Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय दहावा

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय दहावा
, बुधवार, 19 जून 2024 (11:15 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
धर्म म्हणे हो श्रीहरी ॥ सांगा कथेची नवलपरी ॥ आमुचा वंश निर्धारी ॥ वाढला कैसा तो सांगावा ॥१॥
तेथें आला होता व्यासमुनी ॥ तेणें कैसी केली करणी ॥ तें सांगा आह्मांलागुनी ॥ परमपावन असे जे ॥२॥
जे कथा ऐकतां जाण ॥ ब्रह्महत्यादि पातके दारुण ॥ जळून जाती न लागतां क्षण ॥ श्रवणमात्रें करुनियां ॥३॥
कृष्ण म्हणे धर्मासी ॥ स्वस्त असावें मानसीं ॥ आला होता व्यासऋषी ॥ शांतनूच्या घरी पै ॥४॥
सर्वाही केला नमस्कार ॥ व्यासाचा स्तव करिती अपार ॥ योजनगंधा म्हणे वंश विस्तार ॥ होय आतां कैसा पै ॥५॥
पुत्रा तूं परम तापसी ॥ जरी हें संकट निवारिशी ॥ तरी तूं धन्य माझे कुसी ॥ जन्मोनियां सार्थक ॥६॥
गंगात्मज म्हणे स्वामी ॥ कोणता उपाय करावा आह्मी ॥ चित्रविचित्र मोक्ष भूमि ॥ पावले आतां गती काय ॥७॥
इतके व्यासें ऐकोनी ॥ काय बोलिला ते क्षणीं ॥ म्हणे माते मम वचनीं ॥ विश्वास घरी तूं आतां ॥८॥
माते कुरुदेशालागून ॥ जावें तुम्ही येथून ॥ तरी तुम्ही क्षेम कल्य़ान ॥ रहा आणि वंश वाढेल ॥९॥
मग तेथुन सर्व गेले॥ कुरुदेशी जाऊनी राहिले ॥ तेथें बहुत आनंद पावले ॥ मग वर्तले तेच ऐका ॥१०॥
योजनगंधेस म्हणे व्यास ॥ वचन ऐकें माते सावकाश ॥ वंशवृध्दि होईल नि:शेष ॥ वचनीं विश्वास घरी माझ्या ॥११॥
मग म्हणे व्यासमुनी ॥ अंबा अंबिका पाठवा दोन्ही ॥ नग्न माझ्या सन्मुख उभ्या करुनी ॥ कृपादृष्टी मी पाहेन ॥१२॥
तेणे दोघिसी दोन पुत्र ॥ होतील जाण निश्चित । शंका सांडुनी त्वरीत । कार्य अगत्य करावें ॥१३॥
ऋषी बैसला तेथें जाण ॥ अंबा गेली नग्न होऊन । परी अंगी चर्चिला चंदन ॥ संशय मनी धरोनियां ॥१४॥
अंबेस झाला मग पुत्र ॥ कुष्ठ अंगी भरले सर्वत्र ॥ पंडू नाम ठेविलें निर्धारें ॥ हर्ष झाला सर्वासी ॥१५॥
मग दुसरी अंबिका ॥ तेही गेली होऊनी देखा परी मनी धरिली शंका ॥ नेत्र बांधिले तियेनें ॥१६॥
तीस अवलोकितां मुनी ॥ गर्भ राहिला तत्क्षणीं ॥ पुत्र झाला तियेलागुनी ॥ नेत्र नसती जन्म अंध ॥१७॥
त्यांचे नाम धृतराष्ट्र ॥ स्वरुपवंत अतिसुंदर ॥ परी नेत्र नसती साचार ॥ ऐसा पुत्र आंबिकेचा ॥१८॥
शांतनु रायाची एक दासी । तेही नग्न होवोनी गेली ऋषीपाशी ॥ हर्षयुक्त होऊनी मानसी ॥ अलंकार अंगी ल्यालिसे ॥१९॥
तिस विलोकितां मुनेश्वर ॥ गर्भ राहिला सत्वर ॥ पुत्र झाला जैसा दिनकर ॥ परमभक्त हरीचा ॥२०॥
देव ब्राह्मणावरी मन ॥ सदां करी हरी किर्तन ॥ सर्वास दृष्टिसमान ॥ विदुरनाम ठेविलें ॥२१॥
आनंद झाला सर्वासी ॥ पुत्र तीन झाले वंशी ॥ योजनगंधा मानसी ॥ परम हर्षित जाहली ॥२२॥
भिष्म आनंदला थोर ॥ व्यासासी घातला नमस्कार । स्तव करिताती वारंवार ॥ जयजय स्वामीं म्हणोनियां ॥२३॥
आनंदले नगरीचे लोक ॥ म्हणती नवल झालें कौतुक ॥ उभे राहुनी व्यासास नमुनी ॥ साष्टांग नमस्कार घालती ॥२४॥
तिघे झाले सुत ॥ तिघांचे तीन प्रकार निश्चिती ॥ कोष्टी एक अंध बहुत ॥ तिसरा विदुर सुलक्षणी ॥२५॥
पंडु आणि धृतराष्ट्र दोन्हीं ॥ हेच बैसविले राजासनीं ॥ मग आश्रमा गेला व्यासमुनी ॥ आज्ञा घेवोनी मातेची ॥२६॥
राज्य करती यथा निती ॥ गौब्राह्मण प्रतिपाळिती ॥ ऋषीचा आदर करिती । हरीची भक्ती करी पूर्ण ॥२७॥
मज भोजरायाची कुमारी । ते पंडुस दिधली निर्धारी ॥ लग्न झालें त्याउपरी ॥ आनंद थोर जाहला ॥२८॥
कुंती पंडुची राणी ॥ पतिव्रता शिरोमणीए ॥ सदा सादर हरिभजनी ॥ पती सेवेसी सादर सदा ॥२९॥
मनी आनंद धरोनी थोर ॥ पतिसेवा निरंतर ॥ पतिवचन अनुमात्र ॥ न्यून न पडे सर्वथा ॥३०॥
गांधार रायाची कन्या सुंदर ॥ तीस नेमिला धृतराष्ट्र वर ॥ लग्न झालीया नंतर ॥ नगरा आले आपुलिया ॥३१॥
ऐसें राज्य करीत बहुत दिवस ॥ तो नवल वर्तले विशेष ॥ एकदां पंडु राजा वनास ॥ गेला मृग वधावया ॥३२॥
वनी मारिलीं श्वापदें अपार ॥ मृगवध केला फार ॥ तों प्राक्तन विचित्र ॥ काय झालें तें ऐका ॥३३॥
तो कर्दम ऋषी आणि त्याची पत्नी ॥ दोघे मृगवेषें क्रिडती वनी ॥ कामातुर दोघें होऊन ॥ संभोग शयनी रत झाले ॥३४॥
आनंदे क्रीडती ॥ तों पंडुनें बाण मारिला अवचिता ॥ तों उभयमृगासी लागतां ॥ अतिव्याकुळ पडियेले ॥३५॥
मग ऋषी बोले वचन ॥ आम्ही क्रिडत होतों आनंदें करुन ॥ तुवां आह्मासी मारिला बाण ॥ तरी श्राप घेई आमुचा ॥३६॥
तूं होसील कामातुर ॥ ते दिवशीं तुझा मृत्यु साचार ॥ हा ऐकें तूं होसील कामातूर ॥ हा ऐकें तूं निर्धारें ॥ सत्यवाचा आमुची ॥३७॥
ऐसा श्राप कर्दममुनी ॥ देता झाला पंडुलागुनी ॥ म्हणे स्त्रीसंग करितां तत्क्षणीं ॥ मृत्यु पावसी साचार ॥३८॥
ऐसा श्राप व दोन ॥ मुनी पावला कैलासभुवन ॥ स्त्रीसमागमें घेऊन ॥ कैलासी सुखी राहिला ॥३९॥
पंडुसी दु:ख झालें परम नावडे अन्न उदकपान ॥ सदां सर्वकाळ उद्वीग्न ॥ वाडे प्राण द्यावा आतां ॥४०॥
शयनी न लागे निद्रा ॥ चिंताग्नी जाळी अवधारा । कुंती माद्रि स्त्रिया सुंदर ॥ वाटती जैशा सर्पिणी ॥४१॥
भोगविलास सर्वरहित ॥ क्षणक्षणा करी आकांत ॥ राज्यास कोठें ही न लागे चित्त ॥ श्राप अद्भुत ऋषीचा ॥४२॥
मग तो पंडुराव जाणा ॥ जाता झाला घोरवना ॥ समागमें दोन्हीं अंगना ॥ कुंतीमाद्री असती ॥४३॥
अनुष्ठान करी पंडु नृपवर ॥ कुंति माद्रि उभ्या समोर । परी उदरी नाहीं कन्याकुमर ॥ तेणें अंतरी कष्टी बहुत ॥४४॥
मग गांधारीस झाले शतपुत्र ॥ हर्षयुक्त दिवस आणि रात्र ॥ दुर्योधनादि शतकुमर ॥ झाले जाण गांधारीसी ॥४५॥
पुत्र झाले गांधारीसी ॥ परम चिंता कुंतीसी ॥ म्हणे दया कैशी ॥ पुत्रावांचून जिणें व्यर्थ ॥४६॥
जयासीं पुत्र नाहीं निश्चिती ॥ त्यासी वरती नाहींच गती ॥ पुत्रावीण अधोगती ॥ प्राणि जाती सर्वथा ॥४७॥
पुत्राविण निर्फळ संसार ॥ पुत्रविण शून्य मंदीर ॥ पुत्रावीण नर्क थोर ॥ भोगणें पडे प्राणिया ॥४८॥
पुत्रवंशी नसतां जाण ॥ यम त्यासी गंजिती दारुण । न पहावें तयाचें वदन ॥ प्रात:काळी उठतांची ॥४९॥
झाले निपुत्रिकाचें दर्शन ॥ तात्काळ करावें सचीळस्नान ॥ निपुत्रीकाचे घरी जाण ॥ अन्न न घ्यावें सर्वथा ॥५०॥
ऐसें बोलुनी पंडुप्रती ॥ कुंती पुढती करी विनंती ॥ म्हणे स्वामी पुत्रसंतती ॥ वाटे कैसी आतां पैं ॥५१॥
तुह्मांस कर्दमुनीचा श्राप ॥ आणि कैसे उद्भवलें पूर्वपाप ॥ कांही करावें अनुष्ठाण जप ॥ पुत्रसंतान होय जेणें ॥५२॥
पंडु म्हणे कुंतीसी ॥ मी कोणता उपाय करूं यासी ॥ मज श्राप देवोनी ऋषी ॥ प्राक्तन माझें विचित्र ॥५३॥
मग कुंती म्हणे राजयासी ॥ पांच मंत्र आहेत मजप्रती ॥ अत्यादरें जपावे त्यासी ॥ तेणें पुत्र होतील ॥५४॥
जो मंत्र जपावा तेच दैवत ॥ येऊन उभे राहे त्वरित ॥ त्या दैवतापासून भोग निश्चित ॥ घ्यावा वंशवृध्दीस्तव ॥५५॥
आज्ञा कराल जरी मजसी ॥ तरी आराधीन दैवतासी ॥ तेणें आपुल्या वंशासी वृध्दी होईल सर्वथा ॥५६॥
पंडु म्हणी अवश्य करी ॥ माझी आज्ञा तुज निर्धारी ॥ अनुमान चित्ती सहसा न करी ॥ आज्ञा माझी त्रिवाचा ॥५७॥
मग कुंती आराधना करीत ॥ तीस झाले तीन सुत ॥ धर्म भीम अर्जुन सत्य ॥ प्रतापसूर्य बलाढय पै ॥५८॥
दोन मंत्र दिधले मद्रिसी ॥ तेणें आराधना केली विशेष ॥ दोन पुत्र झाले तियेस ॥ नकुल आणि सहदेव ॥५९॥
पांच पुत्र दोघीसी ॥ प्रतापवंत तेजोराशी ॥ स्वरुपवंत जैसे सूर्यशशी ॥ शस्त्रास्त्रविद्या गुणसिंधु ॥६०॥
हे पुत्र देखोनी ॥ आणि पंडुराज हर्षला मनी ॥ म्हणे धन्य मी त्रिभुवनी ॥ निजभागें सर्वथा ॥६१॥
ऐसें लोटता कितीक काळ ॥ तों नवल वर्तलें तात्काळ ॥ माद्रि सगुण वेल्हाळ ॥ जाती झाली पुष्पवटी ॥६२॥
पुष्पांचे हार कंठी घालोनी ॥ वेणी गुंफिली आनंदे करुनी ॥ शरीरीं चंदन चर्चुनी ॥ अलंकार भूषणी सर्वअंगीं ॥६३॥
ऐसें देखोन पंडु नृपवर ॥ धांऊनी अंलिंगन दिधले थोर ॥ तितक्यांत झाला कामातुर ॥ आनंदाव पापोहानी ॥६४॥
माद्री म्हणे राजेंद्रा ॥ कांही विचार करा बरवा ॥ येरु बळेचि ते अवसरा ॥ भोगिता झाला माद्रीतें ॥६५॥
तों कर्दम श्रापें करुन ॥ तात्काळ पावला मरण ॥ शोक करी तेव्हां दारुण ॥ कुंती माद्री ते काळीं ॥६६॥
वर्तमान कळले भिष्मांसी ॥ तेण शोक केला फार मानसी ॥ मग पंडुच्या प्रेतासी ॥ अग्नीमाजी घातले ॥६७॥
माद्री करी सहगमना ॥ भीष्में उत्तरकर्म सारुन ॥ कुंती आणि पंडुनंदन ॥ गंगात्मजें घेऊनी आला ॥६८॥
गंगात्मजे धृतराष्ट्र ॥ आनंद करिती निरंतर ॥ धर्मास म्हणी श्रीधर ॥ कथा येथोनी संपली ॥६९॥
कोकिळेची पूजा करुनी ॥ हे कथा करावी श्रवण ॥ कोटी जन्माचें पातक जाण ॥ भस्म होते श्रव्ण करितां ॥७०॥
कोकिळाव्रत उत्तम ॥ पुत्र लक्ष्मीधन देतसे परम कथा ऐकतां सप्रेम ॥ शंकर त्यासी रक्षितसे ॥७१॥
इति श्रीस्कंदपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे कोकिळा महात्म्ये ॥ दशमोऽध्याय: ॥ अध्याय ॥१०॥ ओवीं ॥७१॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ अध्याय १० वा समाप्त ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय नववा