Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १९

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १९
कलिंगाबरोबर गोरक्षनाथाचा स्त्रीराज्यात प्रवेश, मारुतीची दुर्दशा
जेव्हा कानिफा व गोरक्ष यांच्या भेटी झाल्या. तेव्हा तू गुरूच्या शोधास का फिरतोस? तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर स्त्रीराज्यात मौजा मारीत आहे, असे गोरक्षास कानिफाने सांगितले होते. ते ऐकून गोरक्ष स्त्रीराज्यात जावयास निघाला व त्या सीमेपर्यंत येऊन पोचला. नंतर त्याच्या मनात अनेक विचार येउ लागले. ते तर्क अशा प्रकारचे की, ज्या ठिकाणी गुरुराज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसावयाचे; परंतु ख्यालीखुशालीत गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही, हीच भ्रांति आहे. अशा प्रकारचे अनेक तर्क त्याच्या मनात आले.
 
त्या वेळी कलिंगा या नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह स्त्रीदेशात जात होती. ती रूपवती असून नृत्यगायनात अप्सरा, गंधर्व यांना लाजविण्याइतकी हुशार होती. तिची व गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली. मग तो तिच्याजवळ जाऊन तुला तिचे नाव गाव व कोठे जावयाचे हे विचारू लागला. तेव्हा ती म्हणाली, मला कलिंगा असे म्हणतात. मी स्त्रीराज्यात जात आहे. तेथे मैनाकिनी या नावाची स्त्री राज्यकारभार करीत असते. तिला मी आपली नृत्यगायनकला दाखवून वश करून घेणार आहे. तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव्य देईल. ते कलिंगेचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने गोरक्षनाथाने स्त्रीराज्यात जाण्याचा बेत ठरविला. तिच्याबरोबर आपणास राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरूचाहि पक्का तपास लागेल, हा त्याचा विचार होता. त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढिली की, कृपा करून मला समागमे न्याल तर बरे ! माज्या मनातून तुमच्याबरोबर यावे असे आहे. हे ऐकून ती म्हणाली, तुमच्या अंगात कोणता गुण आहे? तेव्हा गोरक्ष म्हणाला, मला गाता येते व मृदंगहि वाजविता येतो. मग तिने त्यास सांगितले की, तुमच्या अंगचा गुण प्रथम येथे दाखवा. तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसावयास घातले व तिने सारंगी-मृदंग वगैरे सर्व साज त्याच्या पुढे आणून ठेविले.
 
मग गोरक्षनाथाने गंधर्वप्रयोगमंत्र म्हणून भस्म कपाळावर लाविले व ते चोहीकडे फेकून गावयास बसला. तेव्हा झाडे, पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागली व वाद्ये वाजू लागली. हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोट घातले. तिला तो त्या वेळी शंकरासारखा भासू लागला. जो मनुष्य झाडे; दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवीत आहे, त्याला स्वतः उत्तम गाता, वाजविता येत असेल ह्यात आश्चर्य कोणते? त्याच्या अंगचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्याच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली की, महाराज ! गुणनिधे! आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालावयाची नाही. असे बोलून ती त्याच्या बद्दल सर्व विचारपूस करू लागली. तेव्हा गोरक्षनाथ गहन विचारात पडला. त्याने तिला नाव न सांगण्याचा बेत केला. कारण त्याचा पुढील कार्यभाग साधावयासाठी याला नाव गुप्त ठेवावयास पाहिजे होते. यास्तव त्याने तिला पूर्वडाम असे आपले नाव सांगितले. मग तिने तुमच्या मनात कोणता हेतु आहे, म्हणून विचारिले. त्यावर तो म्हणाला, विषयसुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहे व ते मला नको; पण पोटाला मात्र एक वेळेस घालीत जा. ह्यावाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाही. गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून कलिंगा म्हणाली, महाराज ! आपण म्हणता त्याप्रमाणे तजवीज होईल. पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात स्त्री राज्यात जावयाचे आहे, पण त्या देशात पुरुषाचे जाणे होत नाही. ते ऐकून पुरुष तेथे न जाण्याचे कारण गोरक्षाने तिला विचारिले. तेव्हा ती म्हणाली, मारुतीच्या भुभूःकाराच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात, त्यात पुरुषाचा गर्भ मरतो व स्त्रियांचा जगतो. कोणी मोठा पुरुष का जाईना, तो तेथे मरावयाचाच ! ह्यास्तव तेथे तुमचा कसा निभाव लागेल, ह्याचा मला मोठा संशय आहे. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, मारुती मला काय करणार आहे? त्याच्या भुभुःकारापासून मला काही एक इजा व्हावयाची नाही. तू हा संशय मनात अजिबात आणू नको, असे बोलून तो तेथून उठला. मग कलिंगा रथात बसल्यावर गोरक्षनाथ तिचा सारथी झाला. व त्याने घोड्याचे दोर हातात धरिले, प्रथमारंभी त्याने वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र यांची योजना केली. त्याने त्यास बिनहरकत स्त्रीराज्यात प्रवेश करता आला. पुढे अस्तमान झाल्यामुले ते चिन्नपट्टण गावी वस्तीस राहिले. तेथे भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले. नंतर सुमारे प्रहर रात्रीस अंधार नाहीसा होऊन स्वच्छ चांदणे पडले.
 
 
इकडे मारुती सेतुबंध रामेश्वराहून स्त्रीराज्यात जावयास निघाला तो सीमेवर येताच गोरक्षानाथाने भारून ठेविलेल्य चार अस्त्रातून प्रथम वज्रास्त्र येऊन उदरात बसले. एवढा वज्रशरीरी मारुती, पण त्या अस्त्राच्या झपाट्यासरसा मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर पडला. तेव्हा स्पर्शास्त्राने त्यास जमिनीवर खिळवून टाकिले, तेणेकरून त्यास हलता चालता येईना. त्यानंतर मोहिनीअस्त्राचा अंमल बसला. शेवटी नागास्त्रामुळे प्रत्यक्ष शेष येऊन त्यास वेढा देऊन बसला. नागास्त्राच्या वेष्टणाने मारुती फारच विकल होऊन पडला. अशा चारी अस्त्राचा त्याजवर मारा झाल्याने त्याचे काही चालेनासे झाले तो काही वेळाने मरणोन्मुख झाला व आपण आता वाचत नाही असे त्यास वाटू लागले. तो वारंवार सावध होई व बेशुद्ध पडे, आता अंतकाळी श्रीरामाचे स्मरण करावे असा विचार करून त्याने श्रीरामचंद्राचे स्तवन केले. त्यामुळे श्रीराम तत्काळ धावून गेले व मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळवळा आला. मग रामाने पाकशासन (इंद्र) अस्त्राच्या योगाने वज्रास्त्र काढून घेतले. विभक्तास्त्राच्या योगाने स्पर्शास्त्राचेहि निवारण केले व शेषास काढून घेऊन मोहिनीअस्त्राचेहि निवारण करून रामाने मारुतीस त्या संकटातून सोडविले.
 
मग मारुती सावध होऊन रामाच्या पाया पडला व हात जोडून म्हणाला की रामा ! अशी प्राण घेणारी ही प्रखर अस्त्रे आहेत. आज माझा प्राण गेलाच होता, पण तू धावत येऊन मला जीवदान दिलेस म्हणून वाचलो. प्रभो ! तुझे उपकार माझ्याने कदापि फिटावयाचे नाहीत. असे म्हणून मारुती रामाच्या पाया पडला. त्यास रामाने पोटाशी धरिले व असा तुला हात दाखविणारा शत्रु कोण आहे म्हणून विचारले. तेव्हा मारुती म्हणाला, सांप्रतकाळी माझ्याशी शिरजोरपणा दाखविणारा क्षत्रिय कोणी राहिलेला नाही, परंतु नाथपंथाचे लोक तूर्त प्रबळ झालेले आहेत. त्या नऊ नाथांपैकी कोणी येथे आला असावा. आजकाल ते अजिंक्य असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करीत आहेत. ते मारुतीचे भाषण ऐकून रामाने त्यास सांगितले की, नाथपंथाचे लोक हल्ली प्रबळ झाले असून ते अनिवार आहेत. परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत व माझी त्याजवर पूर्ण कृपा आहे, यास्तव तू आपल्या बळाचा अभिमान मिरवून त्यांच्या वाटेस जाऊ नको. असा मारुतीला बोध करून कोणत्या नाथाचे हे कृत्य म्हणून अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर हे गोरक्षनाथाचे असे रामाच्या ध्यानात आले. मग मारुतीला रामाने सांगितले की, हरिनारायणाचा अवतार जो गोरक्षनाथ तो आला आहे व हा प्रताप त्याचाच आहे.
 
मग मारुतीने रामाला सांगितले की, त्याने हे संधान करून स्त्री राज्यात संचार केला आहे, त्याच्या दर्शनास चलावे. त्याची भेट घेऊन मला त्याच्यापासून एक मोठे कार्य करुन घ्यावयाचे आहे. हे ऐकून त्याच्याशी तुझे असे कोणते काम आहे म्हणून रामाने विचारले असता, मारुतीने मच्छिंद्रनाथाची मूळारंभापासून सर्व हकीगत सांगितली. नंतर तो म्हणाला, त्या मच्छिंद्रनाथास हा गोरक्ष आता घेऊन जाईल. यास्तव त्यास गोड गोड बोलून अनुकूल करून घ्यावे म्हणजे तो त्यास नेणार नाही. तेव्हा रामाने म्हटले की, चल, तुझे काम आहे ह्यास्तव मीही युक्तिप्रयुक्तीच्या दोन गोष्टी सांगेन व होईल तितकी खटपट करीन. असे बोलून दोघेजण निघाले.
 
ते मध्यरात्रीच्या सुमारास चिन्नापट्टणास जाऊन पोचले. त्या वेळी सर्वत्र सामसूम झाली होती. हे दोघे ब्राह्मणाचे रूप घेऊन गोरक्षनाथाजवळ गेले. त्या वेळेस तो निवांत ध्यान करीत बसला होता. त्यास नमस्कार करून हे दोघेजण त्याच्याजवळ बसले. मग आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहो, असे बोलून गोरक्षनाथाची पुष्कळ स्तुतु करू लागले. नंतर आमच्या मनात एक हेतु आहे, तो पूर्ण करावा. असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम आहे ते कळवावे म्हणून गोरक्षनाथाने त्यास विचारले. त्या वेळी ते म्हणाले, मी कार्य करून देतो, असा प्रथम भरवसा देऊन वचन द्या, म्हणजे आमचा हेतु सागू. हे ऐकून गोरक्षनाथाने मनात आणिले की, हे मजपाशी काय मागणार आहेत? शिंगी, सारंगी, कुबडी, फावडी, शैली, भोपळा ही काय ती संपत्ति आमच्याजवळ आहे. ह्यावाचून आमच्यापाशी तर काही नाही. असे असता हे आमच्या जवळ काय मागणार नकळे ! असा विचार करीत असता दुसराहि एक विचार त्यांच्या मनात आला की, आता मध्यरात्र उलटून गेली असता या वेळी ह्या स्त्रीराज्यात पुरुष आले कसे? तर हे सहसा मनुष्य नसावे, कोणीतरी स्वर्गात राहणारे देव असावे. अशी त्यांच्याबद्दल अटकळ करून मग त्यांच्याकामाबद्दल विचार करून पाहू लागला, तो काहीच त्याच्या लक्षात येईना मग आपण ज्या कामासाठी आलो त्याखेरीजकडून त्यांचे म्हणणे कबूल करण्यास हरकत नाही, असा विचार करून तो त्यांना म्हणाला की, महाराज ! आपण विप्र म्हणता, पण येथे येण्याची त्यांची छाती नाही; तरी आपण कोण आहा हे मला प्रथम सांगा. असे बोलून त्याने लीनतेने त्यांच्या पायावर मस्तक ठेविले. तेव्हा ह्यास आता ओळख द्यावी असा रामाने विचार केला. त्यास मारुतीचाहि रुकार मिळाला. मग रामाने आपले स्वरूप प्रगट करून त्यास पोटाशी धरून मच्छिंद्रनाथास न नेण्याबद्दलचा मारुतीचा हेतु त्यास कळविला व मारुतीने मैनाकिनीला वचन दिले आहे म्हणून तू त्याला नेऊ नये, हा ह्याचा हेतु तू पूर्ण कर म्हणून कळविले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, आम्ही योगी ! आम्हास हे कर्म अनुचित होय; यास्तव हे वगळून दुसरे पाहिजे ते मागा मी देतो, पण या पुढे मच्छिंद्रनाथास येथे ठेवणार नाही हे खचित. आपण या बाबतीत मला अगदी भीड घालू नका म्हणून गोरक्षनाथाने धडकावून उत्तर दिले. तेव्हा मारुतीस राग येऊन तो युद्ध करण्यास तयार झाला. ते पाहून रामाने मारुतीचे सांत्वन करून त्या दोघामध्ये होणारा तंटा मिटवून गोरक्षनाथास पोटाशी धरिले. गोरक्षनाथ रामाच्या पाया पडला. नंतर श्रीराम आणि मारुती आपापल्या स्थानी गेले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १८