Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाकंभरी पौर्णिामा ....

Shakambari Purnima
, गुरूवार, 9 जानेवारी 2020 (13:54 IST)
संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणार्‍या दुर्गेचे एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय. या शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव नुकताच सुरू झाला आहे. त्या निमित्त.. 
ततोडह्मखिलम लोकमात्त्मदेह समुभ्दवें।
भविष्यामी सुरा शाकैरवृष्टेः प्राणाधारके
शाकंभरीती विक्यातम तदा यस्याम्ह्यम भूवी।
तत्रैव च वधिकव्यामि दुर्गामास्यम महासुरम॥
 
दीर्घकालीन दुष्काळाला दुर्गा देवीचा दुष्काळ असे म्हणतात. दुर्गासुर नावाच्या दैत्यांचा संहार करून देवीला दुर्गा हे नाव पडले. तसेच शंभर वर्षे पाऊस नव्हता म्हणून देवीने पाऊस पाडून सर्व पृथ्वी हिरवीगार केली. त्यामुळे तिला शाकंभरी असे नाव पडले. ऋग्वेदाच्या सौभाग्लक्ष्मी उपनिषदामध्ये श्रीसूक्त दिले. त्यात लक्ष्मीला पद्मा, पद्मिनी, पद्मस्थिता, पद्मवर्णा, पद्मसंभवा या शब्दांनी वर्णिले आहे. महेश त्या सृष्टीचा प्रलयकाळी संहार करतात. ही शक्ती सोळा कलांनी संहार करते म्हणून तिला षोडशीदेखील म्हणतात. संपूर्ण जगाची ही अधिष्ठात्री आहे. हिला चिदग्रिकुण्डसंभुता असं म्हटलं आहे. ही स्थूल सूक्ष्म आणि कारणरुप शरीरात वास करते. शिवाचे शिवत्व इकाररुप शक्तीमुळे असते. यामुळेच शक्तीला देवता म्हटले आहे.
 
शाकंभरी नवरात्र पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असते. आश्विन महिन्यातील नवरात्राइतकंच शाकंभरी नवरात्राचंही खूप महत्त्व असतं. देवी शाकंभरीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं. देवीस्तुतीच्या अकराव्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रुपांचं वर्णन केलं गेलं, त्यातीलच एक महत्त्वाचं हे रूप आहे. शाकंभरी देवीला चार भुजांची आणि काही ठिकाणी अष्टभुजा रुपात दर्शवलं गेलं. शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते. आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की, शाकंभरी देवी म्हणजे अन्न-देवता. संपूर्ण ब्रह्मांड देवीचं मूल आहे. जाणून घ्या देवीच्या या अनोख्या रुपाची कथा आणि शाकंभरी नवरात्रातील पूजा विधीबद्दल...
 
एकदा पृथ्वीवर 100 वर्षे पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडला होता. पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाणा उपलब्ध नव्हता. या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीचं स्तवन केलं. त्यांच्यावरील संकट बघून देवीनं अयोनिजाचं रूप घेतलं. या अवतारात देवीला 100 डोळे होते. आपल्या 100 डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्यांचे दुःख बघितले. यानंतर आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रकटली. देवीचं हे विराट रूप होतं. या रुपामध्ये देवीच संपूर्ण शरीरावर विविध प्रकारची झाडं आणि भाज्या  होत. जोपर्यंत पाऊस पडला नाही, तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंभरी देवीनं आपल शरीरावरील भाज्या, झाडांमुळे सर्वांचे प्राण वाचविले.
 
आणखी अशीच कथा. दुर्गमासुराने या दुष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरविले. दुर्गासुर मिहायलावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, 'असुरा, मी प्रसन्न आहे. वर माग. 'हात जोडून असुर म्हणाला, 'देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे.' ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, 'तथास्तु.' ब्रह्मदेवांचा एकच शब्द 'तथास्तु'; पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली.
 
सृष्टीमधील चैतन्य संपले. सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषिमुनी तेजोहीन झाले. प्रभाहीनझाले. शक्तीहीन झाले. वरदानामुळे शक्तीसंपन्न बनलेला दुर्गमासुर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरु झाली. दुर्गासुर उन्मत, बेफाम बनला. मानवांच्या हत्याकांडाचे भानक पर्व सुरु झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सर्व देव ऋषीं जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कसे रुप होते तिचे? आगळेवेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच-उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडेझुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रुप विविधरंगी; पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला 'शताक्षी' असे म्हणू लागले. देवीच्या शंभर नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवे जीवन मिळाले.
 
देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण 'शाकंभरी' देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रेअस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गासुराला युध्दासाठी आव्हान दिले.
 
दुर्गासुर आपल्या सैन्यासह लढू लागला. देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देवांकडे, ऋषिमुनींकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, 'हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. ज्ञानाची उपासना करा. मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण होवो.' एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खर्‍या अर्थाने माउली देवी होती. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते.
 
विठ्ठल जोशी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाणीचे हे प्रकार आपल्याला माहीत आहे का?