Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुक्मिणी स्वयंवर प्रसंग नववा

रुक्मिणी स्वयंवर प्रसंग नववा
श्रीगणेशाय नम: ॥ येऊनि जरासंधाप्रती । वीर प्रतिज्ञा बोलती । धनुष्यें वाइली हातीं । रणीं ख्याती लावुनी ॥ १ ॥
आमुच्या बाणांची प्रौढी । केवीं साहतील बापुडीं । नेणती युद्धाची परवडी । रणनिरवडी माराची ॥ २ ॥
यादवांचे बळ तें किती । आम्हां सन्मुख केवीं राहाती । नोवरी सांडूनियां पळती । महारथी लोटले ॥ ३ ॥
आचांगळी अधिक शब्द । ऎकून उठिला वीर गद । कोपे खवळाला हलायुध । रणमद चालिला ॥ ४ ॥
रागें पेटला प्रबळ । घेतलें नंगर मुसळ । नेत्रींहूनी निघती ज्वाळ । परदळ खळबळलें ॥ ५ ॥
सैन्य आटीत हलायुध । देखोनि चालिला जरासंध । त्यावरी उठावला वीर गद । द्वंद्वयुद्ध मांडिलें ॥ ६ ॥
महावीर बळीभद्र । म्हणोनि चालिला दंतवक्र । त्यावरी उठावला सात्त्विक वीर । येर येरां पडखळले ॥ ७ ॥
दोघां झाली दृष्टादृष्टी । घडघडिल्या चक्रवाटी । वोढल्या धनुष्यांच्या मुष्टी । दोघे हठी महावीर ॥ ८ ॥
रागें पौंड्रकें चालिल । त्यावरी कृतवर्मा लोटला । रथ रथेंसीं झगटला । गुण सुटला धनुष्याचां ॥ ९ ॥
बाण ओढूनिया ओढी । कृतवर्मा सवेग सोडी । पौंड्रकाचा ध्वज तोडी । पताका पाडी महीतळीं ॥ १० ॥
ध्वज तोडिला देखोनी । वेगें विंधिला सहा बाणीं । हातींचें धनुष्य तोडूनी । पाडिला धरणी कृतवर्मा ॥ ११ ॥
कृतावर्मा वीर अंगें । रथावरी चढला वेगें । धनुष्य बाहूनियां रागें । बाण अनेगेम वर्षला ॥ १२ ॥
पौंड्रक बाणांते तोडित । बाणामागें बाण सोडित । अलक्ष लक्षूनि भेदित । वीर विख्यात कृतवर्मा ॥ १३ ॥
हातीं घेऊन तीन बाण । धगधगित अतिदारुण । पौंड्रका तुझा घेईन प्राण । वेगीं विंदान पाहें माझें ॥ १४ ॥
पौंड्रक निवारण करी । परी ते अनिवार भारी । एक सारथियात मारी । दोन उरीं आदळले ॥ १५ ॥
बाण भेदिले सपिच्छेंसीं । पौंड्रक पाडिला धरणीसी । मूर्च्छना दाटली त्या कैसी । देहभावासी विसरला ॥ १६ ॥
पौंड्रक पडिला मूर्च्छित । तंव धांविन्नला विदूरथ । त्यातें अक्रूर त्वरित । पाचारीत रणभूमी ॥ १७ ॥
अक्रूर वीर अति गाढा । रथ आडवा रथापुढां । घालोनि उठिला वेगाढा । बळें मेढा वोढिला ॥ १८ ॥
तुझें नांव तंव अक्रूर । दारुण योद्धा नव्हेसी क्रूर । तुज कोण गणील वीर । रणीं धीर न धरवे ॥ १९ ॥
जयासी नाहीं वीरवृत्ती । तयासी अक्रूर गा म्हणती । तुजसी युद्ध तें किती । बाण शितीं लाविला ॥ २० ॥
तुझिये ह्रदयींची क्रूरता । समूळ बाणीं मी छेदिता । पाहें माझी अक्रूरता । मदगर्विता झाडीन ॥ २१ ॥
सुटले दोघांचेही बाण । अति झणत्कारें वाजती गुण । बाणीं गगन झालें पूर्ण । सूर्यकिरण झांकुळले ॥ २२ ॥
मेघामाजी विजु तळपती । तैशा भाली झळकताती । बाण बाणां आदळती । तिडक्या उठती अंतराळीं ॥ २३ ॥
षड्‌विकार साही बाण । अक्रूरावरी घाली दारुण । येरीं निर्विकर लक्ष साधून । बाणीं बाण निवारिले ॥ २४ ॥
तिखट उर्मीचिया भाली । सवेंचि विदूरथ घाली । घायें करीन अबोध भुली । गर्जून बोलीं विंधित ॥ २५ ॥
काढिला निजबोधकुर्‍हाडा । गुणी लावूनि लोटिला पुढां । भालीसहित तोडिला मेढा । गाढा धनुर्वाडा अक्रूर ॥ २६ ॥
घेऊनि क्रोधाचा भाला । रथावरून तो उडाला । निश्चळ निजशांतीं विंधिला । भाला तोडिला माझारीं ॥ २७ ॥
गुप्त होती वासनासुरी । हाणो धांविन्नला उरावरी । स्वानुभवाची भाली खरी । धीरें निर्धारी विंधिली ॥ २८ ॥
भाळीं आदळली सत्राणें । विदूरथ झणाणिला तेणें । सुरी उडविली कोणे मानें । गेली गगना दिसेना ॥ २९ ॥
बाण अव्यय काढिला । गुणीं अवगुणाचें जोडिला । अक्रूरें कानाडीं ओढिला । उडविला ही विदूरथ ॥ ३० ॥
बाप अक्रूर वीरराणा । कोणे नेटे सोइले बाणा । रथासहित उडविला गगना । रणप्रदक्षिणा करविली ॥ ३१ ॥
बाण भेदिला जिव्हारीं । विदूरथ पडिला धरणीवरी । डोळां लागली अर्धचंद्री । जेवीं खेचरी योगिया ॥ ३२ ॥
श्वफल्क सात्यक चक्रदेव । कंकसारणादि यादव । यांवरी उठावले राजे सर्व । अंगवंगादि कलिंग ॥ ३३ ॥
बाण सणासणां सूटती । खड्‌गे खणखणा वाजती । रथ रथांसी आदळती । वीर गर्जत सिंहनादें ॥ ३४ ॥
रणीं उठिला लोहधुळोरा । तेणें चालों न शके वारा । रणमद चढलासे वीरां । येर येरां हांकिती ॥ ३५ ॥
बाण बाणांसी आदळती । घायीं तिडकिया उठती । तेणें पिसारे पेट घेती । बाण जळती अंतराळीं ॥ ३६ ॥
करूषें घेऊनि बाण नव । वेगीं विंधिल चक्रदेव । बाणासरसी घेऊनि धांव । रथावरूनि आसुडिला ॥ ३७ ॥
चक्रदेवें लवडसवडी । कारूषावरी घातली उडी । येरू सांपडला रथाबुडीं । बुद्धि गाढी तेणें केली ॥ ३८ ॥
अंग चुकवूनि वेगेंसीं । चक्रदेव धरिला केशीं । थडक हाणोन उराशीं । कारूषासीं पाडिले ॥ ३९ ॥
गजारूढ पैं विख्यात । अंगरायें पेलिला हस्त । चक्रदेवाचा मोडिला रथ । वीरां खस्त करीतसे ॥ ४० ॥
अंग योद्धा महाबळी । रथ रगडी गजातळीं । यादवसेना मंडळी । रणरांगोळी करूं आला ॥ ४१ ॥
यादवामाजी कंक बळी । रागें करीत उठिला होळी । अंगासी हाणोनि कपाळीं । गजासहित मारिला ॥ ४२ ॥
कलिंगसैन्यावरी देख । रागें उठिला सात्यक । वीर मारिले अनेक । रणीं सैनिक पाडिले ॥ ४३ ॥
कोप आला कलिंगासी । सात्यकी विंधिला बाणें विसीं । एकचि बाणें तोडूनि त्यांसी । कलिंगासी पाचारिलें ॥ ४४ ॥
गुणीं लावूनि कुर्‍हाडा । मुकुट पाडूनि तोडिला मेढा । धनुष्य घेऊनि उठिला वेगाढा । कलिंग गाढा कोपला ॥ ४५ ॥
रथ विंधिला मकरतोंडीं । सवेंचि दोन्ही चाकें फोडी । पाडली सट्यकिची मुरकुंडी । बाणीं वितंडीं विंधिला ॥ ४६ ॥
सात्यकी वीर जगजेठी । पडत पडतां सवेंचि उठी । गदा घेऊनियां मुष्टी । कलिंग दृष्टी सूदला ॥ ४७ ॥
सव्य अपसव्य घोवंडी गदा । न धरत पातला तो योद्धा । कलिंगें तोडिली ते गदा । सात्यकी क्रोधा चढिन्नला ॥ ४८ ॥
घेऊनि रथाचा पैं आंख । वेगें धांविन्नला सन्मुख । कोपें होणों आला सात्यक । येरें मस्तक चुकविला ॥ ४९ ॥
रथाखाली घातली उडी । आंग चुकविलें रथाबुडीं । कलिंगाचा रथ मोडी । चारी घोडीं मारिलीं ॥ ५० ॥
वंगराजा रणप्रवीण । कोपें चालिला घेऊनि बाण । त्यावरी उठावला सारण । युद्ध दारुण तेथे जालें ॥ ५१ ॥
भोंवता बाणांचा वळसा । सैन्य पाडिलें धारसा । बाण भेदिले सपिच्छा । वंग त्रासा पावला ॥ ५२ ॥
सारणें थोर केला मारु । सारथीं जाणि मारिले वारु । बाणीं भेदिले रहंवरु । आणि दळभारू झोडिला ॥ ५३ ॥
विरथ केला वंगराजा । सवेंचि चढे पट्टगजा । धनुष्य वाहोनियां वोजा । बाण पैंजा घेतले ॥ ५४ ॥
शर सोडिले सारणावरी । सारण बाणांतें निवारी । गजें रथ केला चुरी । दांत उरीं लाविले ॥ ५५ ॥
रथाखालीं घातली उडी । गज धरिला शुंडादंडीं । सारण सोंडतें मुरडी । गजाबुडीं रिघाला ॥ ५६ ॥
गज मारावया एकसरें । सारण गजातळीं फिरे । वंग वर्षताहे शस्त्रें । सारणा बाहेर निघों नेदी ॥ ५७ ॥
सारण कोंडिला महावीर । यादवदळीं हाहाकार । ऎकोनि पावला बळिभद्र । वृक्ष थोर उपडिला ॥ ५८ ॥
राहें साहें म्हणे वंगातें । तेणें विंधिला बाणें शतें । मुसळ घेऊनि डावे हातें । त्या बाणातें निवारिलें ॥ ५९ ॥
दक्षिणहातीं होता वृक्ष । एकेचि घायें कपाळमोक्ष । गज निमाला नि:शेष । अधोमुख पडियेला ॥ ६० ॥
आडवा धांविन्नला केशिक । राजा उठावला मुख्य ।झाला बळिभद्र । सन्मुख । दोघे देख खवळले ॥ ६१ ॥
केशिकावरी हलायुध । मारा पेटला सुबुद्ध । येरिकडे राजे सन्नद्ध । यादवांवरी उठावले ॥ ६२ ॥
केशिक राजा अतुर्बळी । राम मारील निजहळीं । गवेषण राजा रणकल्लोळीं । घेईल समफळी यादवांसी ॥ ६३ ॥
तेव्हां राम माजवील रणनदी । तेथें चहूं पुरुषार्था मोक्षसिद्धी । कृष्णदृष्टीचिया प्रबोधीं । सायुज्यपदीं निजयोद्धे ॥ ६४ ॥
श्रीकृष्णाचिया दृष्टींपुढें । रणा येतां सायुज्या चढे । निधडिया वीरां भाग्य चोखडें । सायुज्य रोकडें साधिती ॥ ६५ ॥
तेथें द्वंद्वयुद्ध अतितुंबळ । रणीं माजेल रणकल्लोळ । एका जनार्दनीं रसाळ । कथा कलिमलनाशिनी ॥६६॥
 
इति श्रीमद्भागवते महापुराणे । दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे नवम: प्रसंग ॥९॥
 
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रुक्मिणी स्वयंवर प्रसंग आठवा