श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ रत्नादि कांचन सुवर्णगाभा ॥ येणें रचणुक मंडप उभा । सिंहावळी प्रथम शोभा ॥ द्वितीय पंक्ति किन्नरकृति ॥१॥
तृतिया वळीस गजबेडे ॥ चतुर्थ पंक्तिस उभे घोडे ॥ पंचम वेलकृति कमल पुष्पघडे ॥ सहावे सातवे खडे रत्नखचित ॥२॥
भूमिका सुवर्णकांति ॥ रत्नखचिताचे भिंती ॥ दोन्ही बाजू शुंडाकृति ॥ माणिकाच्या पायर्या ॥३॥
खांब इंद्रनीळाचे शोभे ॥ पक्षी एकमेकांत झोंबें ॥ सुवर्ण पुतळे घेवोनिया उभे ॥ कर्पुरआरति करों ॥४॥
कड्या किलच्या बोदसर ॥ सूर्यकांतीचे समग्र ॥ पद्मरागादि रत्न प्रखर ॥ याचीं द्वारें शोभती ॥५॥
सप्तगोपुरावरती ॥ सूर्यापरि कळास झळकती ॥ ऐशा मंडपीं सहपार्वती ॥ बैसला असे महामुनी ॥६॥
ब्रह्मा बृहस्पति कवि शुक्र ॥ वायु एकादशरुद्र ॥ अणिमाणि सिध्दि जोडोनि कर ॥ सिध्द विद्याधरादि ॥७॥
हाहा हुहु गंधर्व यक्षजन ॥ नारद तुंबर गायन ॥ कुबेर नवविधि कर जोडोन ॥ अग्नि मूर्तिमंत उभा ॥८॥
वायु तेथें झाडी बागुडा ॥ वरुण घालितसे सडा ॥ सूर्य शीतळ होऊनिं खडा ॥ सांबाचें स्तवन करी ॥९॥
घेउनी वाळ्याचा पंखा बरा ॥ जळ सिंचुनि घालिती वारा ॥ देव तोषविती उमावरा ॥ सुगंध धूप जाळोनि ॥१०॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥११॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां चंद्रचूडसभावर्णनोनाम पंचमोऽध्याय गोड हा ॥५॥