Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री भक्तविजय अध्याय ३३

श्री भक्तविजय अध्याय ३३
श्रीगणेशाय नमः ॥    ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥
कलियुगीं भक्त सुरदास ॥ त्याचें चरित्र अति विशेष ॥ संतसज्जनीं सावकाश ॥ चित्त देऊनि ऐकावें ॥१॥
द्वारकेस कृष्णावतारीं ॥ सत्यभामा आवडती नारी ॥ अकस्मात तिचें घरीं ॥ अक्रूर भक्त पातला ॥२॥
सत्यभामेनें देऊनि आसन ॥ अक्रूर बैसविला सन्मानेंकरून ॥ मग सांगतसे वर्तमान ॥ निर्लज्जमन होऊनि ॥३॥
पहिल्यासारिखा श्रीकृष्ण ॥ माझिया मंदिरा नये जाण ॥ अक्रूरा तुवां समजावून ॥ मजकारणें भेटवीं ॥४॥
तुम्हांआधीन आहे श्रीहरी ॥ ऐसें कळलें मज अंतरीं ॥ अक्रूरा प्रार्थोनि मुरारी ॥ मजकारणें भेटवीं ॥५॥
वियोगानल जाळी फार ॥ विनंति करीतसें वारंवार ॥ अक्रूरा तो वसुदेवकुमार ॥ मजला सत्वर भेटवीं ॥६॥
कोणासी सांगूं गुजगोष्टी ॥ मजवरी करील कृपादृष्टी ॥ आतां जाऊन ऊठाउठीं ॥ मज जगजेठी भेटवीं ॥७॥
सोळा सहस्र अंतःपुरीं ॥ असोन बैसला रुक्मिणीचें घरीं ॥ ऐसा व्यापक मुरारी ॥ मज भेटवी ये वेळे ॥८॥
अक्रूर विचारी निजअंतरीं ॥ सत्वर न येतां श्रीहरी ॥ तरी आतांचि हे सुंदरी ॥ प्राण देईल आपुला ॥९॥
मग मजवरी कोपेल श्रीकृष्ण ॥ ऐसा अंतर्भाव जाणोन ॥ कृष्णरूप धरी आपण ॥ अक्रूर भक्त तेधवां ॥१०॥
म्हणे माते सावध होईं ॥ हरीस आणितों लवलाहीं ॥ तों साक्षात कृष्ण ते समयीं ॥ येऊनि उभा राहिला ॥११॥
मग अक्रूरासी म्हणे श्रीहरी ॥ काय विचारिलें अंतरीं ॥ मी नसतां माझें घरीं ॥ कपटरूपें राहिलासी ॥१२॥
तरी कलियुगीं मृत्युलोकासी ॥ अक्रूरा तूं अंध होसी ॥ मग म्हणे सत्यभामेसी ॥ होसील दासी कलियुगीं ॥१३॥
वचन ऐकूनि अक्रूर भक्त ॥ कर जोडूनि विनवित ॥ आत्माराम तूं साक्षात ॥ माझिया मनीचें जाणसी ॥१४॥
तुम्ही सत्वर न येतां जाणा ॥ सत्यभामा देईल प्राणा ॥ तीस धीर द्यावया जगज्जीवना ॥ तुझें रूप धरिलें म्यां ॥१५॥
हरि म्हणे ठाऊकें मजसी ॥ किती अक्रूरा पाल्हाळ करिसी ॥ तूं उद्धरावया जनांसी ॥ अवतार घेसी कलियुगीं ॥१६॥
बाह्यात्कारें दिधला शाप ॥ अंतरीं माझ्या नाहीं कोप ॥ अक्रूर म्हणे मायबाप ॥ दर्शन द्यावें कलियुगीं ॥१७॥
हरि म्हणे सत्यभामा दासी ॥ अंध होऊनि तूं भेटसी ॥ मी प्रकटोनि तये संधीसी ॥ आपुलें स्वरूपीं मेळवीन ॥१८॥
मथुरादेशीं सुरदास ॥ अवतरला भक्तपरेश ॥ गर्भांध असोनि जगन्निवास ॥ रात्रंदिवस आठवी ॥१९॥
आसनीं शयनीं भोजनीं जाण ॥ करीतसे हरिचिंतन ॥ योगभ्रष्ट मागील स्मरण ॥ आठवीत मनें एकांतीं ॥२०॥
कीर्तन करी सप्रेम ॥ गीतप्रबंधें आळवी नाम ॥ कवित्व करूनि नित्यनेम ॥ पुरुषोत्तम आळवितसे ॥२१॥
तंव कोणे एके दिवसीं यात्रेसी आले मथुरेसी ॥ श्रीकृष्णमूर्ति पाहावयासी ॥ सुरदास चालिले ॥२२॥
सप्रेम दंडवत ते अवसरीं ॥ घातलें तेव्हां महाद्वारीं ॥ कर जोडोनि विनंति करी ॥ ध्यान अंतरीं आठवूनि ॥२३॥
म्हणे श्रीकृष्णा पतितपावना ॥ करुणासिंधु मनमोहना ॥ अपराध नसतां जगज्जीवना ॥ कां शापिलें मजलागीं ॥२४॥
कृष्णावतारीं अक्रूर होऊन ॥ एक अपराध केला जाण ॥ साक्ष देतसे माझें मन ॥ मजकारण गोविंदा ॥२५॥
कंसें पाठविलें गोकुळासी ॥ आणावयाकारणें तुजसी ॥ तेथें जातां यशोदेसी ॥ बहुत कष्ट वाटले ॥२६॥
मी घेऊनि चालिलों तुजला ॥ यशोदा रडे ते वेळां ॥ तिचा कोप गोपाळा ॥ मजकारणें लागला ॥२७॥
गोकुळींचे जन समस्त ॥ तुज म्यां नेतां चिंताक्रांत ॥ त्यांचा तळतळाट मजप्रत ॥ लागला ऐसें वाटतें ॥२८॥
गोपी रडती आक्रोशेंकरून ॥ म्हणती आम्हांसी दे श्रीकृष्ण दान ॥ म्यां नायकिलें त्यांचें वचन ॥ म्हणोनि ऐसें जाहलें ॥२९॥
केश सोडोनि आक्रंदती ॥ रथापुढें एक पडती ॥ त्यांच्या कोपें जगत्पती ॥ त्वां मजलागीं शापिलें ॥३०॥
कृष्णरूप धरिलें सत्यभामेघरीं ॥ तरी अपराध नव्हेचि श्रीहरी ॥ साक्ष आहेसी तूं मुरारी ॥ निजखूण अंतरीं जाणसी ॥३१॥
गोकुळीं अपराध सत्य घडला ॥ हें माझें चित्त साक्ष मला ॥ मग सुरदासाचे डोळां ॥ अश्रुपात लोटले ॥३२॥
ऐसें ऐकोनियां करुणावचन ॥ प्रसन्न जाहला नारायण ॥ सुरदासाचे नयन ॥ तत्काळ आले ते समयईं ॥३३॥
पुढें मूर्ति गोजिरवाणी ॥ निजभक्त देखता जाहला नयनीं ॥ शंखचक्रगदापाणी ॥ चतुर्भुज रूप सांवळें ॥३४॥
मुकुट वैजयंती कौस्तुभ मणी ॥ दिव्य पीतांबर कसिला जघनीं ॥ नेपुरें वाळे गर्जती चरणीं ॥ कोटि दिनमणि लोपले ॥३५॥
ऐसें रूप दृष्टीं देखोन ॥ सुरदास घाली लोटांगण ॥ देव म्हणे जाहलों प्रसन्न ॥ कांहीं वरदान माग मज ॥३६॥
प्रेमें देऊनि आलिंगन ॥ सुरदास म्हणे हेंचि मागणें ॥ मागुती माझे नयन ॥ पहिल्यासारिखे करावे ॥३७॥
म्यां आजपर्यंत कांहीं ॥ विषय पदार्थ देखिला नाहीं ॥ आतां तुझें रूप हृदयीं ॥ सांठविलें गोविंदा ॥३८॥
आतां जरी हे नेत्र नेसी ॥ तरी हेंचि रूप पाहेन मानसीं ॥ सुरदासाचें वचनासी ॥ हृषीकेशी हांसले ॥३९॥
हरिरूप धरूनि मानसीं ॥ निजभक्त राहिला मथुरेसी ॥ पुढें कथा वर्तली कैसी ॥ सज्जनीं श्रवण करावी ॥४०॥
अवंतीनगरीं एक ॥ पुण्यपावन राजा भाविक ॥ पांचशत गवई देख ॥ त्याचे संग्रहीं असती कीं ॥४१॥
तयांमाजी श्रेष्ठ तानसेन ॥ रागज्ञानीं अति प्रवीण ॥ दीप विझतां त्याचें गायनें ॥ प्रदीप्त होती तत्काळ ॥४२॥
राजा म्हणे तया अवसरा ॥ तुम्हांऐसा गवई बरा ॥ धुंडोनि पाहतां वसुंधरा ॥ कोणी दुसरा दिसेना ॥४३॥
ऐकोनि वदे तानसेन ॥ बोलूं नये ऐसें वचन ॥ एकाहूनि एक आगळा जाण ॥ ईश्वरें निर्माण केला कीं ॥४४॥
सृष्टिकर्ता मीच जाण ॥ ऐसें बोलिला कमलासन ॥ मग देवें विश्वामित्र निर्मून ॥ पदार्थ संपूर्ण करविले ॥४५॥
माझेंचि पात्र बहु थोर ॥ ऐसें बोलिला रत्नाकर ॥ देवें अगस्तिहस्तें साचार ॥ आचमन सत्वर करविलें ॥४६॥
माझें गायन सुंदर म्हणून ॥ नारदासी जाहला अभिमान ॥ श्रीकृष्णें आस्वल पाचारून ॥ करविलें कीर्तन त्याहातीं ॥४७॥
मजपरीस बलिष्ठ थोर ॥ नसे सृष्टींत वानर ॥ मारुतीस वाटतां साचार ॥ भरतें गर्व हरिला कीं ॥४८॥
याकरितां कोणाही कारण ॥ म्हणों नये थोर सान ॥ तानसेनाचें ऐकोनि वचन ॥ नृपनंदन संतोषला ॥४९॥
मागुती बोले नृपनाथ ॥ तुम्हांवरिष्ठ गवई प्रस्तुत ॥ कोण आहे सृष्टींत ॥ सांगा त्वरित मजलागीं ॥५०॥
राजासी म्हणे तानसेन ॥ गवयांमाजी अति प्रवीण ॥ अक्रूराचा अवतार जाण ॥ सुरदास आहे मथुरेसी ॥५१॥
राजा तयासी पुसे पुढती ॥ सुरदास रागिण्या गातसे किती ॥ त्यानें ओंजळ भरून रेती ॥ भागीरथीची आणिली ॥५२॥
म्हणे इतुक्या पाठ त्याला ॥ ऐकोनि राजा चमत्कारला ॥ शिबिका पाठवूनि मथुरेला ॥ सुरदासाला आणिलें ॥५३॥
बहुत सन्मानें करूनी ॥ राजा घाली लोटांगणीं ॥ सुरदास वैष्णव म्हणोनी ॥ कनकासनीं पूजिला ॥५४॥
सकळ गायक ते वेळीं ॥ येऊनि बैसले सभास्थळीं ॥ तानसेन सुरदासाजवळी ॥ विनंति करी तेधवां ॥५५॥
म्हणे तुमचें मुखींचें कीर्तन ॥ सकळिकीं करावें श्रवण ॥ ऐसा हेतु मनीं धरून ॥ स्वामीस रायें पाचारिलें ॥५६॥
सुरदास म्हणे तानसेनासी ॥ आम्ही तरी वैकुंठवासी ॥ येथें आलों मृत्युलोकासीं ॥ श्रीहरीचे गुण वर्णावया ॥५७॥
तेचि आवड तुम्हांकारण ॥ तरी किंचित वर्णितों हरीचे गुण ॥ मग वीणा हातीं घेऊन ॥ सप्तस्वरीं बैसविला ॥५८॥
सुरदास करितां गायन ॥ गणेश टाळ वाजवी जाण ॥ सरस्वती वीणा घेऊन ॥ मंजुळ स्वर देतसे ॥५९॥
तटस्थ जाहले गंधर्व ॥ रंभा उर्वशी मेनका सर्व ॥ त्याच्या कीर्तनीं रमाधव ॥ नृत्य करी स्वानंदें ॥६०॥
योगी बैसले वज्रासनीं ॥ त्यांच्या लवकर नये ध्यानीं ॥ तो सुरदासाचें कीर्तनीं ॥ नाचतो हें नवल कीं ॥६१॥
तपश्चर्या करिती मुनी ॥ प्राप्त नव्हे अनुष्ठानीं ॥ तो सुरदासाचें कीर्तनीं ॥ नाचतो हे नवल कीं ॥६२॥
इंद्र चंद्र ब्रह्मा हर ॥ हेही नेणती जयाचा पार ॥ तो सुरदासाच्या समोर ॥ नृत्य करी स्वानंदें ॥६३॥
ऐसें संगीत करून गायन ॥ मग साबडे नामें करी कीर्तन ॥ कृष्णावतारा केले सद्गुण ॥ तेंचि निरूपण लाविलें ॥६४॥
ऐसे एक मासवरी ॥ सुरदास राहिले अवंतीनगरीं ॥ भजनीं लावूनि नरनारी ॥ प्रेमभरें डुल्लत ॥६५॥
तंव कोणे एके दिवसीं ॥ राजा गेला निजमंदिरासी ॥ स्त्रिया विनंती करिती त्यासी ॥ कर जोडोनि तेधवां ॥६६॥
म्हणती सुरदास वैष्णव भक्त ॥ नित्य हरीचे गुण वर्णित ॥ आमुचा ऐसा आहे हेत ॥ त्याचें कीर्तन ऐकावें ॥६७॥
ऐकोनि राजा बोले वचन ॥ सुरदास आहे नेत्रहीन ॥ येथें आणावयाकारण ॥ संशय मनीं न धरावा ॥६८॥
रायाच्या स्त्रिया पांचशत ॥ नाटक शाळाही बैसल्या समस्त ॥ अनन्यभावें होऊनि विनीत ॥ सुरदासातें पाचारिलें ॥६९॥
बैसवूनि कनकासनीं ॥ पूजा केली प्रीती करूनी ॥ सुरदासें वीणा घेऊनी ॥ गायन तेव्हां आरंभिलें ॥७०॥
ऐकोनि तटस्थ जाहल्या सुंदरी ॥ तों काय वर्तलें ते अवसरीं ॥ सत्यभामेस कृष्णावतारीं ॥ श्रीकृष्णनाथें शापिलें ॥७१॥
ते सत्राजिताची कन्या सुंदरी ॥ दासी जाहली रायाघरीं ॥ सुरदास जेथें कीर्तन करी ॥ धांवत येतसे त्या ठाया ॥७२॥
कर्णीं सुंदर ऐकूनि गायन ॥ विरसली ते सकळ देहभान ॥ जेवीं नादलुब्ध होऊनि हरीण ॥ होय तल्लीन निजप्रीतीं ॥७३॥
पाऊल टाकितां ते वेळ ॥ तिजला नाठवे जल स्थळ ॥ सुरदासाचे तत्काळ ॥ नेत्र आले ते समयीं ॥७४॥
तिजला सुरदास म्हणे पाहें ॥ पुढें हौद भरला आहे ॥ मग लज्जित होऊनि लवलाहें ॥ पडदे टाकिले स्त्रियांनीं ॥७५॥
म्हणती नेत्र आहेत यासी ॥ ऐसें बोलती एकमेकींसी ॥ मग संकोच होऊनि मानसीं ॥ लपोनियां बैसल्या ॥७६॥
ऐसा एकांत देखोन ॥ तेथें प्रगटले श्रीकृष्ण ॥ सुरदास दासी दोघें जण ॥ आपुलें स्वरूपीं मेळविलीं ॥७७॥
पुढिले अध्यायीं कथा अद्भुत ॥ सेना न्हावी वैष्णव भक्त ॥ त्याचें चरित्र प्रेमयुक्त ॥ चतुर परिसोत निजप्रीतीं ॥७८॥
भक्तकथा आवडीं करितां श्रवण ॥ तया तुष्टेल जगज्जीवन ॥ महीपति विनवी कर जोडून ॥ भाविक भक्तांकारणें ॥७९॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ त्रयस्त्रिंशाध्याय रसाळ हा ॥८०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीभक्तविजय त्रयस्त्रिंशाध्याय समाप्त ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री भक्तविजय अध्याय ३२