Shri Gulvani Maharaj : परमपूज्य श्री गुळवणी महाराज यांचा जन्म मार्गशीर्ष वाद्य १३ तिथी तसेच तारखेप्रमाणे गुरुवार २३ डिसेंबर १८८६ रोजी कोल्हापूरच्या जिल्ह्यातील कुडुत्री वा कुडुची या लहानश्या खेड्यात झाला. महाराजांचे पणजोबा कौलव ग्रामी परंपरागत वैदिक व्यवसाय करत होते. महराजांच्या घराण्यात पूजा-पाठ व्रत वैकल्ये, उपासना, जप-तप व इतरही धार्मिक विधी सतत चालत असत. बालपणातच अतिथींचे मनोभावे स्वागत, साधू-संत, सज्जन-सत्पुरुष तसेच संन्याशी यांच्या संगताची आवड त्यांच्यावर सुसंस्कार घडत होते. महाराजांचे वडील वेदमुर्ती दत्तभट यांची दिनचर्या तपस्व्यासारखी विरक्त व अनासक्त अशी होती तर आई उमाबाई भगवान दत्तात्रेयांच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांना दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन देत त्यांच्या ओटीत श्रींनी एका कागदामध्ये अष्टगंधयुक्त अशा चांदीच्या पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. श्री वासुदेव निवास आश्रमात आजही त्यांचे नित्यपूजन सुरु आहे.
बालपणापासूनच महाराजांना कलेची आवड असल्यामुळे त्यांना चित्रकलेचे शिक्षण देण्यात आले. पुढे नोकरी करून संसार करावा अशी पालकांची इच्छा असली तरी महाराजांचे प्रारब्ध वेगळेच होते. १९०७ साली प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांचा मुक्काम नरसोबाच्या वाडीला असताना महाराजांनी एका श्लोकबद्ध हारात श्री दत्तप्रभूंचा फोटो तयार करून स्वामींना अर्पण केला. स्वामी प्रसन्न झाले आणि त्यांनी महाराजांना आशीर्वादयुक्त हातात बांधण्यासाठी मंत्रसिद्धप्रसाद पेटी तयार करून दिली. चातुर्मासासाठी पवनी येथे प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांचा मुक्काम असताना श्रीगुळवणी महाराज आपल्या मातोश्री व भगिनी गोदुताई यांना घेऊन पवनीस गेले व तेथे स्वामींनी या तिघांनाही अनुग्रह दिला. तो अनंत चतुर्दशीचा दिवस होता. हावनूर येथे श्रीस्वामी महाराजांचा चातुर्मास असल्याचे समजल्यानंतर श्रीगुळवणी महाराजांनी त्यांना भेटण्यासाठी पायी प्रवास सुरु केला कारण त्यांच्या कडे प्रवासाचे पैसे न्हवते. कष्टमय प्रवास करीत ते स्वामी महाराजांपर्यंत येऊन पोहचले. श्रीसद्गुरूंच्या अद्भुत दर्शनाने सर्व थकवा विसरले. तसेच महाराजांना स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर स्वामींनी महाराजांना आसने, प्राणायाम याचे धडे दिलेत. नंतर औदुंबर येथे गेल्यानंतर श्री महाराजांनी श्रीदत्तमालामंत्राचे पुर:श्चरण केले वव महाराजांना श्रीक्षेत्र गरुडेश्वरी स्वामींनी धौती क्रिया शिकवली. तसेच या ठिकाणी स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी महासमाधी घेतली. चित्रकला शिक्षकाची नोकरी करीत असताना श्रीगुळवणी महाराजांच्या अंतरंगाची पुण्यातील विद्यालयामध्ये कुणालाही ओळख नव्हती. तसेच ते नोकरी सांभाळून ग्रंथांचे वाचन, पारायण, पूजा, योग यांचा अभ्यास करीत असत. देव-गुरुंवरील अमर्याद श्रद्धा, मितभाषी स्वभाव, एकांतप्रियता,शास्त्रानुसार आचरण या गुणांनी ते संपन्न झाले होते. नंतर श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज आणि श्री गुळवणी महाराज यांची ओळख झाली. महाराजांनी मग स्वामींबरोबर अनेक तीर्थयात्रा केल्या. तसेच गुरूंच्या स्मृत्यर्थ श्री वासुदेव निवास आश्रमपुणे येथे उभारला. देवस्थाने, तीर्थक्षेत्रे, धर्मशाळा ठिकाणी मोठा दानधर्म केला. अनेक उत्सवातून लोकांच्या श्रद्धा अधिक बळकट केल्या. व १५ जानेवारी १९७४ रोजी आपला देह विसर्जित करून ते अनंतात विलीन झाले.