगीर आहे, असे त्यास सुचविले आणि काही उपाय असला तर सांगावा; म्हणून विनंति करून ती त्याच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्याने सूर्यमंत्राने विभूति मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की, हे भस्म रात्रीस निजतेवेळी खाऊन नीज. हे नुसतेच भस्म आहे, असे तू मनात आणू नको, हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय ! तो तुझ्या उदरी येईल, त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन; तेणे करून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धि त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठले असता, तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले. तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेले.
 
सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेविली. मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली. तेथे दुसऱ्याही पाच-सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी तिनेहि आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफाड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म खाल्ले असता, मला पुत्र होईल काय म्हणून विचारले. तेव्हा एकजणीने तिला सांगितले की, त्यात काय आहे? असल्या धुळीने का पोरे होतात? तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे? आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही. अशा तर्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपल्या घरे गेली व गाईच्या शेणाच्या गोठ्यात  त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले.
 
बारा वर्षानंतर जेव्हा मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली. तिने नाथांना ओळखले. ''मुलगा कुठ आहे?'' नाथांनी विचारले. ''मला मुलगा झालाच नाही.'' तिने सांगितले. ''खोट बोलू नकोस! मी तुला १२ वर्षा पूर्वी जे भस्म दिले होते त्या भस्माचे काय झाले?'' नाथांनी प्रश्न केला. ''मी ते गाईच्या शेणाच्या गोठ्यात टाकले. असे ऐकल्यावर नाथांना क्रोध येतो. त्यावेळी ती स्ञी नाथांची माफी मागते. योगीराज, मला क्षमा करा!''. त्यावेळी नाथ म्हणतात, मला ती जागा दाखव. तिने नाथांना ती जागा नेऊन दाखविली. त्यावेळी सदगुरु मच्छिंद्रनाथ म्हणतात, ''हे प्रतापवंता, हरिनारायणा, सूर्यसूता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेर ये!''. ''गुरुराया, मी इथे आहे. गोवऱ्यांची रास मोठी आहे. तुम्ही मला बाहेर काढा.''मच्छिंद्रनाथांनी लगेच खाच उकरून त्या मुलास बाहेर काढले. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. सरस्वतीला पश्चाताप झाला. मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले. व गाईच्या शेणाच्या राक्षेतुन जन्म झाला म्हणुन त्यांचे गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले. त्याला शाबरी विद्येत प्रवीण केले. अस्त्रविद्येतही निपुण केले. 
 
योगबळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतले होते. सिद्ध सिद्धांतपद्धती, अमनस्कयोग, विवेकमार्तंड, गोरक्षबोध, गोरक्ष शतक इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत. गिरनारपर्वतातील श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले. चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला. नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात. नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. त्याच प्रमाणे उत्तरप्रदेश येथिल गोरखपुर जिल्ह्यात गोरक्षनाथांचे भव्य मंदिर आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरुचरित्र – अध्याय सदतीसावा