Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री भक्तविजय अध्याय २०

श्री भक्तविजय अध्याय २०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥    
निजभक्त कथा ऐकतां सुरस ॥ सर्व सुखें अनायासें ओळंगती त्यास ॥ श्रोतयांसी तुष्टोनि जगन्निवास ॥ सायुज्यपदासी पाववी ॥१॥
शांति क्षमा येऊन पाहीं ॥ अखंड वसती त्याचें हृदयीं ॥ आणिक शुद्ध सत्वगुण तोही ॥ येत लवलाहीं निजप्रीतीं ॥२॥
काम क्रोध पळती देहांतून ॥ सकल दुरितांचें होय दहन ॥ न धरून लज्जाभिमान ॥ वर्णितां गुण हरिकीर्तनीं ॥३॥
ऋद्धि सिद्धि इंद्रपदासी ॥ प्रारब्धें येतां न गणीच त्यांसी ॥ हें सात्विक वैराग्य मानसीं ॥ येईल तयासी अनायासें ॥४॥
ऐसा अंतरीं देखोनि नेम ॥ मग प्रसन्न होईल पुरुषोत्तम ॥ आपलें भजनीं देऊनि प्रेम ॥ हरील भवभ्रम तत्काळ ॥५॥
ऐसी भक्तकथेची गोडी थोरी ॥ पार्वतीस सांगे त्रिपुरारी ॥ म्हणोनि अवधान भक्तचतुरीं ॥ द्यावें निर्धारीं निजनिष्ठें ॥६॥
जोगा परमानंद भक्त ॥ बारसी ग्रामांत होता राहत ॥ अखंड उदास आणि विरक्त ॥ वैराग्यभरित सर्वदा ॥७॥
राम कृष्ण नारायण ॥ हेंच सर्वदा करीत भजन ॥ गांवांत करूनि भिक्षाटन ॥ कुटुंबरक्षण करीतसे ॥८॥
अखंड वृत्तीस समाधान नेणेंच कांहीं मानापमान ॥ तोडोनि आशापाशबंधन ॥ करी भजन श्रीहरीचें ॥९॥
स्नान करूनि सत्वर ॥ पूजा करीत षोडशोपचार ॥ सात शतें नमस्कार ॥ देवासी नित्य घालीतसे ॥१०॥
गीतेचा श्लोक एक म्हणून ॥ मग करीतसे साष्टांग नमन ॥ ऐशा रीतीं नित्यनेम सारून ॥ मग भोजन तो करीतसे ॥११॥
कांहीं तरी नित्यनेम ॥ केलियावांचून भक्षील अन्न ॥ तरी तो मनुष्य सूकरासमान ॥ बोलिलें वचन धर्मशास्त्रीं ॥१२॥
पशु पक्षी हिंडतां जाण ॥ त्यांसी कदा न घडे पापपुण्य ॥ कीटक मुंगी श्वापदांकारण ॥ शास्त्राचरण नसे कीं ॥१३॥
अवचित नरदेह लाधला पाहीं ॥ त्याचें सार्थक करावें कांहीं ॥ सत्समागमाविण नरदेहीं ॥ ज्ञान नव्हेचि सर्वथा ॥१४॥
म्हणाल संसारधंदा करितां देख ॥ नेमासी कैंची आराणूक ॥ येचविषयीं सोडवणूक ॥ असे एक ते ऐका ॥१५॥
तीर्थें व्रतें तपें दानें ॥ अनुष्ठानें देहदंडणें ॥ या सर्वांवरिष्ठ ॥ एक साधन करणें ॥ श्रीहरिभजन करावें ॥१६॥
नामस्मरणाविण विशेष कांहीं ॥ कलियुगीं साधन बोलिलें नाहीं ॥ जैसें मृत्युकाळाचे समयीं ॥ अमृत जीववी सकळांसी ॥१७॥
तरी संसारधंदा करितां जाण ॥ जो अखंड करील हरिचिंतन ॥ त्याजपासीं जगज्जीवन ॥ बैसे येऊन निजप्रीतीं ॥१८॥
असो बहुत बोलूनि काय व्युत्पत्ती ॥ नाममहिमा सर्वज्ञ जाणती ॥ अनुभवावांचूनि सांगतां युक्ती ॥ न लगे चित्तीं सर्वथा ॥१९॥
ऐसा हरिभजनाचा छंद ॥ घेतसे जोगा परमानंद ॥ हृदयीं चिंतूनि गोविंद ॥ स्वानंदभरित सर्वदा ॥२०॥
तंव कोणे एके अवसरीं ॥ व्यवसायी उतरले महाद्वारीं ॥ मेघ वर्षला धरणीवरी ॥ कर्दम बहुत जाहलासे ॥२१॥
त्या चिखलांत परमानंद जोगा ॥ नमस्कार घाली पांडुरंगा ॥ हृदयीं चिंतोनि रुक्मिणीरंगा ॥ भक्तभवभंगा निजप्रीतीं ॥२२॥
ऐसी निष्ठा देखोनि तेथ ॥ व्यवसायांचें द्रवलें चित्त ॥ म्हणती धन्य हा वैष्णवभक्त ॥ वैराग्यविरक्त दिसतो कीं ॥२३॥
मग दुकानांतूनि पीतांबर ॥ एक काढिला सत्वर ॥ जोग्यासी देऊनि सत्वर ॥ केला नमस्कार निजप्रीतीं ॥२४॥
म्हणे स्वामी कृपानिधी ॥ एवढें वस्त्र नेसावें आधीं ॥ मी शरणागत मंदबुद्धी ॥ ऐसी ग्लानि करीतसें ॥२५॥
जोगा बोले प्रतिउत्तर ॥ आम्हांसी कासया पीतांबर ॥ जीर्ण वस्त्र असेल जर ॥ तरी द्यावें सत्वर मजलागीं ॥२६॥
जीर्ण वस्त्र परिधान करून ॥ भिक्षा मागूनि आणावें अन्न ॥ तेणेंकरूनि निर्विघ्न ॥ योग चाले आमुचा ॥२७॥
मजलागीं आणिला पीतांबर ॥ तो देवासी नेसवावा साचार ॥ तेणें तुम्हांसी रुक्मिणीवर ॥ कृपा अपार करील कीं ॥२८॥
ऐसें शिकविलें त्याकारण ॥ परी तो नायकेचि अज्ञान ॥ कोणासी योग्य काय दान ॥ तें त्याजलागीं कळेना ॥२९॥
पक्षियां टाकावे उदक कण ॥ पशूंसी घालावें धर्मार्थ तृण ॥ सत्पात्र पाहूनि द्रव्यदान ॥ करिती सज्ञान अखंड ॥३०॥
वृक्षाचे मूळीं जीवन घालितां ॥ संतोष होय त्याचिया चित्ता ॥ आणि अन्न वस्त्र अथाचिता ॥ नेऊनि द्यावें एकांतीं ॥३१॥
ऐसें न कळेचि व्यवसायासी ॥ बळेंचि पीतांबर नेसविला त्यासी ॥ आपण दुसर्‍य़ा बाजारासी ॥ गेला सत्वर तेधवां ॥३२॥
दिव्य वस्त्र करूनि परिधान ॥ ओंचे खोंविले जोगियानें ॥ कर्दमें वस्त्र भरेल म्हणून ॥ घाली जपून दंडवत ॥३३॥
मागें निर्भय टाकूनि अंग ॥ नमस्कार घाली साष्टांग ॥ ते अवधी निष्ठा सांडिली मग ॥ अंतरला योग वस्त्रलोभें ॥३४॥
दोन प्रहर तापला दिन ॥ क्षुधेनें जाहला व्याकुळ प्राण ॥ म्हणूनि नमस्कार संपूर्ण ॥ जहाले नाहींत ते दिवसीं ॥३५॥
स्वेदपाझर देखोनि दृष्टीं ॥ बहुत जाहलासे हिंपुटी ॥ म्हणे आजि नमस्कार घालितां कष्टी ॥ किमर्थ होतों कळेना ॥३६॥
मग विवेकें शोधोनि अंतर ॥ म्हणे वैरी दिसतो कीं पीतांबर ॥ यासी पाहतां साचार ॥ पडलें अंतर सेवेसी ॥३७॥
कीं पौर्णिमेचा निशापती ॥ राहूनें गिळिला जैशा रीतीं ॥ तेवीं पीतांबरें मजप्रती ॥ पडली भ्रांती दिसताहे ॥३८॥
कीं पात्रीं वाढिलें पक्वान्न ॥ त्यासी अवचितां स्पर्शलें श्वान ॥ तेवीं हरिभक्तीसी महाविघ्न ॥ पीतांबरपरिधानें केलें कीं ॥३९॥
नातरी गंगातीरीं अश्वत्थ लाविला ॥ त्यावरी आला वायूचा घाला ॥ तैशापरी पीतांबर मजला ॥ वैरी जोडला दिसे कीं ॥४०॥
कीं कृषीवलानें क्षेत्र पिकविलें ॥ त्यावरी अकस्मात टोळ पडले ॥ तेवीं पीतांबरें विघ्न केलें ॥ सुकृतासी पैं माख्या ॥४१॥
कीं संन्यासी करितां अनुष्ठान ॥ त्यासी अवचितां आलें राजान्न ॥ तेवीं माझे भक्तीलागून ॥ पीतांबरें शत्रु जाहला कीं ॥४२॥
कैसा घडला हा अन्याय ॥ आतां देहदंडण करावें काय ॥ अरण्यांत जाऊनि लवलाह्य ॥ पंचाग्निसाधन करावें ॥४३॥
अथवा सेवूं गोरांजन ॥ कीं पर्वतीं बैसावें जाऊन ॥ किंवा अष्टांगयोगसाधन ॥ आतां जाऊन करावें ॥४४॥
नातरी जाऊनि त्रिवेणीप्रती ॥ देह घालावा कर्वतीं ॥ तेणें तरी रुक्मिणीपती ॥ भेटेल मजप्रती येऊनियां ॥४५॥
कीं करतलभिक्षा मागून ॥ करावें सकळ तीर्थाटन ॥ तेणें तरी जगज्जीवन ॥ कृपा करील मजवरी ॥४६॥
कीं हिमाचळासी जाऊन त्वरित ॥ तेथेंच वेंचावें आपुलें जीवित ॥ तेणें तरी पंढरीनाथ ॥ भेटेल निश्चित मजलागीं ॥४७॥
कीं अन्नोदक टाकूनी ॥ उपोषण करीत बैसावें आसनीं ॥ तेणें पुण्यें तरी चक्रपाणी ॥ भेटेल येऊनि तत्काळ ॥४८॥
किंवा अग्निकाष्ठें भक्षोनि त्वरित ॥ घ्यावें देहांतप्रायश्चित्त ॥ तेणें योगें तरी पंढरीनाथ ॥ कृपावंत होईल कीं ॥४९॥
ऐसा अनुताप धरूनि चित्तीं ॥ विचार करीतसे मागुती ॥ देउळाबाहेर सत्वरगती ॥ येऊनियां बैसला ॥५०॥
तों अपट वृषभ दोघे जण ॥ कृषीवेल जातसे घेऊन ॥ त्यांचे गळां लोडणें बांधून ॥ जातसे घेऊन वनांत ॥५१॥
जोग्यानें देखोनि ते वेळीं ॥ तयासी पाचारिलें जवळी ॥ अनुतापेंकरूनि नेत्रकमळीं ॥ अश्रुपात वाहाती ॥५२॥
मग कुणबियासी काय बोलत बोल ॥ म्हणे आम्हांसी देईं दोनी बैल ॥ दिव्य पीतांबर यांचें मोल ॥ देतों तत्काळ तुजलागीं ॥५३॥
कृषीवलानें अंतरीं विचारिलें ॥ तों द्विगुण मोल येतां देखिलें ॥ अवश्य म्हणोनि ते वेळे ॥ बैल दिधले तयासी ॥५४॥
जोग्यानें निश्चय करून ॥ तयासी बोले नम्र वचन ॥ म्हणे चरांटं घेऊन माझें चरण ॥ शिवळट्यासी बांधावे ॥५५॥
आणि सक्रोध होऊनि चित्तीं ॥ आसुड मारीं वृषभांप्रती ॥ मग तूं जायीं सदनाप्रती ॥ न धरी चित्तीं भय कांहीं ॥५६॥
अवश्य म्हणोनि अविवेकी ॥ शिवळट्यास चरण बांधिले शेखीं ॥ आसुड मारितां एकाएकीं ॥ बैल पळती अरण्यांत ॥५७॥
कंकर सरांटे पाषाण ॥ शरीरा लागती अति कठिण ॥ तेणें सकळ त्वचा झडोन ॥ गेली असे तयाची ॥५८॥
बैल बुझोनि जाती त्वरेन ॥ जेवीं हरिण पळे पारधिया देखोन ॥ तैशाचपरी महाअरण्य ॥ हिंडते जाहले तेधवां ॥५९॥
जोगा अनुताप धरूनि मनीं ॥ देहदुःखासी कांहीं न गणी ॥ म्हणे ऐसेंचि दंडण मजलागूनी ॥ आज अन्याय योग्य असे ॥६०॥
ऐसें समाधान मानीं मानून ॥ मुखीं करित नामस्मरण ॥ श्रीराम कृष्ण नारायण ॥ पतितपावन करुणाब्धे ॥६१॥
जय रुक्मिणीमानसरंजना ॥ पयोब्धिवासा शेषशयना ॥ भक्तकैवारि या गुणनिधाना ॥ जगज्जीवना पांडुरंगा ॥६२॥
ऐशा रीतीं स्मरण करित ॥ कंठ जाहला सद्गदित ॥ वृषभ पळती अरण्यांत ॥ त्यांमागें ओढत जातसे ॥६३॥
त्वचा केली सर्व झडोन ॥ अस्थि शरीरीं राहिल्या जाण ॥ निमेषमात्रें जाईल प्राण ॥ एवढें निर्वाण मांडिलें ॥६४॥
ऐशा समयीं आनंदयुक्त ॥ जोगा सप्रेम भजन करीत ॥ करुणा ऐकोनि पंढरीनाथ ॥ आले त्वरित धांवूनि ॥६५॥
गजेंद्राची करुणा ऐकोनी ॥ सत्वर पावले चक्रपाणी ॥ कीं द्रौपदी गांजितां दुःशासनीं ॥ आले धांवूनि ज्या रीतीं ॥६६॥
तेवीं जोग्याचें निर्वाण देखोनी ॥ सत्वर धांवले चक्रपाणी ॥ वृषभांच्या शिवळा काढोनी ॥ दिधले सोडूनि तत्काळ ॥६७॥
मग आपुले हस्तें सोडूनि चरण ॥ तयासी दिधलें आलिंगन ॥ कृपादृष्टीं पाहतांचि जाण ॥ दिव्यशरीर जाहलें पैं ॥६८॥
दिनकराचा उदय होतां ॥ अंधकार न दिसेचि सर्वथा ॥ तेवीं जगन्नाथ कृपा करितां ॥ देहदुःखचिंता निरसली ॥६९॥
जोग्यासी म्हणे रुक्मिणीरमण ॥ एवढें कां मांडिलें निर्वाण ॥ कांहींचि नसतां अन्याय जाण ॥ केलें दंडण देहासी ॥७०॥
तुम्ही करितां अन्नपान ॥ तें माझें मुखीं पडतें जाण ॥ सहज करीतसां गमनागमन ॥ तेचि प्रदक्षिणा आमुची ॥७१॥
नातरी कोणासी बोलाल वचन ॥ तेंचि माझें होतसे स्तवन ॥ कीं सुखसंतोषें करितां शयन ॥ तें साष्टांग नमन मज पावे ॥७२॥
ऐसें असतां निजभक्तराया ॥ एवढें निर्वाण केलें कासया ॥ येरें मस्तक ठेवूनि पायां ॥ म्हणे करावी छाया कृपेची ॥७३॥
एके दिवसीं पंढरींत ॥ देवें मिळवूनि निजभक्त ॥ जोग्याचा सकळ वृत्तांत ॥ तयांजवळी सांगीतला ॥७४॥
साकल्य सांगतां वैकुंठनाथें ॥ आश्चर्य वाटलें सकळांतें ॥ ज्ञानदेव म्हणे हृषीकेशातें ॥ तुझे लीलेसी अंत नाहीं ॥७५॥
एकाहूनि एक आगळे ॥ आपुल्यासी निर्माण केले ॥ त्यांच्या प्रेमसुखाचे सोहळे ॥ जाणसी घननीळा तूंचि एक ॥७६॥
आतां परिसा श्रोते चतुर ॥ निजभक्त नरहरी सोनार ॥ तेणें आराधूनि श्रीशंकर ॥ प्रसन्न केला निजनिष्ठें ॥७७॥
प्रातःकाळीं उठोनि जाण ॥ भीमरथीचें करूनि स्नान ॥ त्यावरी मल्लिकार्जुनाचें पूजन ॥ निजप्रीतीनें करीतसे ॥७८॥
पंढरीक्षेत्रीं असोनि वास ॥ न जाय विठ्ठलाचें देउळास ॥ एकेचि ठायीं धरूनि विश्वास ॥ भजन उल्हासें करीतसे ॥७९॥
जेवीं मेघ न दिसतां नयनीं ॥ चातक न घेती भूमीचें पाणी ॥ तैसाचि नरहरे शिवावांचूनी ॥ दैवत कोणी न पूजी ॥८०॥
कीं उदंड नक्षत्रें पाहतां दृष्टीं ॥ कमळिणी कदा न विकसती ॥ जेव्हा दृष्टीस पडेल गभस्ती ॥ संतुष्ट होती तेव्हांचि त्या ॥८१॥
नातरी तान्हेयास मातेवांचूनी ॥ आणिक नावडती सुंदर कामिनी ॥ कीं पतिव्रतेसी दैवत कोणी ॥ पतिवांचूनि पूज्य नाहींच ॥८२॥
तैसा कायावाचामनेंकरून ॥ नरहरी पूजीत मल्लिकार्जुन ॥ श्रीपांडुरंगाचें शिखर दुरून ॥ दृष्टीं कदा पाहेना ॥८३॥
गणेशचतुर्थीचा निशाकर ॥ दृष्टीं न पाहाती नारी नर ॥ तैसाचि नरहरी सोनार ॥ न पाहे शिखर विठ्ठलाचें ॥८४॥
तंव एका सावकारें येऊनी ॥ नवस चिंतिला आपुलें मनीं ॥ मज पुत्र होईल सुलक्षणी ॥ तरी देवासी कटिसूत्र वाहीन ॥८५॥
तंव नवसासी पावला रुक्मिणीपती ॥ त्यावरी यात्रेसी आला पुढती ॥ देवदर्शन घेऊनि प्रीतीं ॥ पुजार्‍यासी पुसतसे ॥८६॥
जांबूनदाचें करूनि कोंदण ॥ त्यांत बैसविणार हिरे रत्न ॥ ऐसा सोनार चतुर कोण ॥ कटिसूत्र घडोन देईल ॥८७॥
पुजारी म्हणती ते अवसरीं तैसा चतुर एक नरहरी ॥ त्यापासी जाऊनि सत्वरी ॥ पुसा लवकरी ये समयीं ॥८८॥
मग हिरे रत्नें स्वर्ण घेऊनी ॥ त्याजपासीं दिधलें नेऊनी ॥ नरहरी म्हणे मोज आणूनी ॥ द्यावें सत्वर मजपासीं ॥८९॥
अधिक उणें होईल जरी ॥ तरी शब्द न ठेवावा मजवरी ॥ सावकार ऐकोनि अंतरीं ॥ आश्चर्य मनीं करीतसे ॥९०॥
म्हणे सन्निध देव असोन ॥ यासी नावडे तयाचें दर्शन ॥ असो आपणासी काय प्रयोजन ॥ मग मोज आणोन दीधलें ॥९१॥
नरहरीनें चातुर्येंकरूनी ॥ हिरे रत्नें बैसविलीं कोंदणीं ॥ कटिसूत्रातें सिद्ध करूनी ॥ दिधलें नेऊनि त्यापसीं ॥९२॥
मग अभिषेक करून गरुडध्वजा ॥ षोडशोपचारें केली पूजा ॥ कटिसूत्र घालून पाहती माजा ॥ तंव तें न पुरेचि सर्वथा ॥९३॥
नरहरीजवळ आणोनि मागुती ॥ त्याणें वाढविलें करून युक्ती ॥ देवाजवळ आणिलें पुढती ॥ तंव तें अधिक दिसताहे ॥९४॥
अधिक करितां होय फार ॥ प्रमाण करितां माजा न पुरे ॥ सावकार जाहला चिंतातुर ॥ म्हणे रुक्मिणीवर कां क्षोभला ॥९५॥
माझा शुद्धभाव नाहीं चित्तीं ॥ कटिसूत्र न घेच श्रीपती ॥ नरहरीपासीं येऊन मागुती ॥ काकुळती येतसे ॥९६॥
म्हणे त्वां राउळासी येऊनी ॥ दृष्टीं पाहावा चक्रपाणी ॥ कटिसूत्र आपुले हातें घालोनी ॥ येईं परतोनि मागुता ॥९७॥
तो म्हणे मी आहें व्रतस्थ ॥ गेलों नाहीं अद्यापि तेथ ॥ एक शंकरावांचूनि दैवत ॥ नाहीं पाहात दृष्टीसीं ॥९८॥
मग वस्त्र गुंडाळोनि नेत्रांसी ॥ नरहरि चालिला देउळासी ॥ देखोनि हांसती क्षेत्रवासी ॥ आश्चर्य तयांसी वाटलें ॥९९॥
म्हणती निधान दृष्टी देखोन ॥ दरिद्री जैसा झांकी नयन ॥ तैसेंच नरहरीचें ज्ञान ॥ आलें कळोन आम्हांसी ॥१००॥
कीं घरीं ठेऊनियां चिंतामण ॥ वायांचि हिंडावें तीर्थाटन ॥ तेवीं घ्यावयासी देवदर्शन ॥ नेत्र झांकून जातसे ॥१॥
एक म्हणती ज्वरितासी ॥ पक्वान्न जैसें नावडे निश्चयेंसीं ॥ तेवीं नरहरीच्या ध्यानासी ॥ वैकुंठवासी नये कीं ॥२॥
एक म्हणती ज्याचा तोचि जाणे ॥ आपुल्यास काय प्रयोजन ॥ ऐसे नानाप्रींचे त्रिविध जन ॥ परस्परें बोलती ॥३॥
असो यापरी सोनार नरहरी ॥ सत्वर आला महाद्वारीं ॥ सावकारें धरूनियां करीं ॥ राउळांतरीं पैं नेला ॥४॥
एक हांसोनि बोलती वचन ॥ देवासी साष्टांग घालीं नमन ॥ एक म्हणती तो न घेचि दर्शन ॥ कैसा चरण वंदील ॥५॥
आलियासी न घाली बैसण ॥ तो काय घालील मिष्टान्न भोजन ॥ कीं प्रयोगा नायकेचि करितां स्नान ॥ तो दक्षिणादान करील काय ॥६॥
जो तुळसीस न घाली जीवना ॥ तो काय करील प्रदक्षिणा ॥ सज्जन देखोनि न करी नमना ॥ तो सदना घेऊन न जाय ॥७॥
जो वाट सांगेना पथिकासी ॥ तो मंदिरीं ठाव नेदीच त्यासी ॥ जो स्वमुखें निंदी देवभक्तांसी ॥ तो हरिकीर्तनासी न जाय ॥८॥
कर्णीं नायके गंगामाहात्म्य जाण ॥ तो कैसा करील सचैल स्नान ॥ तेवीं नरहरि न घेच देवदर्शन ॥ तो कैसा नमस्कार धालील ॥९॥
असो यापरी बोलती नरनारी ॥ मग देउलीं प्रवेशला नरहरी ॥ हातें चांचपोनियां ते अवसरीं ॥ देवास सत्वरीं पाहातसे ॥११०॥
तंव दश भुजा पंचवदन ॥ गळां पन्नगांचें भूषण ॥ मस्तकीं जटा शोभायमान ॥ विभूतिचर्चन सर्वांगीं ॥११॥
गजचर्म व्याघ्रांबर ॥ नीलकंठ मृडानीवर ॥ तोच साक्षात विटेवर ॥ उभा राहिला तया वाटे ॥१२॥
म्हणे हें माझेंच आराध्य दैवत ॥ आणि म्यां नेत्र कां झांकिले व्यर्थ ॥ ऐसा अनुताप धरूनि चित्तांत ॥ सोडोनि पाहात निजदृष्टीं ॥१३॥
तों विटेवरी उभा घननीळ ॥ मस्तकीं मुकुट अति सोज्ज्वळ ॥ श्रीमुख साजिरें अति निर्मळ ॥ कंठीं कौस्तुभ वैजयंती ॥१४॥
आणि दिव्य कुंडलें मकराकार ॥ हृदय विशाळ माज चिवळ ॥ जघनीं ठेवूनि दोन्ही कर सोज्ज्वळ ॥ कांसे पीतांबर वेष्टिला ॥१५॥
समचरण देखोनि दृष्टीं ॥ नरहरी विस्मित जाहला पोटीं ॥ मागुती झांकोनि पाहतां दृष्टी ॥ तों हातासी धूर्जटी लागला ॥१६॥
सवेंचि उघडिलीं नेत्रपातीं ॥ तों दृष्टीस देखिला रुक्मिणीपती ॥ मग अनुताप धरूनियां चित्तीं ॥ नमस्कार प्रीतीं घातला ॥१७॥
म्हणे जय जय देवाधिदेवा ॥ सकळ विश्वाच्या निजजीवा ॥ जयजयाजी सदाशिवा ॥ शरण केशवा तुज आलों ॥१८॥
जयजयाजी कैलासवासा ॥ जयजयाजी वैकुंठाधीशा ॥ जयजयाजी भक्तपरेशा ॥ अद्वैतवेषा जगद्गुरो ॥१९॥
जय क्षीरसागरविलासिया ॥ जय नीलकंठा स्मशानवासिया ॥ जय भक्तवत्सला पंढरीराया ॥ निरसीं माया भक्तांची ॥१२०॥
तुझा नेणोनि भक्तमहिमा ॥ म्यां धरिलें होतें द्वैतनामा ॥ ते कल्पना निरसोनि मेघश्यामा ॥ अद्वैतप्रेमा वाढविला ॥२१॥
ऐसी स्तुति ऐकोनि कानीं ॥ नरहरीसी म्हणे चक्रपाणी ॥ तूं निजभक्त आवडसी मजलागूनी ॥ उपाय म्हणोनि रचियेला ॥२२॥
आतां मज आणि सदाशिवासी ॥ द्वैतभेद न धरीं मानसी ॥ ऐसें म्हणतां हृषीकेशी ॥ येरू चरणांसी लागला ॥२३॥
तैंपासोनि पांडुरंगें ॥ मस्तकीं धरिलें असे लिंग ॥ आपुल्या दासांचा श्रीरंग ॥ न करी मनोभंग सर्वथा ॥२४॥
नरहरीचें चरित्र ऐकोनि कानीं ॥ श्रोतयांनीं आशंका धरिली मनीं ॥ म्हणती नामयाच्या समाराधनीं ॥ संत भोजनीं बोलाविले ॥२५॥
तयांमाजी सोनार नरहरी ॥ ऐकिला होता श्रवणद्वारीं ॥ तरी तो शंकरें आपुले बरोबरी ॥ आणिला होता ते समयीं ॥२६॥
सवें घेऊनि पुत्रासी ॥ पिता जाय जैसा भोजनासी ॥ तैसें शंकरेंही निजभक्तासी ॥ आणिलें होतें समागमें ॥२७॥
एके दिवसीं जगत्पती ॥ नामयासी नेऊनि एकांतीं ॥ म्हणे मी नांदतों सर्वां भूतीं ॥ हा निश्चय चित्तीं असों दे ॥२८॥
विष्णुदास म्हणे देवराया ॥ हें मज सांगणें पाहिजे कासया ॥ मी तुझियें कृपेंकरूनियां ॥ करितों दया सर्वां भूतीं ॥२९॥
मग नामयाचें पहावया चित्त ॥ श्वानरूप धरी पंढरीनाथ ॥ द्वादशीचे दिवसांत यात्रेमाजी फिरतसे ॥१३०॥
कोणी बैसले जेवावयासी ॥ त्या त्या जवळ जाय हृषीकेशी ॥ परी कोणीचि ग्रास न टाकिती तयासी ॥ म्हणती श्वानासी दटावा ॥३१॥
कोणाचे कणकींत तोंड घालीत ॥ तेथेंचि ताडन करूं पाहात ॥ परी हाता न सांपडे पंढरीनाथ ॥ सत्वर जातसे लगबगां ॥३२॥
कोणी करीत बैसले फराळ ॥ त्यांजपासीं जाय घननीळ ॥ बळेंचि उचलितां कोडवळ ॥ ताडन करिती तयासी ॥३३॥
ब्राह्मण बैसले जेवावयासी ॥ तेथेंचि तिष्ठत हृषीकेशी ॥ परी कोणीच ग्रास न टाकिती त्यासी ॥ आश्चर्य मानसीं करीतसे ॥३४॥
महायात्रेहूनि आले कोणी ॥ त्यांचें सोंवळें विशेष देखोनी ॥ हळूचि येऊनि चक्रपाणी ॥ स्पर्श करी जेवितां ॥३५॥
एक म्हणती विटाळ जाहला ॥ एक म्हणती कुतरा काळा ॥ त्यासी विटाळ नाही बोलिला ॥ न्याय ऐकिला धर्मशास्त्री ॥३६॥
कृषीवल करूं बैसले भोजन ॥ त्यांजवळ जाय जगज्जीवन ॥ बळेंचि उचलोनि पळतां अन्न ॥ घेती हिरून तत्काळ ॥३७॥
हिंडोनि सकळ यात्रेप्रती ॥ सत्व पाहे रुक्मिणीपती ॥ परी कोणाचा भाव सर्वां भूतीं ॥ न दिसे निश्चितीं कळों आलें ॥३८॥
कोणी म्हणती हें श्वान ॥ पिटोनि लावा यात्रेंतून ॥ ऐसें ऐकोनि जगज्जीवन ॥ काय करी तेधवां ॥३९॥
नामयाजवळी जगजेठी ॥ सत्वर येऊनि उठाउठीं ॥ मुखें उचलोनियां रोटी ॥ पळता जाहला तेधावां ॥१४०॥
विष्णुदासें देखोनि दृष्टीं ॥ हातीं घेतली तुपाची वाटी ॥ श्वानासी म्हणे लागूनि पाठीं ॥ कोरडी रोटी कां खासी ॥४१॥
श्वानाजवळी जाऊनि त्वरित ॥ ग्रास घाली त्याचें मुखात ॥ आवडीकरून रुक्मिणीकांत ॥ बैसले जेवित निजप्रीतीं ॥४२॥
ऐसें देखोनि कौतुक ॥ नामयासी हांसती सकळ लोक ॥ खूण दाखविती एकास एक । काय बोलती तें ऐका ॥४३॥
म्हणती नामयासी लागलें पिसें ॥ श्वानासी जेऊं घालितो कैसें ॥ सकळ जीव समचि यास ॥ विषम न दिसे सर्वथा ॥४४॥
जैसे भूमीवर तरुं देख ॥ तयां न भासे न्यूनाधिक ॥ कीं गायीव्याघ्रांसी उदक ॥ मानी सारिखेंचि सर्वथा ॥४५॥
कीं पौर्णिमेचा निशाकर ॥ सारिखा प्रकाशे सर्वांवर ॥ तैसें नामयाचें मानस ॥ कळलें आम्हांस ये आम्हांसी ॥४६॥
कीं राजह्म्स आणि ससाण्यास ॥ आकाश सारिखेंच दोघांस ॥ तैसें नामयाचें मानस ॥ कळलें आम्हांस ये काळीं ॥४७॥
नातरी उगवतां वासरमणी ॥ तो राव रंक जैसे सारिखेच मानी ॥ तेवीं द्वैतकल्पना टाकूनी ॥ विष्णुदास जनीं वर्तती ॥४८॥
मग हांसोनि बोलतसे श्वान ॥ त्वां कैसें ओळखिलें मजलागून ॥ नामा म्हणे खेचरें खूण ॥ सांगितली देवराया ॥४९॥
ऐसें कौतुक दाखवूनि त्वरित ॥ अदृश्य जाहले रुक्मिणीकांत ॥ लोक आश्चर्य करिती मनांत ॥ म्हणती धन्य भक्ति नामयाची ॥१५०॥
श्वानरूपें जगन्निवास ॥ भेटला आम्हीं न करितां सायास ॥ भोजन घातलें नाहीं त्यास ॥ निजकर्मास भुलोनि ॥५१॥
एकदां कार्तिकी एकादशीसी ॥ नामदेव होता उपवासी ॥ तयासी म्हणे हृषीकेशी ॥ चाल भोजनाची सत्वर ॥५२॥
त्यावरी विष्णुदास बोले वचन ॥ आज सर्वथा स्वीकारूं नये अन्न ॥ तेणें योगें तुझे चरण ॥ जन्मोजन्मीं पावती ॥५३॥
देवांत श्रेष्ठ तूं हृषीकेशी ॥ कीं वृक्षांमाजी जेवीं तुळसी ॥ तेवीं सकळ व्रतांमाजी एकादशी ॥ आम्हां वैष्णवांसी वंद्य असे ॥५४॥
यावरी बोले जगज्जीवन ॥ नामया ऐकें माझें वचन ॥ जैसें रुक्मांगद आणि अंबरीषान । निष्ठा धरून व्रत केलें ॥५५॥
तैसा निश्चय करून मानसीं ॥ कोणी न करीच एकादशी ॥ दांभिकपणें लोकांसी ॥ दाखविती आचरूनि ॥५६॥
अंतरीं निश्चयाचें बळ नसतां ॥ धरिलें व्रत तें जातसे वृथा ॥ जैसें ओलाव्यावांचोन बीज पेरितां ॥ अंकुर सर्वथा न फुटती ॥५७॥
कीं क्षुधा नसतां केलें भोजन ॥ तें काय पचेल मनुष्याकारण ॥ कीं चरणांवांचून तीर्थाटन ॥ नव्हेचि जाण सर्वथा ॥५८॥
ज्यांचीं इंद्रियें नाहींत स्वाधीन ॥ त्यांसी न होय योगसाधन ॥ कीं अंगीं उदारत्व जाण ॥ घडे दान सत्पात्रीं ॥५९॥
नातरी शूरत्व नसतां अंगीं ॥ प्राण न देववे रणरंगीं ॥ कीं उत्तम करणी नसतां अंगीं ॥ तरी सत्कीर्ति जगीं नव्हेचि ॥१६०॥
तैसियापरी निजभक्तराया ॥ अंगीं निश्चय नसतां वायां ॥ एकादशीव्रत कासया ॥ घेऊं नयेचि सर्वथा ॥६१॥
ऐसें बोलतां शारंगधर ॥ नामयानें दिधलें प्रत्युत्तर ॥ तुमची कृपा असतां मजवर ॥ निश्चयासी अंतर पडेना ॥६२॥
भाजलें बीज उगवेल त्वरित ॥ समुद्र सांठवेल कूपांत ॥ तरी देवा माझें चित्त ॥ निश्चय न सांडी सर्वथा ॥६३॥
तृणामाजी झांकेल अग्न ॥ कीं अवनीचें करवेल वजन ॥ तरी कृपासागरा माझें मन ॥ निश्चय न सांडी सर्वथा ॥६४॥
बीज पालटेल भूमींत पेरितां ॥ कीं वारा कोंडेल दार अडकतां ॥ तरी भक्तभूषणा माझिया चित्ता ॥ विकल्प सर्वथा न ये कीं ॥६५॥
व्याघ्र शांति आणूनि अंगा ॥ अजागोठणीं बैसेल उगा ॥ तरी मी आपुला निश्चय पांडुरंगा ॥ न सांडींच सर्वथा ॥६६॥
ऐकोनि नामयाचें वचन ॥ हांसों लागले जगज्जीवन ॥ म्हणे तुझिया गुणांवरून ॥ निंबलोण करावें ॥६७॥
एकदां हरिदिनीदिवसीं ॥ काय करील हृषीकेशी ॥ वृद्ध ब्राह्मण होऊनि वेगेंसीं ॥ गेला मंदिरासी नामयाच्या ॥६९॥
हातीं घेऊनियां काठी ॥ जीर्णवस्त्र नेसले जगजेठी ॥ म्हणे क्षुधा लागली बहुत पोटीं ॥ म्हणोनि तुझे भेटी पातलों ॥१७०॥
तूं विष्णूभक्त उदार म्हणविसी ॥ तरी कांहीं अन्न द्यावें मजसी ॥ ऐसें बोलोनि नामयासी ॥ द्वारापासीं बैसला ॥७१॥
विष्णुभक्तें देखोनि ब्राह्मण ॥ तयासी केलें साष्टांग नमन ॥ म्हणे काय इच्छा मनांत धरून ॥ केलें आगमन स्वामिया ॥७२॥
यावरी बोले जगज्जीवन ॥ अन्नावांचूनि व्याकूळ प्राण ॥ तरी शिधासामुग्री देऊन ॥ करवीं भोजन मजलागीं ॥७३॥
अकोनि द्विजवराचें वचन ॥ विष्णुदास म्हणे त्याजकारण ॥ एकादशीस अन्नदान ॥ करूं नयेचि सर्वथा ॥७४॥
आणिक खर्जूर अथवा फळ ॥ अंगीकाराल कंदमूळ ॥ तरी मी आणूनि तत्काळ ॥ येचि वेळे देईन ॥७५।
वचन ऐकोनियां द्विज । म्हणे अन्नावांचूनि नावडे मज ॥ म्हणोनि तुझें द्वारीं आज ॥ आलों सहज भिक्षेसी ॥७६॥
विमुख होसील मजकारण ॥ तरी आतांचि जाईल माझा प्राण ॥ ब्रह्महत्येचें पातक जाण ॥ येईल तुझिया मस्तकीं ॥७७॥
नामा म्हणे मी विष्णुभक्त ॥ असें पुण्यपापाविरहित ॥ पांडुरंगचरणीं ठेवूनि चित्त ॥ जीवन्मुक्त जाहलों ॥७८॥
जो पुण्याची आस्था न धरी चित्तीं ॥ त्यासी दिरितें बाधिती कैशा रीतीं ॥ जो कोणासी अत्यंत न लावी प्रीती ॥ त्यासी वियोगखंती न बाधे ॥७९॥
नातरी द्रव्यलोभ सर्व त्यागिला ॥ तरी तस्करभय नलगेचि त्याला ॥ कीं सन्मानचि जेणें अव्हेरिला ॥ त्यासी अपमान कासया होईल ॥१८०॥
जो आत्मस्तुती ऐकोनि न मानी सुख ॥ त्यासी लोकनिंदेचें कासयें दुःख ॥ जो लाभमात्रीं न मानी हरिख ॥ त्यासी अलाभें उद्वेग नये कीं ॥८१॥
जो सुंदर तारुण्य देखोनी ॥ आपुले जीवीं श्लाघ्यता न मानी ॥ त्यासी वृद्धपणाची जांचणी ॥ कैशापरी होईल ॥८२॥
ऐसियापरी द्विजवरा ॥ आम्हीं पापपुण्याचा मोडिला थारा ॥ आतां दुरिताकरितां अघोरा ॥ जाणें नलगेचि सर्वथा ॥८३॥
वचनें ऐकूनियां ऐसीं ॥ विप्र बोलत नामयासी ॥ भूतदया नसतां मानसीं ॥ ज्ञान सांगसी बहुसार ॥८४॥
मी अन्नाविण पीडिलें ब्राह्मण ॥ तूं न करिसील क्षुधाहरण ॥ तरी आतां तत्काळ जाईल प्राण ॥ सत्य जाण विष्णुभक्ता ॥८५॥
नामा म्हणे त्याजकारण ॥ तुम्ही द्याल जरी आपुला प्राण ॥ तरी तैसीच गति मजकारन ॥ होईल जाण द्विजवरा ॥८६॥
ऐसीं वचनें ऐकूनी ॥ लाघव करीत चक्रपाणी ॥ गरगरां नेत्र फिरवूनी ॥ मूर्च्छित अंगणीं पडियेला ॥८७॥
ऐसें देखोनि विष्णुदास ॥ जवळी जाऊन पाहे त्यास ॥ तंव राहिले श्वासोच्छ्वास ॥ मुकला प्राणास ब्राह्मण ॥८८॥
वृत्तांत ऐकोनि ते अवसरीं ॥ वाडियांत मिळाल्या नरनारी ॥ म्हणती ब्रह्महत्या आपुले द्वारीं ॥ कैशापरी करविली ॥८९॥
ब्राह्मण मागत होता अन्न ॥ दिधलें नाहीं त्यालागून ॥ पुढें ओढवलें महाविघ्न ॥ हें कैशान निवारेल ॥१९०॥
एक म्हणती हरिभक्तान ॥ उदंड सांगावें ब्रह्मज्ञान ॥ परी मुष्टिभर अन्न कोणालागून ॥ कदाकाळीं न देती ॥९१॥
यापरी निंदा करिती सकळ ॥ परी नामयाचा निश्चय अढळ ॥ ब्राह्मणाचें प्रेत तत्काळ ॥ उचलोनि नेलें भीमातीरीं ॥९२॥
सरण रचोनि सत्वरी ॥ कुणप घातलें त्यावरी ॥ आपण निजून शेजारीं ॥ अग्नि लावून दिधला ॥९३॥
नवल करिती नारीनर ॥ म्हणती नामयाचा निश्चय थोर ॥ याजसारिखा पृथ्वीवर ॥ वैष्णववीर दिसेना ॥९४॥
तो ब्राह्मण नव्हेचि श्रीपती ॥ शांत होतांचि सत्वरगती ॥ नामयाची श्रद्धा निश्चितीं ॥ निघतसे सती तयासवें ॥९५॥
प्रदीप्त होतांचि कृशान ॥ ब्राह्मण तत्काळ बैसला उठोन ॥ चतुर्भुज रूप धरून ॥ दिधलें आलिंगन नामयासी ॥९६॥
म्हणे तुजऐसा निजभक्त जाण ॥ धुंडितां न मिळे त्रिभुवन ॥ अंबरीष रुक्मांगदाहून ॥ दिसतोनेम अधिक तुझा ॥९७॥
त्याणें नगरीच नेली वैकुंठासी ॥ तूं विश्वोद्धारक जन्मलासी ॥ म्हणोनि आलिंगून हृषीकेशी ॥ मोहें पोटासी धरियेला ॥९८॥
अंबरीषानें व्रत केलें ॥ दहा गर्भवास म्यां त्याचे साहिले ॥ तुवां बौद्ध अवतारीं बोलविलें ॥ सगुण केलें देह नसतां ॥९९॥
ऐसें बोलोनि चक्रपाणी ॥ अदृश्य जाहले तत्क्षणीं ॥ लोक आश्चर्य करिती मनीं ॥ लागले चरणीं नामयाचे ॥२००॥
श्रीभीमातीरवासिया रुक्मिणीकांता ॥ पुढें बोलवीं निजभक्तकथा ॥ तुजविण बुद्धिचा प्रकाशिता ॥ आणिक सर्वथा नसेचि ॥१॥
तुझिया कृपेंकरूनि जाण ॥ अक्षरें निघती मुखांतून ॥ महीपति तुजला अनन्य शरण ॥ वंदितों चरण निजभावें ॥२॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ विंशतितमाध्याय रसाळ्हा ॥२०३॥
॥ अध्याय ॥२०॥ ओंव्या ॥२०३॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री भक्तविजय अध्याय १९