॥ श्री मार्तंड भैरवाय नम: ॥ जय वेदव्यासपुराणपुरुषा ॥ ब्रह्मा विष्णु महेशा ॥ आदि नारायणा सर्वेशा ॥ लीला अगाध तुझी हे ॥१॥
कंठी प्राण राहिला ॥ ते समयीं मल्ल स्तविजेला ॥ जय जयाजी दीनवत्सला ॥ करुणानिधी शिवसांबा ॥२॥
सर्वात्मक देवाधिदेवा ॥ जय जयाजी उमामाधवा ॥ भालचंद्रा नीलग्रीवा ॥ ज्ञानदाता नमो नमो ॥३॥
नमो नमो मायाचालका नमो नमो ब्रह्मांडनायका ॥ नमो नमो संहारकारका ॥ निर्विकारा नमो नमो ॥४॥
नमो नमो स्तवनदाता ॥ नमो नमो स्तवनातीता ॥ नमो नमो बुध्दिदाता ॥ देवभक्ता तुज नमो ॥५॥
स्तवन ऐकोनि शिव तोषला ॥ त्वरित आतां वर मागें मल्ला ॥ देईन जो चित्तीं चिंतला ॥ वचन ऐकोनि मल्ल बोले ॥६॥
प्रथम यावे माझे नांव ॥ तुझें पायासीं प्रेतावरी ठाव ॥ हेचिं असे मनीं भाव ॥ शिव म्हणे दिधलों मी ॥७॥
मल्लकुमार आले युध्दास्तव ॥ कुंभ शूलधर देवगंधर्व ॥ लोह अर्गळा महाबाहु नांव ॥ पर्वत व्हावे म्हणोनि शाप पांचांसि दिधले ॥८॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥९॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां मल्लस्तुतिवरप्रदानो नाम सप्तदशोऽध्याय: ॥१७॥