Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीरामविजय - अध्याय १६ वा

श्रीरामविजय - अध्याय १६ वा
अध्याय सोळावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥

श्रीरामकथा अति सुरस ॥ सकळ तीर्थांहूनि विशेष ॥ गंगेपरीस निर्दोष ॥ निजभक्तांसी प्रिय होय ॥१॥
इहपरत्रतीर साचार ॥ रघुवीरचरित्र निर्मळवीर ॥ दाटला पूर्ण प्रेमपूर ॥ गर्जे थोर रामघोषें ॥२॥
गंगेमाजी वाहे जीवन ॥ कथासरिता ते जगज्जीवन ॥ चित्तवृत्तिजळचरें पूर्ण ॥ माजि निमग्न तळपती ॥३॥
तेथें घडिघडी डहुळे पाणी ॥ रामकथा निर्मळ अनुदिनीं ॥ ब्रह्मानंदें उचंबळोनी ॥ पुनीत करी त्रिभुवना ॥४॥
गंगेमाजी बुडतां मरावें ॥ येथें बुडी देतां तरावें ॥ हें विशेष कर्तृत्व स्वभावें ॥ गंगेहूनि अधिक ॥५॥
रामकथा करितां श्रवण ॥ सकळही तीर्थीं केलें स्नान ॥ तें फळ आलें हाता पूर्ण ॥ विशेष जाण रामकथा ॥६॥
ऐसी रघुवीरकथा पावन ॥ परी संत श्रोते सावधान ॥ तरी वक्त्याचा हर्ष पूर्ण ॥ गगनामाजी न समाये ॥७॥
पंधरावे अध्यायीं कथा सुंदर ॥ सीतेसी घेऊन गेला दशवक्र ॥ मृग वधोनि राम-सौमित्र ॥ पंचवटीये परतले ॥८॥
मार्गीं होती अपशकुन ॥ चालतां जड जाहले चरण ॥ आश्रमांत पाहती येऊन ॥ दिसे शून्य भणभणित ॥९॥
जैसें प्राणाविण कलेवर ॥ कीं उदकेंविण सरोवर ॥ कीं नासिकाविण वक्र ॥ शोभिवंत दिसेना ॥१०॥
फळेंविण तरुवर ॥ कीं सैन्येंविण नृपवर ॥ कीं वंशीं नसतां कन्याकुमर ॥ व्यर्थ मंदिर ज्यापरी ॥११॥
कीं दयेवांचूनि ज्ञान ॥ कीं प्रेमेंविण कीर्तन ॥ कीं बुबुळेंविण नयन ॥ गुंफा शून्य तेवीं दिसे ॥१२॥
ऋषींप्रति पुसावें वर्तमान ॥ तंव ते पळाले कुटुंबें घेऊन ॥ दशदिशा दिसती शून्य ॥ रघुनंदन गहिंवरला ॥१३॥
नेत्रीं चालिल्या अश्रुधारा ॥ सीता सांग कोठें सौमित्रा ॥ ऐसें बोलतां नवपंकजनेत्रा ॥ मूर्च्छना आली ते वेळीं ॥१४॥
निचेष्टित पडे रघुनंदन ॥ वारा घाली लक्ष्मण ॥ नेत्रांस लावोनि जीवन ॥ जगज्जीवन सावध केला ॥१५॥
देवाधिदेव आत्माराम ॥ नीलग्रीव जपे ज्याचें नाम ॥ त्यासी कां जाहला मोहभ्रम ॥ नवल परम हें वाटे ॥१६॥
अंधकूपीं बुडाला दिनकर ॥ प्रळयाग्नीस बाधी शीतकर ॥ कल्पवृक्ष दारोदार ॥ मागेल भिक्षा कासया ॥१७॥
काळासी भूतें झडपिती ॥ मृगजळीं बुडाला गभस्ती ॥ म्हणोनि सीतेसाठीं रघुपति ॥ करी खंती नवल हें ॥१८॥
तो पुराणपुरुष रघुनंदन ॥ मायातीत शुद्धचैतन्य ॥ परी मायेचा अभिमान पूर्ण ॥ मायामय लटिकाचि ॥१९॥
दावी वर्तोनि जगद्रुरु ॥ करोनि मायामय पसारु ॥ हें जगीं वोडंबर दावी रधुवीरु ॥ मायामय लटिकेंचि ॥२०॥
असो वसिष्ठें उपदेशिलें ज्ञान ॥ कीं सर्वद्रष्टा एक आपण ॥ हा जगडंबर भास पूर्ण ॥ मायामय लटिकाचि ॥२१॥
जैशा स्वप्नींच्या जन्मपंक्ती ॥ यातना भोगी नानागती ॥ जागा होतां निश्र्चिंतीं ॥ मिथ्यामय सर्वही ॥२२॥
स्वप्नामाजी पतिव्रता ॥ जैसें मरण देखे प्राणनाथा ॥ परी सवेंचि जागी होतां ॥ सौभाग्य पाहतां तैसेंचि ॥२३॥
घट फुटतां चंद्रबिंब ॥ तैसेंचि असे स्वयंभ ॥ तरी अवतारलीला सीतावल्लभ ॥ संपादोनि दावीतसे ॥२४॥
असो सौमित्रास म्हणे रघुनाथ ॥ भोंवतें वृक्ष आणि पर्वत ॥ यांसी पुसों यथार्थ ॥ सीताशुद्धि ते सांगती ॥२५॥
गिरिकंदरीं गिरिमाळ ॥ शोधीत जात तमाळनीळ ॥ गोदातीरीं निर्मळ ॥ शोधी सकळ सौमित्रा ॥२६॥
वनोंवनीं राम धांवत ॥ सीते सीते आळवित ॥ कुरंगनयने भेट त्वरित ॥ शोकें बहुत व्यापिलों ॥२७॥
बदक चातक राजहंस ॥ मयूर रावे साळया सरस ॥ तयांसी पुसे अयोध्याधीश ॥ कोठें डोळस जानकी ॥२८॥
मृग शार्दुळ सिंह उरग ॥ नकुळ सूकर कस्तुरीमृग ॥ कोकिळा चक्रवाकें भृंग ॥ सीतारंग पुसे तयां ॥२९॥
कोणी न देती उत्तर ॥ त्यांवरी कोपला रघुवीर ॥ सौमित्र आणी धनुष्य शर ॥ छेदीन कांतार सर्वही ॥३०॥
सौमित्र म्हणे रघुनंदना ॥ हे केवीं जाणती तुझी अंगणा ॥ यांवरी कोप राजीवनयना ॥ सहसाही न करावा ॥३१॥
सीताविरहें रघुनंदन ॥ भुलोनि बोले काय वचन ॥ लक्ष्मणासी पूसे तूं कोण ॥ काय कारण येथें उभा ॥३२॥
तेव्हां सौमित्र बोले वचन ॥ श्रीरामाचा बंधु मी पूर्ण ॥ मग बोले वेदवंद्य रघुनंदन ॥ राम तो कोण कोठील ॥३३॥
भवकोदंड भंगिलें थोर ॥ तोचि राम समरधीर ॥ मग बोले सीतावर ॥ धनुष्य कोठें भंगिलें ॥३४॥
जनकाचिया मंडपांत ॥ धनुष्य भंगिलें यथार्थ ॥ जनक कोणाचा निश्र्चित ॥ सांग मज आतांचि ॥३५॥
जानकीचा जो पिता ॥ तो जनक जाण रघुनाथा ॥ अहा जानकी गुणसरिता ॥ मज आतांचि दावीं रे ॥३६॥
सौमित्रासी म्हणे रघुवीर ॥ आमचे कोठें ग्राम मंदिर ॥ येरू म्हणे अयोध्यापुर ॥ सेविलें कांतार पितृआज्ञें ॥३७॥
वना आलों कोण कोण ॥ उत्तर देत सुमित्रानंदन ॥ तुम्ही आम्ही सीताचिद्रत्न ॥ तिघेंजण आलों वना ॥३८॥
तरी जानकी दावीं त्वरित ॥ ऐसें बोले रघुनाथ ॥ भूमीवरी पडे मूर्च्छागत ॥ सौमित्र मग सांवरी ॥३९॥
तों अस्ता गेला दिनकर ॥ रात्रींमाजी प्रगटे रोहिणीवर ॥ राम म्हणे रे जाळितो मित्र ॥ अति तीव्र बहुत कां ॥४०॥
मग बोले सुमित्रासुत ॥ स्वामी हा चंद्र नव्हे आदित्य ॥ शीतळ किरण उष्ण वाटत ॥ सीताविरहेंकरूनियां ॥४१॥
श्रीरघुनाथ देवाधिदेव ॥ दावी इत्यादि बहुत भाव ॥ जो अज अजित स्वयमेव ॥ उमाधव ध्यात जया ॥४२॥
सीते सीते म्हणोन ॥ आलिंगीत वृक्ष पाषाण ॥ तों तत्काळ ते उद्धरोन ॥ जाती बैसोनि विमानीं ॥४३॥
सौमित्रासी म्हणे रघुनंदन ॥ चला घेऊं अगस्तीचें दर्शन ॥ त्यासी सांगों वर्तमान ॥ बुद्धि तो पूर्ण सांगेल ॥४४॥
अगस्तीचे आश्रमापति ॥ तत्काळ रामसौमित्र येती ॥ तों द्वारपाळ जाऊं न देती ॥ उभे करिती तयांतें ॥४५॥
कलशोद्भवासी वर्तमान ॥ सेवक सांगती जाऊन ॥ तों सीता घेऊनि गेला रावण ॥ ऋृषीस ज्ञानीं समजलें ॥४६॥
अंतरीं विचारी मुनि ॥ राम राज्य सांडोनि हिंडे वनीं ॥ हारविली जनकनंदिनी ॥ शाकेंकरूनि व्यापिला ॥४७॥
स्त्रीविरहित रघुनंदन ॥ आतां न घ्यावें त्याचें दर्शन ॥ सेवकांहातीं सांगोन ॥ पाठविलें ते काळीं ॥४८॥
आजि दर्शन नाहीं तुम्हांतें ॥ मागुती जावें आलिया पंथें ॥ हांसें आलें रघूत्तमातें ॥ हृदय ऋृषीचें जाणोनि ॥४९॥
परतोनि चालिला रघुवीर ॥ परम क्रोधावला सौमित्र ॥ म्हणे निर्दय कठिण विप्र ॥ जगदुद्धारा परतविला ॥५०॥

अध्याय सोळावा - श्लोक ५१ ते १००
ज्योतिर्लिंग जाणोन ॥ लत्ताप्रहारें केलें ताडण ॥ कामधेनु आली आपण ॥ डांगेवरी मारिली ॥५१॥
कल्पतरु दारीं उगवला ॥ तो देखतांचि अभाग्यें उपडिला ॥ परीस जाणोनि गोफणिला ॥ चिंतामणि घातला पायरीस ॥५२॥
अमृतकुंभ दैवें लाधला ॥ तो जाणोनि बळेंच उलंडिला ॥ जगद्वंद्य घरासि आला ॥ माघारा दवडिला समजोनि ॥५३॥
मग बोले रघुनंदन ॥ अगस्ति परम सज्ञान ॥ तो सीतेवीण माझें दर्शन ॥ सहसाहि न घेचि ॥५४॥
मी निर्विकार निर्गुण ॥ सीता सर्वांसी कारण ॥ तिणें मज जागें करून ॥ सगुणत्वासी आणिलें ॥५५॥
तिनें निर्मून पंचभूतें ॥ त्रिगुण आणि तत्त्वें समस्तें ॥ अवतारखेळ कौतुकें बहुतें ॥ दावी जनां तेचि पै। ॥५६॥
मी अरूप अनाम निश्र्चितीं ॥ हें सर्व जाणे अगस्ति ॥ तो ऋषीमाजी केवळ गभस्ती ॥ तपें ज्ञानें तेजस्वी जो ॥५७॥
असो श्रीराम जगजेठी ॥ परतोनि आला पंचवटीं ॥ वृक्ष गुल्मलता कवळी पोटीं ॥ सीता सीता म्हणोनियां ॥५८॥
पंचवटीचा त्याग करून ॥ तत्काळ चालिला रघुनंदन ॥ जैसी अहंदेहबुद्धि सांडोन ॥ योगी विचरे निरंजनीं ॥५९॥
कीं प्राण त्यागिलिया काया जैसी ॥ कीं कोपत्यागें जमदग्नि ऋषि ॥ कीं संसारमाया निश्र्चयेसीं ॥ विरक्त त्यागी मनींहूनि ॥६०॥
जीर्ण देह त्यागोनि उरग ॥ कीं तपोधन करी कामत्याग ॥ कीं पवित्र त्यागी कुमार्ग ॥ श्रेष्ठ कर्म जाणोनियां ॥६१॥
कीं परनिंदा सज्जन टाकिती ॥ आत्मस्तुति सांडिजे संती ॥ कीं अमंगळाची संगती ॥ न धरिती श्रोत्री कदाही ॥६२॥
कीं संसारदुःखें दारुण ॥ विवेकी त्यागी जैसें वमन ॥ तैसी पंचवटी त्यागोन ॥ राम-लक्ष्मण चालिले ॥६३॥
तों मग देखे रघुनंदन ॥ द्वादश हात लांब चरण ॥ चार हात रुंद पूर्ण ॥ राक्षसपाऊलें उमटलीं ॥६४॥
त्यांजवळी कुंकुमांकित जाण ॥ सीतेचे उमटले चरण ॥ मुक्तें विद्रुमें पडलीं गळोन ॥ लक्ष्मण पाहे विस्मित ॥६५॥
कमळिणीमित्रकुळभूषण ॥ शोधीत जात घोर विपिन ॥ तों जटायु देखिला दुरोन ॥ रक्तेंकरून बंबाळ ॥६६॥
किंशुक फुलला बहुत ॥ कीं दुरोन आरक्त दिसत ॥ तैसा जटायु पडला तेथ ॥ रामस्मरण करीतचि ॥६७॥
रघुनाथें भाते घेतले ॥ धनुष्य वेगीं चढविलें ॥ श्रीरामासी ऐसें भासलें ॥ कीं हा राक्षस बैसलासे ॥६८॥
भक्षोनियां जनकनंदिनी ॥ बैसलासे तृप्त होउनी ॥ रक्त वहात चहूंकडोनी ॥ पर्वतीं जैसा पाझर ॥६९॥
जवळी आला चापपाणि ॥ तों रामनामाची मधुर ध्वनी ॥ ती रघुत्तमें ऐकोनि श्रवणीं ॥ येत धांवोनि समीप ॥७०॥
तों डोळा उरलासे प्राण ॥ जटायु पडिला करीत स्मरण ॥ रघुनाथ तो भक्त देखोन ॥ हृदयीं पूर्ण गहिंवरला ॥७१॥
जटायूस पुढें घेऊन देख ॥ शोक करी अयोध्यानायक ॥ जैसें एकुलतें मरतां बाळक ॥ माता तळमळे ज्यापरी ॥७२॥
कीं परम मित्र बंधु रणीं ॥ पडलिया वाटे जेवीं हानी ॥ त्याचपरी चापपाणी ॥ हृदयीं धरोनि विलपत ॥७३॥
परम खेद करी सौमित्र ॥ म्हणे जटायु भक्त आणि मित्र ॥ जो मित्रसारथियाचा पुत्र ॥ ऐसा पवित्र नाढळे ॥७४॥
जटायूस म्हणे रघुवीर ॥ बारे काय जाहला समाचार ॥ तो मज सांग अणुमात्र ॥ जरी शक्ती असेल बोलावया ॥७५॥
श्रीरामाचे कर्णयुगलीं ॥ हळूच जटायु सांग ते वेळीं ॥ रावणें सीता लंकेसी नेली ॥ म्यां सोडविली होती येथें ॥७६॥
भोंवतें पाहे रघुनंदन ॥ तों अश्र्व सारथि आणि स्यंदन ॥ रावणाची वस्त्रें अलंकार पूर्ण ॥ चूर्ण होऊन पडियेलीं ॥७७॥
पाहतां जटायूचा पराक्रम ॥ पुढती गहिंवरे रघूत्तम ॥ सीताशोकाहून परम ॥ शोक वाटे जटायूचा ॥७८॥
जटायु बोले वचन ॥ रघुपती तुझी घालोनि आण ॥ राक्षसें घेतला माझा प्राण ॥ पक्ष उपडोनि टाकिले ॥७९॥
माझ्यानें आतां न बोलवे देख ॥ म्हणोनि पदीं ठेविला मस्तक ॥ श्रीरामाच्या नेत्रोदकें अभिषेक ॥ जाहला जटायूतें ॥८०॥
मग बोले रघुनंदन ॥ जटायु तुज मी उठवीन ॥ मज तूं साह्य होईं पूर्ण ॥ दशरथाऐसा सत्वर ॥८१॥
मग बोले अरुणनंदन ॥ ऐसें मज पुढें न ये मरण ॥ तुझे अंकावरी जाण ॥ सोडीन प्राण आतांचि ॥८२॥
जटायु विलोकी रामवदन ॥ हृदयीं रेखिलें तैसेंचि ध्यान ॥ मुखें करीत नामस्मरण ॥ चालिला प्राण ते काळीं ॥८३॥
श्रीरामें तेव्हां हृदयीं धरिला ॥ तेथेंच जटायूनें प्राण सोडिला ॥ ब्रह्मा हंसविमान घेऊन आला ॥ वरी बैसविला जटायु ॥८४॥
जटायूस म्हणे रघुनंदन ॥ तुज स्वर्गीं भेटले दशरथ जाण ॥ त्यासी सीता नेली हे वर्तमान ॥ सहसाही न सांगावें ॥८५॥
परम प्रतापी दशरथ पिता ॥ कर्मभूमीस येईल मागुता ॥ यालागीं न सांगावी वार्ता ॥ जाण तत्वतां जटायु ॥८६॥
मी रावणास वधोनी ॥ पाठवीन स्वर्गभुवनीं ॥ मग तो स्वमुखेंकरूनि ॥ वृत्तांत सर्व सांगेल ॥८७॥
असो जटायु स्वर्गा पावला ॥ रघुनाथ्ज्ञें तो पितृव्य मानिला ॥ दशरथें बंधु म्हणविला ॥ शक्राचिया युद्धकाळीं ॥८८॥
यालागीं जनकजामातें ॥ पितृव्य मानिला जटायूतें ॥त्याचेनि संगें सीताकांतें ॥ पंचवटिये काळ क्रमियेला ॥८९॥
घडीघडी येवोनि बैसे ॥ श्रीराम त्यासी गोष्ट पुसे ॥ जटायु भक्त विशेषें ॥ रघुपतीचा आवडता ॥९०॥
त्याची उत्तरक्रिया समस्त ॥ करिता जाहला कौसल्यासुत ॥ सौमित्रें काष्टें मेळवून बहुत ॥ अग्नि दीधला तयासी ॥९१॥
ऐसा भक्तकरुणाकर ॥ शरणांगतां वज्रपंजर ॥ पुढें चालिला राघवेंद्र ॥ सीता सुंदर शोधावया ॥९२॥
दक्षिणपंथें दंडकारण्यांत ॥ जेथें राहिला रघुनाथ ॥ शिवलिंग स्थापिलें तेथ ॥ बाणचिन्हांकित अद्यापि ॥९३॥
मयूरगिरी परम गहन ॥ तेथें आला अहल्योद्धारण ॥ हे सीते हे सीते म्हणोन ॥ वृक्षपाषाण आलिंगी ॥९४॥
तों कैलासीं वर्तलें नवल ॥ बैसला असतां जाश्र्वनीळ ॥ हातीं घेऊनि जपमाळ ॥ जपे कोमळ रामनाम ॥९५॥
जेणें शमलें हाळाहळ ॥ तें सहस्रनामांहूनि निर्मळ ॥ चंद्रापरीस अति शीतळ ॥ अमृताहूनि गोड पैं ॥९६॥
जें दिनकरापरिस तेजाळ ॥ जें आकाशापरी विशाळ ॥ जें सकळ आनंदाचें मूळ ॥ नाम केवळ परब्रह्म ॥९७॥
रूप सगुण नाम निर्गुण ॥ रूप मायामय आनंदघन ॥ रूप झांके नाम पूर्ण ॥ अनंतयुगीं ठसावें ॥९८॥
रूप सेवेंचि नाम निर्वच ॥ रूप क्षणिक नाम साच ॥ नामअर्थ करितां उगेच ॥ वेद तटस्थ राहिले ॥९९॥
असो तें नाम सर्वांत सार ॥ अखंड स्मरतां कर्पूरगौर ॥ तेथें हिमाद्रितनया जोडूनि कर ॥ विनवी सादर शिवातें ॥१००॥

अध्याय सोळावा - श्लोक १०१ ते १५०
म्हणे स्वामी जप आणि ध्यान । कवणाचें करितां रात्रंदिन ॥ कोण थोर असे तुम्हांहून ॥ मजलागोनि सांगा तें ॥१॥
शिव म्हणे ऐक शुभकल्याणी ॥ सकळगुणसरिते लावण्यखाणी ॥ जो रविकुळमुकुटदिव्यमणी ॥ मी ध्यातों मनीं तयातें ॥२॥
जो राक्षसकाननवैश्र्वानर ॥ जो भक्तहृदयारविंदभ्रमर ॥ जो अज्ञानतमनाशक दिनकर ॥ जो उदार श्रीराम ॥३॥
जो त्रैलोक्यनगरस्तंभ विशाळ ॥ जो निगमवल्लीचें पक्व फळ ॥ जो जगदंकुरकंद निर्मळ ॥ तो तमाळनीळ श्रीराम ॥४॥
जो द्विपंचमुखदर्पहरण ॥ जो भवगजविदारक पंचानन ॥ जो जनकजामात मखपाळण ॥ त्याचें ध्यान करितों मी ॥५॥
ऐकतां हांसिन्नलीं भवानी ॥ तो राम हिंडतो वनीं ॥ सीता सीता म्हणोनी ॥ वृक्ष पाषाण आलिंगतो ॥६॥
रावणें नेली त्याची युवती ॥ स्त्रीवियोगें भ्रंशली मति ॥ त्याचें ध्यान अहोरात्रीं ॥ तुम्ही करितां नवल हें ॥७॥
शिव म्हणे तो रघुवीर ॥ लीलावतारी निर्विकार ॥ वेद आणि भोगींद्र ॥ नेणती पार जयाचा ॥८॥
तो पूर्णब्रह्मानंद निर्गुण ॥ देवांची करावया सोडवण ॥ सगुणलीलावेष पूर्ण ॥ भक्तांलागीं दावितसे ॥९॥
विश्र्वरूप एक रघुवीर ॥ जेवीं सुवर्ण एक बहु अलंकार । कीं बहुत सदनें एक अंबर ॥ सीतावर व्यापक तैसा ॥११०॥
कीं बहुत लहरिया एक सागर ॥ लोह एक शस्त्रें अपार ॥ पट दिसती चित्र विचित्र ॥ तरी तंतु सर्व एकचि ॥११॥
बहु बिंदु एक जलधर ॥ घृत एक कणिका अपार ॥ की अनेक वाद्यांत साचार ॥ एकचि नाद दुमदुमे ॥१२॥
एक उर्वी बहुत वनस्पती ॥ एक वेद बहुत श्रुती ॥ कीं एकाच नभीं झळकती ॥ उडुगणें जैशीं अपार ॥१३॥
तैसा राम व्यापक तत्वतां ॥ मग बोले हिमनगसुता ॥ तुम्ही एवढा महिमा वर्णितां ॥ त्या रघुनाथा भुलवीन मी ॥१४॥
मग जानकीचें रूप धरुनी ॥ रामासन्मुख आली भवानी ॥ कांचनर्णी सुहास्यवदनीं ॥ पद्मनयनी सुरेख ॥१५॥
बोलतां झळकती दंतपंक्ती ॥ तें तेज न लोपे गगनक्षितीं ॥ पदरजें हिरे होती ॥ अतर्क्य गति तियेची ॥१६॥
अंगींचा मकरंद अपार ॥ त्या सुवासें तृप्त कांतार ॥ सुगंधासी वेधोनि समग्र ॥ षट्पदचके्रं धांवती ॥१७॥
विद्युत्प्राय पीतवसन ॥ सर्वांलंकारीं मंडित पूर्ण ॥ राघव तियेतें देखोन ॥ मुख मुरडोन चालिला ॥१८॥
तिकडे न पाहेचि सर्वथा ॥ तंव पुढें ये गजास्यमाता ॥ म्हणे स्वामी रघुनाथा ॥ आल्यें मी सीता पहा मज ॥१९॥
मागुती तियेसी टाकून ॥ राम आलिंगी वृक्ष पाषाण ॥ आश्र्चर्य करी लक्ष्मण ॥ जानकी सुटोन आली कीं ॥१२०॥
मग म्हणे आत्मयारामा ॥ विषकंठहृदया पूर्णब्रह्मा ॥ जानकीलागीं पूर्ण कामा ॥ आलिंगन द्यावें जी ॥२१
व्याघ्राचिये कवेंतुनी ॥ पूर्वभाग्यें वांचे कुरंगिणी ॥ अयोध्यानाथा तुझी राणी ॥ आली सुटोनि तैशीचि ॥२२॥
सुरवर पाहतीं गगनीं ॥ म्हणती जानकी जवळी असोनी ॥ तिकडे न पाहे मोक्षदानी ॥ कोप मनीं धरिला कां ॥२३
सौमित्र म्हणे पद्मलाक्षा ॥ मनमोहना निर्विकल्पवृक्षा ॥ सीतेसी आलिंगीं सर्वसाक्षा ॥ पुरवीं अपेक्षा तियेची ॥२४॥
मग बोले रघुवीर ॥ तुम्हांस नेणवे कापट्यविचार ॥ हे अपर्णादेवी साचार ॥ ठकवाया आली आम्हां ॥२५॥
शिवासी करूनियां पण ॥ ठकवावया आली आपण ॥ तुम्हांस नेणवे हे खूण ॥ अंतज्ञानें कळेचि ॥२६॥
कैलासींच्या खुणा समस्त ॥ सौमित्रासी सांगे रघुनाथ ॥ स्कंदमाता जाहली तटस्थ ॥ म्हणे हा अजित पूर्णब्रह्म ॥२७॥
मग ते मूळपीठनायिका ॥ प्रकट रूप दावी अंबिका ॥ विश्र्वजनकाचिया जनका ॥ वर द्यावया पुढें आली ॥२८॥
श्रीराम म्हणे हो माते ॥ ज्ञानगंगे हिमनगसुते ॥ शिवआज्ञा मोडोनि येथें ॥ किमर्थ केलें आगमन ॥२९॥
ऐसें बोलून कौसल्यासुत ॥ सीते सीते म्हणोनि बाहत ॥ वृक्ष पाषाण ओ देत ॥ पाहे तटस्थ अंबिका ॥१३०॥
दुर्गा म्हणे रघुनंदना ॥ भार्गवजिता शिवमनरंजना ॥ नरवीरश्रेष्ठा आनंदसदना जगद्वंद्या जगदुरु ॥३१॥
तूं निर्विकार ज्ञानघन ॥ तरी कां आलिंगिसी वृक्षपाषाण ॥ श्रीराम म्हणे हें वर्तमान ॥ पूस जावोनि शिवातें ॥३२॥
तुझें अंतरी नाहीं विश्र्वास ॥ नेणसी अध्यात्मज्ञान लेश ॥ मी कां आलिंगितों वृक्षांस ॥ परमपुरुष शिव जाणे ॥३३॥
मग अंबिका बोले वचन ॥ तुम्ही एकरूप दोघेजण ॥ एक एकाची अंतरखूण ॥ परस्परें जाणतसां ॥३४॥
आकाशाचें थोरपण ॥ एकचि जाणे प्रभंजन ॥ कीं समीराचें सर्वत्र गमन ॥ अंबर पूर्ण जाणतसे ॥३५॥
सर्व सोडून अभिमान ॥ विरंचिजनका तुज मी शरण ॥ कां आलिंगितां वृक्षपाषाण ॥ सांगा खूण एवढी ॥३६॥
मग अपणेंचे हृदयीं पूर्ण ॥ रामें प्रगटविलें दिव्यज्ञान ॥ म्हणे आतां वृक्षपाषाण ॥ पाहें निरखोनि कोण हे ॥३७॥
सावध पाहे भवानी ॥ तों ते महाऋषि बैसले ध्यानीं ॥ श्रीराम त्यांसी आलिंगोनी ॥ कैवल्यपदा पाववी ॥३८॥
सीतेचें करूनि मिस ॥ रामें उद्धरिले तापस ॥ मग म्हणे हा पुराणपुरुष ॥ लीलावेष दावितसे ॥३९॥
असो अंबिकेचें पूजन ॥ स्वयें करी रविकुलभूषण ॥ मग देवीनें वरदान ॥ रघुवीरास दीधलें ॥१४०॥
म्हणे राजीवाक्षा रघुनंदना ॥ तूं सत्वर वधिशील दशानना ॥ जानकी घेऊनि निजसदना ॥ अयोध्येपाशीं येशील ॥४१॥
अहो तेचि हे रामवरदायिनी ॥ अंबा तुळजापुरवासिनी ॥ रघुनाथ पुढें चालिला तेथुनी ॥ दक्षिणपंथें शोधित ॥४२॥
तों पुढें देखिली कृष्णावेणी ॥ दोष नुरे तिच्या स्मरणीं ॥ तिचे तटीं कोदंडपाणी ॥ क्षण एक बैसला ॥४३॥
स्नान करावया रघुनंदन ॥ कृष्णेंत प्रवेशला जगन्मोहन ॥ देखोन सखोल जीवन ॥ जगज्जीवन बुडी देत ॥४४॥
विष्णुतनु कृष्णा साचार ॥ देखोनियां राजीवनेत्र ॥ क्षणें उदकमय जाहलें शरीर ॥ कडे सौमित्र पाहतसे ॥४५॥
तनु जाहली उदकमय ॥ तंव सौमित्र तेथें घाबरा होय ॥ घटका एक वाट पाहे ॥ म्हणे काय करूं आतां ॥४६॥
काय जाहली मूर्ति सांवळी ॥ कोठें गेली अनाथाची माउली ॥ श्रीरामा तूं जगाची साउली ॥ माझी केली कां उपेक्षा ॥४७॥
सौमित्रें अंग घातलें धरणीं ॥ म्हणे रामा धांव ये क्षणीं ॥ तूं माझी जनकजननी ॥ वनीं मज सांडिलें कीं ॥४८॥
राघवा मग उबगलासी ॥ सांडिलें मज घोरवनासी ॥ मी आतां त्यागीन प्राणासी ॥ निश्र्चयेसी राघवेंद्रा ॥४९॥
जानकीमाता उबगली ॥ तीही मज टाकोन गेली ॥ रघुपति तुझी आशा धरिली ॥ तुवां कली उपेक्षा ॥१५०॥

अध्याय सोळावा - श्लोक १५१ ते २०६
मग उठोनि सुमित्रासुत ॥ चहुंकडे पाहे तटस्थ ॥ धनुष्य करीं घेत ॥ क्रोध अद्भुत नावरे ॥५१॥
म्हणे कृष्णे तुज उगमापासूनि ॥ निर्जळ करीन ये क्षणीं ॥ बाण काढिला विचारूनि ॥ मुखीं प्रळयाग्नि जयाचे ॥५२॥
आणोनि दे माझा रघुवीर ॥ नवमेघरंग राजीवनेत्र ॥ हें जाणोनि अहल्योद्धार ॥ निघे बाहेर ते काळीं ॥५३॥
सौमित्र चरणीं लागला ॥ ते स्थळीं शंकर स्थापिला ॥ बाहोक्षेत्र म्हणती तयाला ॥ पुढें चालिला रामचंद्र ॥५४॥
आठ राक्षस रावणें पाठविले ॥ रामासी वधूनियां सत्वर वहिले ॥ कबंधाचे कवें सांपडले ॥ तेही गिळिले क्षणार्धें ॥५५॥
त्या कबंधाचे कवेआंत ॥ सांपडले सौमित्र-रघुनाथ ॥ सांचळ ऐकतां कबंध ॥ पसरोनियां आवरिले ॥५६॥
द्वादश योजनें दोनी हस्त ॥ जैसे आड पडिले पर्वत ॥ शिर उतरलें हृदयांत ॥ वज्रघातें करूनियां ॥५७॥
नाहीं तयासी चरण ॥ बैसला दोन्ही हस्त पसरून ॥ त्याचे कवेंत राम लक्ष्मण ॥ अकस्मात सांपडले ॥५८॥
बळ जाणोनि अद्भुत ॥ धनुष्य सज्जोनि अयोध्यानाथ ॥ तीक्ष्ण शरें दोनी हात ॥ छेदोनियां पाडिले ॥५९॥
श्रीराम बाणे उद्धरला ॥ कबंध दिव्य देह पावला रघुपतीच्या चरणीं लागला ॥ उभा राहिला हस्त जोडोनि ॥१६०॥
मी दनूचे उदरीं कश्यपसुत । मद्यपानी महाउन्मत्त ॥ स्थूलशिरा ऋषि तप करित ॥ सेविलें एकांत कानन ॥६१॥
त्यासी म्यां हाक फोडून ॥ भेडसाविला तपोधन ॥ तेणें शापशस्त्रेंकरून ॥ मज ताडिलें ते काळीं ॥६२॥
म्हणे तूं चांडाळ पापखाणी ॥ कबंध होऊन पडे वनीं ॥ मग मी लागलो त्याचे चरणीं ॥ उःशापवाणी बोलिला ॥६३॥
दशरथसुत दंडकारण्यांत ॥ दशमुख वधावया जातां सत्य ॥ दशा तुझी उजळेल यथार्थ ॥ दनुपुत्रा जाणपां ॥६४॥
इंद्रपद घ्यावयासी जाण ॥ मी जपत होतों बहुत दिन ॥ वज्रधरें वज्र उचलोन ॥ मस्तकीं माझे ताडिलें ॥६५॥
मस्तक उदरांत उतरलें ॥ दोनी चरण छेदिले ॥ पूर्वकर्म फळासी आलें ॥ कष्ट भोगिले बहुवस ॥६६॥
जाहला माझा उद्धार ॥ रामा पडिलें माझें शरीर ॥ यासी देवोनि वैश्र्वानर ॥ भस्म करीं आतांचि ॥६७॥
काष्ठें मेळवून सौमित्रें ॥ अग्नींत घातले कलेवर ॥ मग तो पावोनि पुण्यशरीर ॥ विमानांत बैसला ॥६८॥
परीस झगटतां जाण ॥ होय लोहाचें सुवर्ण ॥ तैसा कबंध उद्धरोन ॥ वैकुंठधामा चालिला ॥६९॥
शंखचक्रादि चिन्हांकित ॥ चतुर्भुज विष्णुभक्त ॥ कबंध उद्धारोनि यथार्थ ॥ तोही जाहला तैसाचि ॥१७०॥
मग विमानीं बैसोनि जातां ॥ म्हणे अयोध्याप्रभु रघुनाथा ॥ सुग्रीवासी मैत्री तत्वतां ॥ करीं तूं आतां येथोनि ॥७१॥
जगद्वंद्या जनकजामाता ॥ जलदगात्रा जन्मरहिता ॥ जलजनेत्रा जलजासनताता ॥ जनार्दना जगदगुरो ॥७२॥
असो नमस्कारोनि रघूत्तमा ॥ कबंध पावला निजधामा ॥ पुढें शबरीचिया आश्रमा ॥ जगदात्मा येता जाहला ॥७३॥
परम तपस्वी शबरी ॥ तप करितां जाहली म्हातारी ॥ तिच्या आश्रमीं रावणारी ॥ राहता जाहला दिनत्रय ॥७४॥
तिणें फळें मुळें आणून ॥ भावें अर्चिला रघुनंदन ॥ म्हणे तप जाहलें पूर्ण ॥ राजीवनयन देखिला ॥७५॥
शबरीसी उपदेशिलें ज्ञान ॥ ती तात्काळ गेली उद्धरोन ॥ शरीर सांडोनि कैवल्यसदन ॥ पावली पूर्ण तत्काळीं ॥७६॥
सौमित्र म्हणे पुराणपुरुषा ॥ जगदोद्धारा अयोध्याधीशा ॥ मज निजज्ञान सर्वेशा ॥ कृपा करून उपदेशीं ॥७७॥
मग रामगीता जें आत्मज्ञान ॥ सारासार विचारनिरूपण ॥ लक्ष्मणाप्रति सांगोन ॥ निःसंशय तो केला ॥७८॥
मायिक जगदाभास पूर्ण ॥ सत्य शाश्र्वतरूप निर्वाण ॥ ते चिन्मयवस्तु आपण ॥ निजज्ञान या नामें ॥७९॥
असो यावरी रघुपति ॥ आला हंपीविरूपाक्षाप्रति ॥ पुढें पंपासरोवर निश्र्चितीं ॥ विश्रांतिस्थान शिवाचें ॥१८०॥
दिव्य वल्ली दिव्यद्रुम ॥ सदा सफळ भेदीत व्योम ॥ तेथें स्फटिकागुहा उत्तम ॥ परम आरामस्थळ जें कां ॥८१॥
स्फटिकशिळेवरी श्रीराम ॥ बैसला तेव्हां घनश्याम ॥ जेवीं कैलासी द्यावया क्षेम ॥ बलाहक उतरला ॥८२॥
सौमित्राचे मांडीवरी ॥ शिर ठेवून रावणारी ॥ श्रमोनियां निद्रा करी ॥ निर्विकारी अजित जो ॥८३॥
शेषशायी नारायण ॥ तोचि राम इंदिरारमण ॥ सौमित्राचे अंकीं शिर ठेवून ॥ त्याचपरी शोभला ॥८४॥
असो ते समयीं रघुनाथा ॥ चित्तीं आठवे जनकदुहिता ॥ श्र्वासोच्छास जगत्पिता ॥ घालोन बोले ते समयीं ॥८५॥
अहो जानकी मृगांकवदने ॥ गुणसरिते पद्मनयने ॥ सकळ लावण्यगुणनिधाने ॥ कधीं भेटसी मज आतां ॥८६॥
रामासी जाहला विरहज्वर ॥ तंव कोकिळा बाहती सुस्वर ॥ तयांसी म्हणे त्रिभुवनेश्र्वर ॥ खुंटो स्वर सदा तुमचा ॥८७॥
ते वेळीं तमालनीळा ॥ शरण आल्या सर्व कोकिळा ॥ राम म्हणे वसंतकाळा ॥ माजी शब्द फुटेल ॥८८॥
मृगमृगींस म्हणे रघुनाथ ॥ तुम्हां संघटतां पारधि वधील सत्य । तंव तीं जाहलीं शरणागत ॥ उःशाप देत तयांसी ॥८९॥
तो तुम्हांस रात्रीस वधील सत्य ॥ वरकड दिवस तुम्हांस मुक्त ॥ तंव देखिलीं गजगजी रमत ॥ काय बोलत तयांसी ॥१९०॥
दोघांसी योग होतां यथार्थ ॥ गज पडेल मूर्च्छागत ॥ सात दिवसपर्यंत ॥ अचेतन प्रेतापरी ॥९१॥
तंव तीं आलीं शरण ॥ उःशाप बोले राजीवनयन ॥ जळांत करितां मैथुन ॥ मूर्च्छा नये सहसाही ॥९२॥
मयूरासी म्हणे रघुनायक ॥ तुम्ही व्हारें नपुंसक ॥ तंव तीं शरण येती देख ॥ काय बोले जगद्रुरु ॥९३॥
नयनीं जे अश्रु स्रवती ॥ तेणेंचि वाढेल तुमची संतती ॥ चक्रवाकांस म्हणे रघुपति ॥ सूर्योदयीं भेट तुम्हां ॥९४॥
रात्रीं होय तुम्हांस वियोग ॥ तों दृष्टीं देख कागिणीकाग ॥ त्यांसी म्हणे जन्मांत संग ॥ एकदांच संसारीं ॥९५॥
मी सीतेवीणी भ्रमतों देख ॥ तुम्ही भोगितां रतिसुख ॥ यालागीं दंड हाचि निःशंक ॥ तुम्हांसी केला निर्धारें ॥९६॥
सीतावियोगें रघुनाथ ॥ म्हणे राक्षस येऊन बहुत ॥ यांच्या स्त्रिया हरोनि समस्त ॥ नेईनात सीतेऐशा ॥९७॥
रतिचेष्टा मजसमोर ॥ कांहो करिती वारंवार ॥ माझी जानकी सुकुमार ॥ मज भेटली नाहीं जो ॥९८॥
इत्यादि भाव ते समयीं ॥ दावी जनकाचा जांवई ॥ इचे गुणांस गणना नाहीं ॥ कोटि वर्षें शोधितां ॥९९॥
असो ऋष्यमूकपर्वतारूनि ॥ वानर विलोकिती चापपाणी ॥ नळ नीळ जांबुवंत तरणि ॥ कुमार पाह सुग्रीव ॥२००॥
आणि पांचवा तो हनुमंत ॥ जो अवतरला उमाकांत ॥ त्याचें जन्मकर्म अद्भुत ॥ तृतीयाध्यायीं वर्णिलें ॥१॥
रामविजय ग्रंथराशी ॥ हेचि केवळ वाराणसी ॥ रामकथा विश्र्वेश्र्वरासी ॥ प्रिय म्हणून राहिला ॥२॥
कष्ट न होतां अपार ॥ यात्रेसी धांवती मुमुक्षु नर ॥ श्रवणीं बैसती सादर ॥ संसारकार्य टाकूनि ॥३॥
येथूनि अरण्यकांड संपलें ॥ पुढें किष्किंधाकांड आरंभिलें ॥ जैसे रत्नाहून रत्न आगळें ॥ वैरागरीं निपजे पैं ॥४॥
याचे परीक्षक संतजन ॥ जे ब्रह्मानंदें परिपूर्ण ॥ श्रीधर तयांसी अनन्य शरण ॥ अभंग अक्षय सर्वदा ॥५॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ षोडशाध्याय गोड हा ॥२०६॥
॥श्रीरामचंद्रापर्णमस्तु॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रीरामविजय - अध्याय १५ वा