Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्तिक माहात्म्य - अध्याय ६

कार्तिक माहात्म्य - अध्याय ६
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (12:59 IST)
नारद म्हणतातः-- दोन घटकाभर रात्र शिल्लक असतांना पहांटेस शुचि असा तिल, दर्भ, अक्षता इत्यादिकांनीं युक्त होऊन जलाशयाचे ठायीं स्नानाकरितां गमन करावें ॥१॥
देवखात, नदी व संगम ह्या ठिकाणीं स्नान केलें असतां अनुक्रमेंकरुन, उत्तरोत्तर दसपट पुण्य प्राप्त होतें व तीर्थामध्यें स्नान केलें असतां वीसपट फल प्राप्त होतें ॥२॥
नंतर विष्णूचें स्मरण करुन स्नानाचा संकल्प करावा आणि तीर्थादि देवतांना अर्घ्यदान करावें ॥३॥
' नमः कमलनाभाय ' या मंत्रानें विष्णूला अर्घ्य द्यावें ॥४॥
हे विष्णो, तूं वैकुंठ, प्रयाग व बदरिकाश्रम या तीन ठिकाणीं आपलें पदस्थान केलें आहेस; तेथील संपूर्ण देव, मुनि, वेद व यज्ञ यांसह तुझ्या प्रीतीकरितां मी कार्तिकमासीं प्रातः स्नान करितों हे दामोदरा, लक्ष्मीसहवर्तमान तूं प्रसन्न हो ॥७॥
हे देवा, तुझें ध्यान व तुला नमस्कार करुन या जलामध्यें मी स्नान करण्याला तयार झालों आहें; तरी तुझ्या प्रसादानें माझें पाप नष्ट होवो ॥८॥
विधियुक्त कार्तिकस्नान करणारा असा व्रती मी अर्घ्य देतों. तो राधा दामोदरा ग्रहण कर ॥९॥
कार्तिकांत नित्यनैमित्तिक कर्मे केलीं असतां सर्व पातकें जातात तर दैत्यनाशका विष्णो माझा अर्घ्य ग्रहण कर ॥१०॥
असे दोन अर्घ्य देऊन भागीरथी, विष्णु, शिव व सूर्य यांचें स्मरण करुन नाभीइतक्या पाण्यांत प्रवेश करुन यथाविधि स्नान करावें ॥११॥
गृहस्थाश्रम्यांनीं तीळ व आंवळकाठीचा कल्क आंगाला लावून स्त्रान करावें. विधवा व यती यांनीं तुलसीमूलाची माती अंगाला लावून स्त्रान करावें ॥१२॥
सप्तमी, अमावास्या, नवमी, द्वितीया, दशमी, एकादशी, द्वादशी व त्रयोदशी या दिवशीं तीळ व आंवळे आंगाला लावूं नयेत ॥१३॥
प्रथम तीन बुड्यांनीं मलस्त्रान करावें. नंतर मंत्रस्त्रान करावें. स्त्रिया व शूद्र यांनीं वेदोक्त मंत्र म्हणूं नयेत व त्यांनीं पुराणोक्त मंत्रांनीं स्त्रान करावें ॥१४॥
स्त्रानमंत्रः-- जो भक्तभावन परमेश्वर देवकार्याकरितां तीन रुपांनीं झाला तो सर्व पाप नाश करणारा विष्णु कृपेनें मला पवित्र करो ॥१५॥
सर्व देव विष्णूच्या आज्ञेनें कार्तिकव्रत करणारांचें रक्षण करितात; ते सर्व इंद्रादि देव मला पवित्र करोत ॥१६॥
समख सबीज सरहस्य वेदमंत्र, देव, काश्यपादि ऋषि मला पवित्र करोत ॥१७॥
गंगादि सर्व नद्या, पुष्करादि सर्व तीर्थे, सिंधु आदि नद, सप्तसागरांसह सर्व जलाशय मला पवित्र करोत ॥१८॥
अदिति इत्यादि पतिव्रता, यक्ष, सिद्ध, पन्नग, ओषधी व पर्वत हे तीन लोकांतले सर्व मला पवित्र करोत ॥१९॥
व्रती यानें या मंत्रांनीं स्त्रान करुन हातांत पवित्रक धारण करुन देव, ऋषि, मानव आणि पितर यांचें यथाविधि तर्पण करावें ॥२०॥
कार्तिकमासीं जितके तीळ पितृतर्पणकाळीं असतात तितकीं वर्षेपर्यंत स्वर्गामध्यें पितर वास करितात ॥२१॥
नंतर उदकाशयामधून बाहेर येऊन शुद्ध वस्त्र परिधान करुन प्रातःकालीं करावयास सांगितलेलीं सर्व संध्यादि कृत्यें करुन श्रीहरीची पूजा करावी ॥२२॥
नंतर तीर्थादि देवतांचें स्मरण करुन पुनः भक्तियुक्त अंतः करणानें गंध पुष्प अक्षतांनीं युक्त असें अर्घ्य ॥२३॥
' व्रतिनः ' या मंत्रानें विष्णूला समर्पण करावें ॥२४॥
नंतर वेदामध्यें पारंगत अशा ब्राह्मणांची भक्तीनें गंध, पुष्प, तांबूल इत्यादिकांनीं पूजा करुन वारंवार नमस्कार करावा ॥२५॥
ब्राह्मणांच्या उजव्या पायाचे ठिकाणीं सर्व तीर्थे वास करितात, सर्व वेद मुखाच्या ठायीं वास करितात आणि सर्वांगांत देव वास करितात म्हणून ब्राह्मणांची पूजा केली असतां या सर्वांचें पूजन केल्याप्रमाणें होतें ॥२६॥
कल्याण इच्छिणार्‍या मनुष्यानें ब्राह्मणांचा अवमान करुं नये आणि त्यांशीं विरोध करुं नये; कारण ते अव्यक्तरुप भगवान् विष्णूचींच स्वरुपें होत ॥२७॥
नंतर भगवंताला प्रिय जी तुलसी तिची पूजा करावी. एकाग्र अंतः करणानें प्रदक्षिणा व नमस्कार करावेत ॥२८॥
हे तुलसी, तुला सर्व देवांनीं निर्माण केलें, सर्व मुनींनीं तूं पूजित आहेस. हे विष्णुप्रिये तुलसी ! तुला नमस्कार असो; तूं माझें पातक हरण कर ॥२९॥
नंतर पुराणांतील विष्णुकथा स्वस्थ अंतः करणानें श्रवण कराव्यात पुनः त्या ब्राह्मणांची भक्तीनें पूजा करावी ॥३०॥
याप्रमाणे सर्व व्रतविधि जो भक्तिमान् मनुष्य करतो तो नारायणाच्या लोकाला पावतो ॥३१॥
या लोकीं विष्णूला प्रिय अशा कार्तिक व्रताशिवाय रोग व पातकांचें नाशक, सदबुद्धि देणारें, मुक्तीला कारण असें कोणतेंही व्रत नाहीं ॥३२॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमा० षष्ठोऽध्यायः ॥६॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिक माहात्म्य - अध्याय ५