श्रीगणेशाय नमः ॥ श्रीअनंतेशाय नमः ॥
जय जय पुराण पुरुषा निर्विकारा अवयवानंता अपरंपरा सच्चितानंता सर्वेश्वरा शब्दा गम्या तुज नमो ॥१॥
जय जय जगद्वंद्या वेदोद्धारणा मच्छरुपा शंखासुर हरणा मंदराचळ सृष्टीधरणा कूर्मरुपा नमोस्तुते ॥२॥
जयजय हिरण्याक्ष दैत्यांतका वराहरुपा सृष्टी पालका हिरण्य कश्यप विदरका प्रल्हाद रक्षका नरहरी ॥३॥
जयजय बळी दर्प हरणा विराटस्वरुपा बटुवामना क्षत्रियांतका भ्रुगुनंदना अनंदधामा नमोस्तुते ॥४॥
जय कौशल्या गर्भरत्ना शक्रारि जनक प्राण हरणा जयजया कंसासुर मर्दना देवकीनंदना नमोस्तुते ॥५॥
तोचि स्वयें बौध्य श्रीधर पंढरीये उभा श्रीकटिकर भक्तजनांची निरंतर वाट पाहत उभा असे ॥६॥
म्लेंछ वधावया लागोन होसी कलंकी नारायण ॥ लीला नाटकी तुझे गुण वर्णूं न शके विधाता ॥७॥
मृगेंद्रा पुढें जैसा वारण चंडांशा पुढें खद्योत जाण तेवीं बुद्धीचें शाहणपण निर्गुण स्वरुपीं न चले ॥८॥
सदानंद जग देक ईश्वर करावया जगाचा उद्धार सृष्टीवरी सगुणावतार धरुनि नामें निर्धारिलीं ॥९॥
ती नामें जपतां वोष्टीं पापें जळती बारावाटीं असो मागिले अध्यायाचे शेवटीं तीर्थनामें निवेदिलीं ॥१०॥
यावरी बोले षंडू नंदन तीर्थें सांगीतलीं मजलागून ॥ तरी त्या तीर्थीं स्नानदान आणीक कवणे दिवशीं करावें ॥११॥
संतोषोनि गंगात्मज ॥ धर्माप्रती सांगे गुज पूर्वीं ऋषींतें भ्रुगुराज नेम दिवसे नेमिले असती ॥१२॥
तेथींचें समस्त अवलोकून सांगतों ऐके सावधान अश्वीन तुळार्क होतां पूर्ण प्रारंभ जाण यात्रेचा ॥१३॥
तेचि माधव मासपर्यंत वृषभार्काचा होतां अंत यात्रा करावी समाप्त नेमार्थ ऐसा असे कीं ॥१४॥
तथापी प्राणी मात्रां कारणें तीर्थस्नान भिन्न भिन्न घडावयातें दिवस जाण अनुक्रमें नेमिले ॥१५॥
अश्वीन कृष्ण एकादशी तुळातीर्थीं जावे स्नानासी स्नानदानें पुण्यराशी नारीनरासी प्राप्त होय ॥१६॥
तेथें करावें तुलदान आणीक करावें पितृतर्पण पुढें द्वादशी येतां जाण चक्रतीर्थी स्नान कीजे ॥१७॥
भार्गवरामें दैत्य वधिले जेथें चक्र प्रक्षाळिलें ह्मणोनि शास्त्रोक्त बोलिले चक्रतीर्थ त्या नाव ॥१८॥
त्या तीर्थें स्नान कीजे पिंडदान पितृतर्पिजे ब्राह्मणद्वारा दान दीजे तेणें होईजे पावन ॥१९॥
त्रयोदशी कर्दमाळीं स्नान करावें प्रातःकाळीं महापातका होय होळी विष्णुलोकाप्रती पावे ॥२०॥
कर्दमाळीचें थोर माहत्म्य दृष्टी देखतां पातकें भस्म आतां चतुर्दशी निःशीम नीळ पर्वतीं पैं जावें ॥२१॥
तेथें नीळेंद्र कुंड असे स्नान करितां पापनासे पुनरागमन चुकतसे अमरादिक वंदिती त्या ॥२२॥
पुढें आमावास्या महापर्वणी स्नानदान वैतरणी श्रीएकवीरा भवानी यथासांग पूजावी ॥२३॥
सीतपक्ष कार्तीक मास उदया येतां प्रथम दिवस तीर्थ वरंडक विशेष स्नान तेथें करावें ॥२४॥
सहस्त्र धेनू सवत्सदान घडे स्नान करितां पुण्य द्वितीयेसीं करावें मार्जन कोळवापी तीर्थोदकीं ॥२५॥
तरी ये जन्मींचें पाप जाय अक्षय पुण्य प्राप्त होय तृतीया तिथी उगवतां सूर्य उत्पळे तीर्थीं जावें पैं ॥२६॥
यथासांग स्नानदान करितां महामखाचें पुण्य अंतीं प्राप्त वैकुंठ भुवन निर्धारेंसी जाण पां ॥२७॥
मनोमय कुंडतीर्थीं स्नानदान करावें चतुर्थी तया पुण्यासी नसे गणती महिमा अद्भुत तेथीचा ॥२८॥
वंध्या पावे पुत्र संतती स्त्रिया अखंड सौभाग्यवती धनधान्य ऐश्वर्यप्राप्ती ॥ नराकारणें होतसे ॥२९॥
तेथें करितां पिंडदान पितृ पावती वैकुंठ भुवन तिथी पंचमीसी जाण पांडूनदी तीर्थाप्रती ॥३०॥
पांडू नदी करितां स्नान होय गवा लक्षाचें पुण्य ॥ तीर्थ महिमा संपूर्ण कितीं ह्मणूनी वर्णावा ॥३१॥
षष्ठी पिंडारकतीर्थी नारीनर स्नानें करिती अश्वमेध फळप्राप्ती नारीनरां होतसे ॥३२॥
तेथींचें उदक प्राशिती जे नर तिहीं जिंतिला भवसागर परमस्थान तें पवित्र सुरवर वंदिती ॥३३॥
सप्तमी ब्रह्मकुंडीं स्नान करितां पुण्य राजसू यज्ञ फळप्राप्त संपूर्ण ऐसें महात्म्य तेथींचें ॥३४॥
अष्टमी तिथी तुंगार तीर्थी सिळाकुंड महाथोरी द्वीतीयतीर्थ अवधारी कपिलकुंड या नावें ॥३५॥
तृतीय कुंड असोग तीर्थ चवथें जखेश्वरी कुंड समर्थ भैरवकुंड अत्यद्भुत पंचतीर्थें जाणिजे ॥३६॥
पंचकुंडीं करुनी स्नान श्रीजखेश्वरीचें घ्यावें दर्शन यथासांग शिवपूजन करितां पुण्यामिती नसे ॥३७॥
महाघोर अटव्यवन ऋषी करिती तपार्चन तेथींचा महिमा संपूर्ण मागेंच कथिला असे ॥३८॥
चक्रतीर्थीं नवमी दिनीं स्नानें पावन होती प्राणी अगम्यागम्य सुरापानी हरती समस्त किल्मिषें ॥३९॥
आशंका घेती भाविकभक्त कीं पूर्वीं वर्णिलें चक्रतीर्थ पुनः वदावें किमर्थ यदर्थीं कारण परीसीजे ॥४०॥
जया तीर्थाचें जया दिनीं पुण्य बोलिलें महापुराणीं फळप्राप्तीस्तव मागुत्यानी तेचि येत पुनः पुनः ॥४१॥
ओंकार मातृकान्यास पुनः पुनः येती जपास अक्षरें जैसीं पुस्तकास शब्दभेदें विस्तारिती ॥४२॥
जेवीं तिथी वासर कर्ण मुहूर्त नक्षत्रयोग लग्न गणीत परत्वें मागुत्यान दिवसामासा येता ती ॥४३॥
तेवीं तीर्थाचा पर्वकाळ दिवसामासा विविध फळ गौतमी स्नानें सदा सुशीळ विशेष महिमा सिंहास्तीं ॥४४॥
प्रयाग तीर्थ सर्वदा सुभट परीमाघमासीं महिमा श्रेष्ठ यालागीं विद्वज्जनीं वरिष्ठ शब्द येथें न ठेवणें ॥४५॥
असो दशमी तिथी स्नान श्रीतीर्थीं करितां पावन ब्रह्म हत्यादिकें दारुण निरसोनि जाती क्षणार्धें ॥४६॥
गुरुडा संगमीं एकादशी स्नान घडतां स्त्री पुरुषांसी यज्ञाचें फळ निश्चयेसीं प्राप्त होय निर्धारें ॥४७॥
द्वादशी तिथी सांभवेतीर्थ स्नान करितां पापें जळत विष्णुलोक होय प्राप्त महिमा अद्भुत तेथींचा ॥४८॥
त्रयोदशी तिथी जाण विमळ महातीर्थीं स्नान करितां पुण्य संपूर्ण अगनीत गणना नसेची ॥४९॥
रामकुंडीं चतुर्दशी स्नानमात्रें पुण्यराशी परमागती प्राणियांसी प्राप्त होय जाणिजे ॥५०॥
पौर्णिमेचा ऐका विधी वैतरणी स्नान करावें आधीं दानधर्म ईश्वर बुद्धी मौन्य धरुनि करावी ॥५१॥
तेथोनि शीळातीर्थीं स्नान मौन्यें करावें शालग्रामार्चन क्रिया कमांतर सारुन विमळ तीर्थाप्रती जावें ॥५२॥
मौन्यें स्नाना प्रवर्तावें विष्णु सहस्त्रनाम जपावें तेथूनि चक्रतीर्थ बरवें सत्वर जावें तैसेंची ॥५३॥
चक्रतीर्थीं करुनि स्नान स्तब्ध रुपें निघावें तेथून पिंडारक तीर्थजाण तेथें जावें शेवटीं ॥५४॥
प्रथम सारुनियां स्नान मग मौन्यें करावें नित्यकर्म ऐसें प्रचीत विप्रें करितां जाण बाळहत्या पाप दग्ध जालें ॥५५॥
धर्मराजा करी प्रश्न प्रचीत विप्र कोठील कोण बाळहत्या तयाकारण काय निमित्त घडावया ॥५६॥
तरी ती मुळा पासोनि कथा मातें निवेदावी आतां भीष्म वदे पुण्यवंता एकचित्तें ऐकिजे ॥५७॥
पुढिले अध्यायीं कथा सुरस ऐकतां प्राप्त निर्दोष यश सूत ह्मणे ऋषीस सावकास परिसीजे ॥५८॥
स्वस्ति श्रीपरशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु सप्तविंशोऽध्याय गोड हा ॥२७॥ श्रीभार्गवरामार्पणमस्तु ॥