Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संत निवृत्तीनाथांचे अभंग 181 ते 190

nivruttinath maharaj
, बुधवार, 15 जून 2022 (16:19 IST)
माता पिता नाहीं बंधु बोध कांही । सर्वसम डोही वर्तताती ॥ १ ॥
सर्व आम्हा राम भजनीं निष्काम । दिन कळा नेम भजनशीळ ॥ २ ॥
दया वसे देहीं क्षमा ते माधवीं । कासवीं शोभवी जनीं इये ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे ऐसा गयनि सद्‌गुरु । उपदेश पूरु अमृताचा ॥ ४ ॥
 
पूर्णबोधें धाले आत्मराम धाले । निखळ वोतले पूर्णतत्त्वें ॥ १ ॥
पूर्वपूण्य चोख आम्हांसि सफळ । गयनि कल्लोळ तुषार आम्हां ॥ २ ॥
चंद्र सूर्य कीर्ण आकाश प्रावर्ण । पृथ्वी अंथुरण सर्वकाळ ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु धडफुडा । ब्रह्मांडा एवढा अनंत माझा ॥ ४ ॥
 
आम्हां जप नाम गुरुखूण सम । जन वन धाम गुरुचेचि ॥ १ ॥
नेघों कल्पना न चढों वासना । एका पूर्णघना शरण जाऊं ॥ २ ॥
तप हें अमूप नलगे संकल्प । साधितां संकल्प जवळी असे ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे मज निरोपिलें धन । हेचि ब्रह्मखुण जाणिजेसु ॥ ४ ॥
 
आम्हां हेंचि थोर सद्‌गुरुविचार । नलगें संप्रधार नानामतें ॥ १ ॥
नेघों ते काबाड न करूं विषम । ब्रह्मांड हें होम आम्हां राम ॥ २ ॥
नेदूं यासि दुःख उन्मनीचें सुख । न करूं हा शोक आला गेला ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे आम्हां सद्‍गुरु उपदेश । सर्व भूतीं वास हरि असे ॥ ४ ॥
 
चराचरीं हरि गुरुमुखें खरा । माजि ब्रह्म सैरा विचरों आम्हीं ॥ १ ॥
आम्हां ऐसें व्हावें तरीच हें भोगावें । निरंतर ध्यावें पोटाळूनि ॥ २ ॥
नाहीं येथें काळ अवघे शून्यमये । निर्गुणी सामाये तुन माझी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणें परत्रिंकूटगोल्हाट । त्यावरील नीट वाट माझी ॥ ४ ॥
 
नव्हें तें पोसणें नव्हे तें साधन । उपदेशखुण वेगळीं रया ॥ १ ॥
न भेदें पालथें वज्रें मढियेलें । जीवन घातलें न भरें घटीं ॥ २ ॥
नाइके उपदेश नव्हे खुण सिद्ध । योनिसी प्रसिद्ध मढियेले ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे जरीं कृपा करि श्रीगुरु । तरिच हा संप्रधारु घरीं आम्हां ॥ ४ ॥
 
साकार निराकार ब्रह्मीचे विकार । तेथील अंकुर गुरुराज ॥ १ ॥
रज तम नाहीं सात्विक तेही । परिपूर्ण देहीं आत्माराम ॥ २ ॥
सर्वघटवासि सर्वत्रनिवासी । आपण समरसीं बिंबलासें ॥ ३ ॥
निवृत्तिची खुण गुरूचा उद्गार । सर्व हा निर्धार आत्माराम ॥ ४ ॥
 
प्राकृत संस्कृत एकचि मथीत । गुरुगम्य हेत पुराणमहिमा ॥ १ ॥
वेदादिक मत शास्त्र हें बोलत । श्रुतीचा संपत वाद जेथें ॥ २ ॥
पृथ्वी हे ढिसाळ आकाश कव्हळ । जन्म मायाजाळ विरत जेथें ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु गयनि सौरसें । आपण जगदीश सर्वारूपीं ॥ ४ ॥
 
सार निःसार निवडूनि टाकीन । सर्व हा होईन आत्माराम ॥ १ ॥
राम सर्वा घटीं बिंबलासे आम्हां । पूर्ण ते पूर्णिमा सोळाकळी ॥ २ ॥
न देखों दूजें हरिविण आज । आणिकाचें काज नाहीं तेथें ॥ ३ ॥
निवृत्ति गौरव गुरुमुखें घेत । आपणचि होत समरसें ॥ ४ ॥
 
पृथ्वी श्रीराम आकाश हें धाम । आपण विश्राम स्थूलरूपें ॥ १ ॥
सूक्ष्मस्थूल राम साधक परम । नाम सर्वोत्तम सर्वारूपीं ॥ २ ॥
आकार विकार सम सारिखाचि हरि । बाह्यअभ्यंतरीं आपणचि ॥ ३ ॥
निवृत्ति निष्टंक ज्ञान तें सम्यक् । गयनि विवेक सिद्ध पंथ ॥ ४ ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संत निवृत्तीनाथांचे अभंग 171 ते 180