Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्तिक माहात्म्य - अध्याय १८

Kartik Mahatmya adhyay 18
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (13:35 IST)
नारद म्हणालेः-- राजा ! त्या पेरलेल्या बीजांपासून तीन वनस्पति आवळी, मालती व तुळसी अशा उत्पन्न झाल्या ॥१॥
सावित्रीपासून आवळी, लक्ष्मीपासून मालती व पार्वतीपासून तुलसी. तम, सत्व व रज या गुणांनीं युक्त अशा उत्पन्न झाल्या ॥२॥
वृंदेच्या लावण्यतिशयानें विभ्रम झालेले विष्णु या स्त्रीरुपी तीन वनस्पति पाहून उठून बसले ॥३॥
व कामासक्त अंतः करणानें त्यांची याचना केली तेव्हां विष्णूकडे तुलसी व आवळी प्रीतीनें पाहूं लागल्या ॥४॥
पूर्वी लक्ष्मीनें जें बीज दिलें तें ईष्येनें अर्पण केलें होतें. त्यापासून उत्पन्न झालेली स्त्री मालती ईर्षायुक्त झाली ॥५॥
म्हणून ती निंदित वर्वरी असें नांव पावली. आवळी व तुळशीवर विष्णुची प्रीति असल्यानें त्या सदा भगवंताला आनंद देणार्‍या प्रिय झाल्या ॥६॥
तेव्हांपासून विष्णु वृंदेचे दुःख विसरले व त्या दोघींसह आनंदानें वैकुंठास गेले. तेव्हां सर्व देवांनीं त्यांना नमस्कार केला ॥७॥
याचकरितां कार्तिकोद्यापनाचे वेळीं तुळशीच्या खालीं विष्णूची पूजा सांगितली; तुळशीच्या मूळाजवळ केलेली पूजा विष्णूला प्रियकर आहे ॥८॥
हे राजा ! ज्याच्या घरीं तुळशीची बाग आहे, त्याचें घर तीर्थाप्रमाणें पवित्र आहे. तेथें यमदूत येत नाहींत ॥९॥
तुळशीची बाग सर्व पाप नाहीसें करणारी आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. जे नरश्रेष्ठ तुळशी लावितात, त्यांना यमाचें दर्शन होणार नाहीं ॥१०॥
नर्मदेचें दर्शन, गंगेचें स्नान, तुळशीचा स्पर्श हीं तीन्ही सारखीं पुण्यकारक आहेत ॥११॥
तुळशीचें रोप लावणें, त्याचें रक्षण करणें, त्याला पाणी घालणें, तिचें दर्शन घेणें व तिला स्पर्श करणें यांपासून वाणी, मन व शरीर यांजकडून घडलेलीं सर्व पापें तुळशी नाहींशी करते ॥१२॥
तुलसीमंजिरींने जो विष्णु व शंकर यांची पूजा करितो तो कधींही पुन्हा जन्मास न येतां मोक्षास जातो; यांत संशय नाहीं ॥१३॥
पुष्कर आदिकरुन सर्व तीर्थे, गंगादिक सर्व नद्या व वासुदेवादिक सर्व देव हे तुलसीवनामध्यें राहतात ॥१४॥
तुळशीची मंजिरी घेऊन जर कोणी प्राण सोडील तर तो शेंकडो पापांनीं युक्त असला तरी यम त्याजकडे पाहाण्यास देखील समर्थ होत नाहीं ॥१५॥
तो विष्णूच्या जवळ सायुज्यतेला जाईल. राजा ! हें अगदीं खरें आहे. जो तुलसीकाष्ठाचें चंदन धारण करितो ॥१६॥
त्यानें पाप केलें तरी त्याच्या देहाला शिवणार नाहीं तुळशीच्या झाडांची सावली जेथें जेथें असेल ॥१७॥
तेथें श्राद्ध करावें; म्हणजे पितरांना दिलेलें अक्षय्य होतें, आवळीच्या झाडाखालीं जो पिंडदान करील ॥१८॥
त्याचे जे पितर नरकांत असतील ते मुक्तीला जातील. राजा ! जो मस्तकावर हातांत, मुखांत व शरीरावर ॥१९॥
आवळे धारण करील, तो विष्णूसारखा जाणावा ॥२०॥
आवळा, तुळशी व द्वारकेंतील माती गोपीचंदन हीं ज्याच्या देहावर आहेत, तो नेहमीं जीवन्मुक्त समजावा ॥२१॥
आवळे व तुळशीपत्र यांनीं मिश्रित पाण्यानें जो स्नान करील, त्याला गंगास्नानाचे फळ सांगितलें आहे. जो मनुष्य आवळीचीं पानें व फळें यांनीं देवाची पूजा करील ॥२२॥
त्याला सोनें, रत्ने, मोती यांनी पूजा केल्याचें फळ मिळतें. सर्व तीर्थे, ऋषि, देव, यज्ञ हे सर्व कार्तिकमासी ॥२३॥
तुळा राशीस सूर्य असतां आवळीमध्यें सर्वकाळ असतात ॥२४॥
कार्तिक महिन्यांत द्वादशीला तुळशीचें किंवा आवळीचें पान जो तोडील तो निंद्य अशा नरकास जाईल ॥२५॥
कार्तिक महिन्यांत जो आवळीचे छायेखालीं भोजन करील, त्याचें एक वर्षपर्यंतचें अन्नसंसर्गाचें पातक जाईल ॥२६॥
जो कार्तिकमासी आवळीचे मुळापाशी विष्णूची पूजा करील त्याला सर्व क्षेत्रांत विष्णूची पूजा केल्याचें पुण्य मिळेल. जसें विष्णूचें माहात्म्य वर्णन करण्यास ब्रह्मदेव समर्थ नाहीं, तसें आवळी व तुळशीं यांचें माहात्म्यही वर्णन करण्यास तो समर्थ नाहीं ॥२७॥
जो मनुष्य आवळी व तुळशी यांच्या उत्पत्तीचें कारण ऐकेल व दुसर्‍याला ऐकवील, त्याचीं सर्व पापें नाहींशीं होऊन उत्तम विमानांत पूर्वजांसह बसून स्वर्गास जातो ॥२८॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये धात्रीतुलसीमहिमाव० अष्टादशोऽध्यायः ॥१८॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिक माहात्म्य - अध्याय १७